कारगिल युद्धः जेव्हा दिलीप कुमार नवाज शरीफ यांना खडसावतात

नवाज दिलीप कुमार Image copyright Getty Images

20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या डोंगरांवर घुसखोरी करत मोर्चेबांधणी केली, आणि युद्धाला सुरुवात झाली. कारगिल युद्धाला आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धाच्या आठवणी आणि माहिती सांगणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग.

8 मे 1999. पाकिस्तानच्या 6 नॉर्दर्न लाईट इंफंट्रीचे कॅप्टन इफ्तेकार आणि लान्स हवालदार अब्दुल हकीम 12 सैनिकांसोबत कारगिलच्या आजम चौकीमध्ये बसलेले होते. काही अंतरावरच काही भारतीय गुराखी त्यांची गुरं चारण्यासाठी गेले होते.

या गुराख्यांना ताब्यात घ्यावं का याविषयी पाकिस्तानी सैनिकांनी आपसांत चर्चा केली. पण कोणीतरी म्हणालं की जर त्यांना बंदीवान केलं तर ते आपलंच अन्न खातील, जे आपल्यासाठीही पुरेसं नाही. म्हणून मग या गुराख्यांना जाऊ देण्यात आलं. साधारण दीड तासानंतर हे गुराखी भारतीय सैन्याच्या 6-7 जवानांसोबत परतले.

या सैनिकांनी आपल्या दुर्बिणी रोखत त्या भागाची पहाणी केली आणि ते निघून गेले. साधारण 2 वाजण्याच्या सुमारास एक लामा हेलिकॉप्टर तिथे उडत आलं.

ते इतकं खाली आलं की कॅप्टन इफ्तेकारना त्या हेलिकॉप्टरचा पायलट स्पष्ट दिसत होता. कारगिलच्या उंच डोंगरांवर पाकिस्तानी सैनिक चढून बसले असून त्यांनी हा भाग ताब्यात घेतल्याचं तेव्हा पहिल्यांदाच भारतीय सैनिकांच्या लक्षात आलं.

'विटनेस टू ब्लंडर - कारगिल स्टोरी अनफोल्ड्स' हे कारगिलवरचं प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे पाकिस्तानी सैनाचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन यांनी बीबीसीला सांगितलं, "मी स्वतः कॅप्टन इफ्तेकार यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी परत भारतीय सैन्याचं लामा हेलिकॉप्टर तिथे आलं आणि त्यांनी आजम, तारिक आणि तशफीन चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. भारतीय हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्याची परवानगी कॅप्टन इफ्तेकार यांच्या बटालियनने मुख्यालयाकडे मागितली होती, पण त्यांना ही परवानगी देण्यात आली नाही. कारण मग यामुळे भारतीयांसाठीचं 'सरप्राईज एलिमेंट' संपलं असतं. "

भारतातलं राजकीय नेतृत्त्व अंधारात

पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्यात आली असल्याची जाणीव भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना झाली खरी, पण त्यांना असं वाटलं की हे आपण आपल्या पातळीवरच हाताळू शकतो. म्हणूनच हे राजकीय नेत्यांना सांगण्याची गरज त्यांना वाटली नाही.

Image copyright Getty Images

जसवंत सिंह यांचे पुत्र आणि इंडियन एक्स्प्रेसचे एकेकाळी संरक्षणविषयक पत्रकार असणारे मानवेंद्र सिंह सांगतात, "माझा एक मित्र तेव्हा लष्कराच्या मुख्यालयात काम करायचा. त्याने फोन करून भेटायला बोलवलं. मी त्याच्या घरी गेलो. त्याने मला सांगितलं की सीमेवर काहीतरी गडबड झाली असून घुसखोरी मोडून काढण्यासाठी एक अख्खी पलटण हेलिकॉप्टरने कोणत्यातरी कठीण जागी पाठवण्यात आलेली आहे.

