प्रीतम मुंडे, रक्षा खडसे यांना लोकसभेत शेतीप्रश्नाच्या चर्चेदरम्यान हसू अनावर, माध्यमांशी बोलण्यास नकार

लोकसभेत भारती पवार भाषण करत असताना रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना हसू आवरत नव्हतं. Image copyright LokSabha TV
प्रतिमा मथळा लोकसभेत भारती पवार भाषण करत असताना रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना हसू आवरत नव्हतं.

भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार या 16 जुलैला लोकसभेत शेतकरी कर्जमाफीचा विषय सुरू असताना भाषण करत होत्या.

"मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. सध्या पाण्यावरून गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यात वाद आहेत. त्यामुळे पुढच्या काळात यावर लक्ष देणं गरजेचं आहे," असं त्या लोकसभेत म्हणाल्या.

तेव्हा त्यांच्या मागच्या बेंचवर बसलेल्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं.

काय बोलत होत्या भारती पवार?

"शेतकरी हा कृषी व्यवस्थेचा आत्मा आहे. ग्रामीण भागाच्या आणि कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच होऊ शकत नाही. माझी विनंती आहे की, ग्रामीण भागामध्ये गावस्तरावर एखाद्या कुटुंबाचा बेसिक डाटा उपलब्ध करण्यात यावा. सातबाऱ्याचं संगणकीकरण वेगानं करण्यात यावं. शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सोलारचे प्रोजेक्ट जास्तीत जास्त देणे गरजेचे आहे. शेतकरी सन्मान योजना, मुद्रा लोन योजना यात काही अडचणी येत आहेत, यात लक्ष द्यायला पाहिजे."

"मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. सध्या पाण्यावरून गावागावात जिल्ह्याजिल्ह्यात वाद आहेत. त्यामुळे पुढच्या काळात यावर लक्ष देणं गरजेचं आहे," असं पवार पुढे म्हणाल्या.

समोर पवार यांचं भाषण सुरू होतं मात्र प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं. त्या अक्षरश: बेंचखाली जाऊन हसत होत्या.

त्यांना नेमकं कशामुळे हसू येत होतं, हे जाणून घ्यायचा बीबीसीने प्रयत्न केला. तेव्हा रक्षा खडसे यांनी "मला याविषयी काहीही बोलायचं नाहीये," असं सांगितलं.

तर प्रीतम मुंडे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

Image copyright TWITTER
प्रतिमा मथळा रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे

या घटनेवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. गॅरी कदम यांनी म्हटलं आहे की तरुण खासदारांनी जास्त गांभीर्याने वागण्याची गरज आहे.

Image copyright Social Media ScreenGrab

जर तरुण खासदार सभागृहात हसले तर त्यात इतकं गजहब करण्यासारखं काय आहे, असा सवाल शैलेश डमाळे यांनी विचारला आहे.

Image copyright Social media screen grab

'आता हसायला पण परवानगी घ्यायची का? प्रीतम मुंडे व रक्षा खडसे उच्चशिक्षित व तरुण नेतृत्व अशून त्यांनीही आजपर्यंत संसदेत जनतेच्या समस्या मांडल्या आहेत. त्याचं कार्यही चांगलं आहे, काहीतरी कारणास्तव त्या हसल्या असतील त्यात एवढे सीरिएस घेण्याजोगे काय आहे?' असं डमाळे म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)