‘जय श्रीराम'च्या घोषणा देण्याची जबरदस्ती केल्याचा मुझफ्फरपूरच्या इमामांचा आरोप

इमाम मुफ्ती अमलाकुर्रहमान Image copyright ANI
प्रतिमा मथळा इमाम मुफ्ती अमलाकुर्रहमान

काही अनोळखी तरुणांनी आपल्याला मारहाण करत 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला लावल्याचा आरोप उत्तर प्रदेशातल्या मुझ्झफरनगरच्या एका इमामांनी केला आहे.

पोलिसांनी मात्र हा केवळ मारहाणीचाच प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

मेरठ जिल्ह्यातल्या सरधना गावातील एका मशिदीचे इमाम मुफ्ती अमलाकुर्रहमान यांनी हा आरोप केला आहे. शनिवारी गावी परतत असताना काही अनोळखी तरुणांनी अडवून आपल्यावर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

इमलाकुर्रहमान सांगतात, "मी सरधनामधल्या मशिदीमध्ये इमाम आहे. दोन दिवसांपूर्वी साडेपाचच्या सुमारास मी बाईकवरून गावी जात होतो. मी बाईक हळू चालवत होतो. रस्त्यात काही तरुणांनी माझी बाईक थांबवून माझ्यावर हल्ला केला."

"आठ-दहा तरुण होते. काही न बोलता त्यांनी मला मारायला सुरुवात केली. दाढी ओढली आणि टोपी पाडली. त्यांनी मला 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला सांगितल्या. मी नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण केली."

Image copyright ANI

पण बागपतचे पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडेंनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

"हे फक्त मारहाणीचं प्रकरण आहे. याला जो धार्मिक रंग दिला जातोय, तसं घडलेलं नाही. या घटनेनंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये काही धार्मिक दृष्टिकोन समोर आलेला नाही," असं शैलेश कुमार पांडेंनी सांगितलं.

पांडेंनी सांगितलं, की मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच पुढील कारवाई केली जाईल.

गावात तणावाचं वातावरण

पीडित आणि हल्लेखोर एकमेकांना ओळखत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यामागे काही हेतू होता का याचा तपास करण्यात येत आहे. पण ही पूर्णपणे धार्मिक हिंसाचाराची घटना असल्याचं इमलाकुर्रहमान यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "हा पूर्णपणे एक धार्मिक हल्ला होता. त्यांनी मला लांबूनच पाहिलं होतं आणि माझी बाईक थांबवली. माझी दाढी ओढली आणि 'जय श्रीराम'च्या घोषणा द्यायला लावल्या. मी घोषणा दिल्या नाहीत म्हणून मारहाण केली. मी माझी मोटरसायकल तिकडेच टाकून कसाबसा जीव वाचवून पळालो."

इमलाकुर्रहमान यांना मारहाण होत असताना तिथे अनेक लोक हजर होते, पण कुणीही त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलं नाही.

ते म्हणतात, "मला मारहाण होताना लोक पाहत होते. पण वाचवायला कोणी आलं नाही. मी कसाबसा निसटलो आणि तिथून पळ काढला. जीव वाचवण्यासाठी मी माझ्या मोटरसायकलचीही पर्वा केली नाही."

इमलाकुर्रहमान यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी आल्यापासून त्यांच्या गावात तणावाचं वातावरण असून लोक गोळा व्हायला सुरुवात झाली आहे.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा अब्दुल जलील कासमी

स्थानिक धार्मिक नेते आणि इमलाकुर्रहमान यांचे काका अब्दुल जलील कासमी यांचं म्हणणं आहे, की त्यांनी लोकांना शांतता राखण्याचं तसंच पोलिसांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

कासमी म्हणतात, "गावात असंतोष आहे. आजूबाजूच्या लोकांचे आणि नातेवाईकांचे फोन येऊ लागले आहेत. लोक गोळा होत आहेत. तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस कारवाई करत असल्याचं आम्ही सगळ्यांना समजावून सांगितलं आहे."