ही सगळी गोष्ट सकाळी मी बाबांच्या कानावर घातली. त्यांनी तेव्हाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना फोन केला. ते दुसऱ्याच दिवशी रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यांनी तो दौरा रद्द केला. अशाप्रकारे सरकारला पहिल्यांदा या घुसखोरीबाबत समजलं."

सिचाचिनला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न

योगायोगाची गोष्ट म्हणजे भारतीय लष्कराचे प्रमुख असणारे जनरल वेदप्रकाश मलिकही त्याचवेळी पोलंड आणि झेक प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर गेलेले होते. आणि त्यांना याबाबतची माहिती पहिल्यांदा सैन्याच्या अधिकाऱ्यांकडून न कळता तिथल्या भारतीय राजदूतांकडून मिळाली.

Image copyright Getty Images

पण मग प्रश्न निर्माण होतो की लाहोर शिखर परिषदेनंतर पाकिस्तानचे सैनिक असे गुपचूप कारगिलच्या डोंगरांवर का जाऊन बसले?

इंडियन एक्स्प्रेसचे असोसिएट एडिटर सुशांत सिंह म्हणतात, "भारताचं सर्वात उत्तरेकडील टोक, जिथे सियाचिन ग्लेशियर आहे तिथे जाणारा रस्ता NH 1D रोखला तर तो भाग ताब्यात घेता आला असता. हाच हेतू होता. लडाखकडे जाणारी रसद आणि सैनिकी ताफ्यांची वाहतूक रोखू शकणाऱ्या डोंगरांवर त्यांना जायचं होतं. म्हणजे सियाचिनचा हा भाग सोडून देण्यावाचून भारताकडे पर्यायच उरला नसता."

भारताने 1984मध्ये सियाचिन ताब्यात घेतल्याचं मुशर्रफ यांना जिव्हारी लागल्याचं सुशांत सिंह म्हणतात. त्यावेळी मुशर्रफ हे पाकिस्तानच्या कमांडो फोर्समध्ये मेजर होते. ही जागा आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला होता पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत.

जेव्हा दिलीप कुमार यांनी नवाज शरीफना लाथाडलं

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर भारतीय नेतृत्त्वाच्या पायाखालची जमीन सरकली. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान असणाऱ्या नवाज शरीफ यांना फोन केला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 1999 मध्ये तत्कालीन भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसूरी आपलं आत्मचरित्र 'नीदर अ हॉक नॉर अ डव'मध्ये लिहितात, "तुम्ही माझ्याशी अतिशय वाईट वागलात अशी तक्रार वाजपेयी यांनी शरीफ यांच्याकडे केली. एकीकडे लाहोरमध्ये तुम्ही माझी गळाभेट घेत होतात आणि दुसरीकडे तुमचे लोक कारगिलच्या डोंगरांवर कब्जा करत होते. आपल्याला ही गोष्ट अजिबात माहित नसून परवेज मुशरर्फ यांच्याशी बोलून पुन्हा फोन करण्याचं नवाज शरीफ यांनी सांगितलं. तेव्हा वाजपेयी म्हणाले, माझ्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीशी बोला."

फोनवर प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा आवाज ऐकून नवाज शरीफ यांना धक्काच बसला. दिलीप कुमार यांनी त्यांना सांगितलं, "मियाँ साहेब, तुम्ही नेहमी भारत आणि पाकिस्तानमधल्या 'अमन' बाबत बोलता, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला एक सांगतो, जेव्हा भारत आणि पाकिस्तानातला तणाव वाढतो तेव्हा भारतातल्या मुसलमानाला असुरक्षित वाटायला लागतं. त्यांचं घरातून बाहेर पडणंही कठीण होतं."

रॉ ला गंधही नाही

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या गुप्तचर यंत्रणांना इतक्या मोठ्या ऑपरेशनचा अजिबात सुगावा लागला नाही.

