राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात? #5मोठ्याबातम्या

शरद पवार Image copyright Getty Images

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेया बातम्यांपैकी या आहेत पाच मोठ्या बातम्या :

1) राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी लोकसभेच्या चार जागा जिंकण्यासह चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मतं पक्षाला मिळणं गरजेचं असतं. यासह आणखी काही अटी असतात.

सध्या भारतात भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे आठ राष्ट्रीय दर्ज असलेले पक्ष आहेत.

राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकपचा दर्जा काढून घेतल्यास पाचच राष्ट्रीय पक्ष देशात उरतील.

2) भारत निर्वासितांची राजधानी बनू शकत नाही : केंद्र सरकार

अवैध स्थलांतरितांसाठी देशात जागा नाही. भारत निर्वासितांची जगातील राजधानी बनू शकत नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (NRC) अंतिम यादी तयार करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्र सरकार आणि आसाम सरकारने सुप्रीम कोर्टात केली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. आर. एफ. नरीमन यांच्या खंडपीठासमोर मांडली.

3) EVMच्या विरोधासाठी राज ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार?

EVM विरोधातील विरोधकांचा आवाज येत्या क्रांतिदिनी (9 ऑगस्ट) एकत्रितरीत्या घुमणार असल्याचे संकेत आहेत. EVMला विरोध करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी मोर्चा काढला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही विरोधकांनी EVMवर शंका व्यक्त केली होती. EVM विरोधात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे दारही ठोठावले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हेही एकत्र येणार असल्याने मोर्चाची उत्सुकता वाढली आहे.

4) IMA घोटाळ्याचे आरोपी मन्सूर खान यांना EDकडून अटक

आय मॉनेटरी अॅडव्हाझरी (IMA) ग्रुपचे संस्थापक मन्सूर खान यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) दिल्ली विमानतळावर अटक केली. द हिंदूने ही बातमी दिली आहे.

गुंतवणूकदारांना 2,500 कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपांमुळे मन्सूर खान यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

मन्सूर खान यांनी दुबईतून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, ज्यात त्यांनी देश सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

5) अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही, मात्र स्ट्रक्चरल ऑडिट होणार

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही. त्या दृष्टीने कोणता विचार किंवा हालचालीही नाहीत. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट करून मूर्तीचे आयुर्मान तपासणार, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केलं. लोकमतनं ही बातमी दिली.

Image copyright TWITTER/@MahaMicHindi

अंबाबाईची मूर्ती दुखावली आहे, तिचे दोनवेळा संवर्धन झाले आहे. त्यामुळे काही व्यक्ती, संस्था सातत्याने मूर्ती बदलण्याबाबत समितीकडे निवेदनं देत असतात. मात्र, मूर्ती बदलणं हा मोठा विषय असल्याचंही महेश जाधव म्हणाले.

मूर्ती बदलण्याचा निर्णय एकटी देवस्थान समिती घेऊ शकत नसल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)