"लोकांना चौकशी करायची होती, पण मी सगळ्यांना समजावलं. याबाबत योग्य न्याय देण्याची हमी पोलिसांनी दिली आहे आणि पोलिसांवर आमचा विश्वास आहे."

तर या हल्ल्यानंतर इमलाकुर्रहमान घाबरलेले आहेत.

"गर्दीनं हल्ला केल्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रात येतात. पण माझ्यासोबत असं काही माझ्याच परिसरात घडेल हा विचारही मी कधी केला नव्हता," असं ते सांगत होते.

"मला वाटलं आता मी काही यातून वाचत नाही. पण मला माझा जीव वाचवता आला. आता मनात भीती मात्र बसली आहे. कदाचित मी आता पुन्हा कधी मशिदीत जाऊ शकणार नाही. बिनधास्तपणे कधीच घराबाहेर पडू शकणार नाही."

जमावानं हल्ला करण्याच्या घटनांवर लक्ष ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते नदीम खान सांगतात, की वारंवार असे हल्ले होऊनही पोलिस ही प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न करतात.

अनेक प्रकरणं समोर

नदीम खान सांगतात, "या सगळ्या प्रकरणांमधली पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. अशा प्रकारे धार्मिक हिंसा किंवा लिंचिंगचं प्रकरण समोर आल्यावर ते दडपण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो."

ते सांगतात, "हल्लीच उन्नावमध्ये मदरशातल्या मुलांवर हल्ला झाला. त्याचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये त्यांनी उघडपणे सांगितलं आहे, की त्यांच्यावर 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करण्यात आली होती. पण पोलिसांनी इथेही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचं म्हणणं आहे, की हे फक्त मारहाणीचं प्रकरण आहे."

"अशा प्रकरणांमध्ये पोलिसांचं म्हणणं आणि पीडितांचं म्हणणं तसंच त्यांच्या तक्रारी पडताळून पाहिल्यावर हे स्पष्ट होतं, की धार्मिक हिंसेच्या घटनांना पोलिस फक्त मारामारीचा गुन्हा ठरवून त्यानुसारच कारवाई करतात."

Image copyright Getty Images

गेल्या काही दिवसांमध्ये गर्दीने केलेली हिंसा आणि अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तिंना जबरदस्तीने धार्मिक घोषणा द्यायला लावण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. झारखंडमधल्या तबरेझ अन्सारीच्या व्हीडिओने सर्व जगाला हादरवलं होतं. यानंतर गर्दीकडून केल्या जाणाऱ्या हिंसेच्या विरोधात अनेक शहरांमध्ये निदर्शनंही झाली होती.

असाच हल्ला झाल्याचा आरोप नुकताच उन्नावमधील मदरशातील विद्यार्थ्यांनी केला होता. मग असे हल्ले थांबवायचे कसे?

गर्दीकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध मोहीम राबणाऱ्या सामाजिक संघटनांनी आता अशा घटनांमधील पीडितांसाठी एक टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे.

पीडितांसाठी हेल्पलाईन

15 जुलैपासून ही हेल्पलाईन सुरू होत आहे. नदीम खान सांगतात, "याच प्रकारच्या हल्ल्यांसाठी आम्ही एक टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे. हा 1800 पासून सुरू होणारा नंबर असेल."

Image copyright UNITED AGAINST HATE

"पीडित व्यक्ती आम्हाला या नंबरवर फोन करू शकते. त्यांची बाजू ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. जमावाच्या हिंसेला बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यात मदत करणं आणि अशा प्रकारच्या घटनांचे तपशील तयार करणं हा यामागचा हेतू आहे."

अशा प्रकरणांबाबत राज्य आणि केंद्र सरकारनं कठोर शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये बोलताना झारखंडमधल्या घटनेबाबत खेद व्यक्त केला होता. त्यांनी म्हटलं होतं, की अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि असा हल्ला करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हावी.

पण असं असूनही देशामध्ये धार्मिक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. हे हल्ले कधी थांबणार, हा एकच प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)