भारताचे माजी उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तानात भारताचे माजी उच्चायुक्त असणारे सतीश चंद्रा हे नंतर तयार करण्यात आलेल्या कारगिल तपास समितीचे सदस्यही होते. ते सांगतात, "रॉ ला या सगळ्याचा गंधही नव्हता. पण मग याचा सुगावा त्यांना लागायला हवा होता का असा प्रश्न उपस्थित होतो? पाकिस्तानने यासाठी कोणतीही अतिरिक्त कुमक मागवली नाही. जर पाकिस्तानने त्यांची सैन्य दलं पुढे तैनात केली असती तर हे रॉ ला नक्कीच समजलं असतं."

पाकचा युद्धाचा मनसुबा

भारतीय सेनेने या परिस्थितीचा ज्याप्रकारे सामना केला त्यावर विविध दृष्टीकोनांतून टीका करण्यात आली. कारगिलमध्ये नंतर तैनात करण्यात आलेले माजी लेफ्टनंट जनरल हरचरणजीत सिंह पनाग म्हणतात, "मी तर म्हणेन की हा पाकिस्तान्यांचा एक जबरदस्त प्लॅन होता. रिकाम्या पडलेल्या मोठ्या भूभागावर त्यांनी पुढे येत कब्जा केला. लेह - कारगिल मार्गावर त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवलेला होता. हे त्यांचं मोठं यश होतं."

प्रतिमा मथळा माजी लेफ्टनंट हरचरणजित सिंह यांच्यासोबत बीबीसीचे रेहान फजल

लेफ्टनंट पनाग म्हणतात, "3 मेपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या सैन्याची कामगिरी 'बिलो पार' म्हणजे सुमार दर्जाची होती. मी तर असंही म्हणेन की पहिल्या महिन्यात आमची कामगिरी लाजिरवाणी होती. त्यानंतर जेव्हा 8व्या डिव्हिजनने चार्ज घेतला तेव्हा आम्हाला समजायला लागलं की या भागामध्ये नेमकं काम कसं करायचं. तेव्हा कुठे परिस्थिती सुधारायला लागली. ही मोहीम नक्कीच कठीण होती कारण डोंगरांमध्ये आम्ही खाली होतो आणि शत्रू उंचावर बसलेला होता."

पनाग ती परिस्थिती समजावून सांगतात, "म्हणजे हे असं झालं की एक माणूस शिडीवर चढून बसलेला आहे आणि तुम्ही खालून चढून त्याला उतरवण्याचा प्रयत्न करत आहात. उंच प्रदेशात ऑक्सिजन विरळ असणं ही दुसरी अडचण होती. तिसरी गोष्ट म्हणजे डोंगराळभागात आक्रमकपणे लढण्यासाठी आमच्याकडे पुरेसं ट्रेनिंग नव्हतं."

जनरल मुशर्रफ काय म्हणतात?

ही एक चांगली योजना होती आणि यामुळे भारतीय लष्कर मोठ्या अडचणीत आलं होतं, असं परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा पुन्हा बोलून दाखवलेलं आहे.

'इन द लाईन ऑफ फायर' या आपल्या आत्मचरित्रात मुशर्रफ लिहीतात, "ज्या चौक्यांवर आमचे फक्त 8-9 शिपाई होते त्या चौक्यांवर भारताच्या आख्ख्या ब्रिगेडने हल्ला केला. जूनच्या मध्यापर्यंत त्यांना यश मिळालं नाही. आपले 600पेक्षा अधिक सैनिक मारले गेले आणि 1500 पेक्षा जास्त जखमी झाल्याचं खुद्द भारताने मान्य केलं आहे. आमच्या माहितीनुसार याचा खरा आकडा जवळपास दुप्पट होता. प्रत्यक्षात भारताचे मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेल्याने शवपेट्या कमी पडल्या होत्या. आणि नंतर शवपेट्यांशी संबंधित एक घोटाळाही उघडकीस आला होता.

