अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

अल्पेश ठाकोर Image copyright BBC/gujarati

गुजरातमधील काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही आमदारांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे.

कच्च्या गुरुंच्या शाळेला रामराम ठोकून मी गुरूकुलात प्रवेश केला आहे असं अल्पेश ठाकोर यांनी यावेळी म्हटलं.

Image copyright Anii

याआधी अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी गुजरात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

कोण आहेत अल्पेश ठाकोर?

अल्पेश यांचे वडील एकेकाळी भाजपमध्ये होते. पण अल्पेश ठाकोर हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये गेले होते. अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल हे त्रिकूट मोदींना आव्हान देईल असं देखील त्यावेळी म्हटलं जात होतं.

ठाकोर हे ओबीसी नेते समजले जातात. दारूबंदीच्या आंदोलनातल्या त्यांच्या भूमिकेमुळे ते ठाकोर समाजात लोकप्रिय झाले.

गुजरातमध्ये असणारी दारुबंदी ही केवळ नावापुरती असून सरकारनं आणखी कठोर कायदे करणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

त्यांच्या आंदोलनानंतर सरकारला या दारूबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून नियम कठोर बनवावे लागले होते.

Image copyright AICC
प्रतिमा मथळा अल्पेश ठाकोर आणि राहुल गांधी

अल्पेश यांनी ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या हक्कासाठी एकता मंचाची स्थापना केली आहे. त्याद्वारे आपण लाखो लोकांसोबत जोडलो गेलो आहेत असा दावा ते करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी बेरोजगारांचे प्रश्न, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मांडून चळवळ उभी केली. त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक सभा आणि मोर्चांचं आयोजन केलं होतं.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते "मी भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणासाठी लढत आहे. माझा लढा बेरोजगारीविरोधात आहे. राहुल गांधी आणि माझे विचार समान आहेत. त्यामुळे मी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे."

दोन वर्षं काँग्रेसमध्ये काढल्यानंतर आता ते भाजपमध्ये आले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)