प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन, पीडितांना भेटल्याशिवाय न परतण्याचा निर्धार

काँग्रेस ट्विटर Image copyright @congressTwitter

उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

प्रियंका यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे रस्त्यावरच धरणे आंदोलनाला बसलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

प्रियंका गांधींनी याविषयी एकानंतर एक ट्वीट करत मत मांडलं आहे.

Image copyright Twitter

"पीडितांना भेटल्यामुळे सरकार मला तुरुंगात टाकणार असेल, तर मी त्यासाठी तयार आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. खरं तर प्रशासनाची इच्छा असेल तर मी एकटीच पीडित कुटुंबीयांना भेटेल, असं मी सकाळीच स्पष्ट केलं होतं. पण असं असतानाही उत्तर प्रदेश सरकार तमाशा करत आहे. जनता सगळं काही पाहत आहे. मला पीडित आदिवासींना भेटू द्यावं, ही मागणी कायम आहे," असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.

Image copyright Twitter

संध्याकाळपासून त्या या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्या आहेत. पीडित कुटुंबाला भेटल्याशिवाय आपण परतणार नाहीत असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. पोलिसांनी त्यांना नारायणपूर येथे ताब्यात घेतलं आणि आता त्या मिर्झापूर येथील चुनार विश्राम गृहात थांबल्या आहेत.

बुधवारी एका जमिनीच्या वादातून सोनभद्रमध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 24 हून जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Image copyright Hindustan Times

प्रियंका यांनी सर्वप्रथम लखनऊमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी त्या सोनभद्रकडे जात होत्या.

याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "मला फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. मी माझ्यासोबत फक्त 4 व्यक्ती घेऊन जाईन असं सांगितलं. पण प्रशासन मला त्याचीसुद्धा परवानगी देत नाही. आम्हाला का रोखण्यात आलं, हे त्यांनी सांगावं. तोपर्यंत आम्ही इथेच शांतपणे ठाण मांडून बसणार आहोत."

"आम्ही आता झुकणार नाही. आम्ही शांतपणे पीडित कुटुंबीयांना भेटायला जात होतो. आता मला कुठे नेण्यात येत आहे, हे मला माहीत नाही. ते आम्हाला कुठेही नेणार असले तरी आम्ही जायला तयार आहोत," असं त्यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं.

'काँग्रेसला संघर्षाशिवाय पर्याय नाही'

प्रियंका गांधींच्या या भूमिकेविषयी ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, "काँग्रेस पक्ष आता पराभवातून बाहेर पडत आहे. 25 जुलैला राहुल गांधींनी राजीनामा देऊन 2 महिने होतील. अध्यक्ष कोण, यातून पक्ष बाहेर पडत आहे. आता संघर्षाशिवाय नाही, असं पक्षाला जाणवलं आहे आणि तो संघर्ष प्रियंका गांधींनी सुरू केला आहे. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनोधैर्य वाढण्यास मदत होईल."

"संकट काळात संघर्ष करायचा असतो आणि काँग्रेसनं आता संघर्षाला सुरुवात केली आहे. प्रियंका गांधींचा करिश्मा आहेच, पण राहुल गांधी अध्यक्ष असो अथवा नसो प्रियंका गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष आता वाटचाल करत आहे," केसरी पुढे सांगतात.

'इंदिरा गांधींशी तुलना पुरेशी नाही'

प्रियंका गांधींच्या या आंदोलनाची तुलना इंदिरा गांधींनी जनता सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाशी होत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक प्रतिक्रिया पडत आहेत.

ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या मते, "या आंदोलनामुळे प्रियंका गांधींची इंदिरा गांधींबरोबर तुलना होत आहे. पण, 1977 ते 2019मध्ये फरक आहे. काळ बदलत चालला आहे. दुसरीकडे भाजपचं एक मॉडेल आहे. जे आदिवासी आणि दलितांना भाजपकडे आकर्षित आहे. त्यामुळे प्रियंका गांधी इंदिरा गांधींसारख्या दिसतात म्हणून काँग्रेसनं हुरळून जायला नको. ही तुलना पुरेशी नाही."

"2019च्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात असल्यास प्रियंका गांधींची कामगिरी काँग्रेससाठी फार सकारात्मक राहिली नाही. त्यामुळे काँग्रेसनं संघर्ष करण्यावाचून दुसरा पर्याय नाही," किडवई सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)