तोलोलिंग झालं सर, पलटली बाजी

जूनचा दुसरा आठवडा संपेपर्यंत गोष्टी भारतीय सैन्याच्या नियंत्रणात येऊ लागल्या. तेव्हा भारतीय सैन्याचे प्रमुख असणाऱ्या जनरल वेद प्रकाश मलिक यांना मी विचारलं की या लढाईतला निर्णायक क्षण कोणता? मलिक यांचं उत्तर होतं, "तोलोलिंग ताब्यात येणं. आम्ही को-ऑर्डिनेट केलेला तो पहिला हल्ला होता. हे आमचं मोठं यश होतं. ही लढाई चार-पाच दिवस चालली. ही लढाई इतक्या जवळून लढण्यात आली की दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांना शिव्या देत होते आणि ते एकमेकांना ऐकूही जात होतं.

Image copyright Getty Images

जनरल मलिक म्हणतात, "याची मोठी किंमत आम्हाला भोगावी लागली. अनेकांचा मृत्यू झाला. काय होणार या विचाराने सहा दिवस मलाही दडपण आलेलं होतं. पण तिथे विजय मिळाल्यावर आपल्या सैनिकांना आणि ऑफिसर्सना असं वाटलं की आपण यांच्यावर वरचढ ठरू शकतो"

कारगिलमध्ये एका पाकिस्तानी जवानाला हटवण्यासाठी आवश्यक होते 27 भारतीय जवान

100 किलोमीटर्सच्या परिसरात हे युद्ध झालं. इथे सुमारे 1700 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमारेषेच्या 8 ते 9 किलोमीटर आतमध्ये घुसखोरी केली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये 527 भारतीय सैनिक मारले गेले आणि 1363 जवान जखमी झाले.

ज्येष्ठ पत्रकार सुशांत सिंह सांगतात, "सैन्यात एक म्हण आहे - 'माऊंटन ईट्स ट्रूप्स' (Mountain Eats Troops). म्हणजे पर्वत सैन्याला गिळतो. जर जमिनीवर युद्ध करायचं असेल तर हल्ला करणारं सैन्य हे बचाव करणाऱ्या सैन्याच्या किमान तिप्पट असावं लागतं. पण डोंगराळ प्रदेशात ही संख्या किमान नऊपट आणि कारगिलसारख्या भागामध्ये सत्तावीस पट असायला हवी. म्हणजे जर शत्रूचा एक जवान तिथे वर बसलेला असेल तर त्याला हटवण्यासाठी तुम्हाला 27 जवान पाठवावे लागतील. त्यांना हटवण्यासाठी आधी भारताने आख्खी डिव्हीजन वापरली आणि नंतर आणखी बटालियन्सना अगदी कमी कालावधीच्या नोटीसवर या मोहिमेत उतरवण्यात आलं."

पाकिस्ताननी पाडली भारताची 2 जेट आणि 1 हेलिकॉप्टर

पाकिस्तानाच्या राजकीय नेतृत्त्वाने जर साथ दिली असती तर आज ही कहाणी वेगळी असती, असं मुशर्रफ शेवटपर्यंत म्हणत राहिले.

ते आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, " आपल्या वायुसेनेला यामध्ये उतरवत भारताने काहीसं 'ओव्हररिएक्ट' केलं. त्यांची कारवाई मुजाहिदांच्या तळांपर्यंत मर्यादित नव्हती. त्यांनी सीमारेषा ओलांडत पाकिस्तानी सेनेच्या छावण्यांवर बॉम्ब टाकायला सुरुवात केली परिणामी आम्ही त्यांचं एक हेलिकॉप्टर आणि 2 जेट विमानं पाकिस्तानी जमिनीवर पाडली."

भारतीय हवाई दल आणि बोफोर्स तोफांनी युद्धाला दिलं नवं वळण

भारताला आपली दोन मिग विमानं आणि हेलिकॉप्टर सुरुवातीला गमवावं लागलं हे खरं असलं तरी भारतीय हवाई दल आणि बोफोर्स तोफांनी पुन्हा पुन्हा पाकिस्तानी छावण्यांना गंभीरपणे 'हिट' केलं.

'फ्रॉम कारगिल टू द कूप' या आपल्या पुस्तकात नसीम जेहरा लिहितात की 'हे हल्ले इतके भयानक आणि अचूक होते की त्यांनी पाकिस्तानी चौक्यांचा चुरा केला. पाकिस्तानी सैनिक रसदीशिवाय लढत होते आणि बंदुकांची पुरेशी काळजी न घेण्यात आल्याने त्यांच्या 'छड्या'च झाल्या होत्या..'

Image copyright Getty Images

एखादं अक्रोड मोठ्या हत्याराने तोडावं त्याप्रकारे एका लहानशा भागावर शेकडो तोफांनी गोळे डागण्यात आल्याचं भारताने नंतर स्वीकारलं. कारगिलच्या या युद्धामध्ये कमांडर असणारे लेफ्टनंट जनरल मोहिंदर पुरी मानतात की कारगिलमध्ये कारगिल युद्धामध्ये वायुसेनेची सर्वात मोठी भूमिका ही मानसिक दबाव आणण्याची होती. भारतीय जेट विमानांचा आवाज वर आल्याबरोबर पाकिस्तानी सैनिक हादरून जात आणि सैरावैरा पळायला लागत.

क्लिंटन यांच्या नवाज शरीफ यांना कानपिचक्या

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून भारतीय सैनिकांनी घेतलेली पकड जुलै अखेरपर्यंत कायम होती. शेवटी युद्ध थांबवण्यासाठी नवाज शरीफ यांना अमेरिकेचे पाय धरावे लागले. 4 जुलै 1999 रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शरीफ यांच्या आग्रहास्तव क्लिंटन आणि त्यांची भेट झाली. पण वातावरण फारसं चांगलं नव्हतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिझ

क्लिंटन यांचे दक्षिण आशिया विषयक घडामोडींसाठीचे सहकारी ब्रूस रायडिल त्यावेळी तिथे उपस्थित होते. 'अमेरिकाज डिप्लोमसी अँड 1999 कारगिल समिट' या आपल्या पेपरमध्ये ते लिहितात, "मला आपल्याशी एकातांत बोलायचं आहे असं नवाज यांनी क्लिंटनना सांगितलं होतं. त्यावर क्लिंटन यांनी कोरडेपणानं सांगितलं की हे शक्य नाही. ब्रूस इथं नोट्स घेत आहे आणि या बैठकीमध्ये आपल्यादरम्यान जे संभाषण होत आहे त्याच्या तपशीलांचे रेकॉर्ड असावे असं मला वाटतं."

रायडिल पुढे म्हणतात, "क्लिंटन म्हणाले मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की जर तुम्हाला तुमचे सैनिक बिनशर्त हटवायचे नसतील, तर इथे येऊ नका. तुम्ही जर असं केलं नाहीत तर माझ्याकडे एका भाषणाचा मसूदा आधीपासूनच तयार आहे ज्यामध्ये कारगिल संकटासाठी फक्त आणि फक्त पाकिस्तानाला दोषी ठरवण्यात आलेलं आहे. हे ऐकून नवाज शरीफ यांच्या चेहऱ्याचा रंग उतरला होता."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बोफोर्स तोफा

त्यावेळच्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळामध्ये सदस्य असणाऱ्या तारिक फातिमी यांनी 'फ्रॉम कारगिल टू कूप' पुस्तकाच्या लेखिका नसीम जेहरा यांना सांगितलं की 'जेव्हा शरीफ क्लिंटन यांना भेटून बाहेर आले तेव्हा त्यांचा चेहरा उतरलेला होता. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की आता विरोध करण्याची ताकदच त्यांच्यात उरली नव्हती.' जेव्हा तिथे शरीफ क्लिंटन यांच्याशी चर्चा करत होते तेव्हा टीव्हीवर भारताने टायगर हिल ताब्यात घेतल्याची बातमी 'फ्लॅश' होत होती.

ही बातमी खरी आहे का, हे ब्रेकमध्ये नवाज शरीफ यांनी मुशर्रफ यांना फोन करून विचारलं. मुशर्रफ यांनी बातमीचं खंडन केलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)