दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन

शीला दीक्षित Image copyright Getty Images

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 या कालावधीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव राजकीय नेत्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना एस्कॉर्टस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आज दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 11 मार्च 2014 ते 25 ऑगस्ट 2014 या कालावधीमध्ये त्या केरळ राज्याच्या राज्यपालही होत्या. 2017 साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळेस त्या काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार होत्या. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात त्या दिल्ली काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यांनी ईशान्य दिल्लीमधून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यांना भाजपाच्या मनोज तिवारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

1984 ते 1989 या कालावधीमध्ये त्या उत्तर प्रदेशातील कन्नोज मतदारसंघाचं त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. या कार्यकाळात त्यांनी संसदीय कार्य राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. 1998 साली त्या दिल्ली विधानसभेत निवडून गेल्या आणि मुख्यमंत्री झाल्या.

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या विनोद दीक्षित यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विनोद दीक्षित कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल उमाशंकर दीक्षित यांचे पुत्र होते. शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मेट्रोचं जाळं अधिकाधिक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. हा फोटो 25 मे 2012 रोजी त्यांनी मंडी हाऊस मेट्रो स्टेशनला दिलेल्या भेटीच्यावेळचा आहे. सेंट्रल सेक्रेटरिएट ते काश्मीरी गेट या मेट्रोमार्गाची पाहाणी केल्यावर डीएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

शीला दीक्षित यांचं निधन झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी, राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, "शीला दीक्षित यांच्या निधनाची वार्ता ऐकून आपल्याला दुःख झालं", असं ट्वीट केलं आहे. "शीला दीक्षित यांच्या कार्यकाळामध्ये दिल्लीमध्ये अनेक बदल झाले, ते नेहमीच स्मरणात राहातील. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि सहकाऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत", अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संपूर्ण आयुष्यभर त्या काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या राहिल्या अशी भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना असं काँग्रेसने ट्वीट केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, "शीला दीक्षित यांच्या निधनामुळे आपल्याला दुःख झाले असून दीक्षित यांच्याशी आपले वैयक्तिक नातं होतं. त्यांचे कुटुंबीय, दिल्लीवासीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत", असं ट्वीट केलं आहे.

"शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले होते", असं ट्वीटरवर लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, "शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीचं मोठं नुकसान झालं असून त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच लक्षात राहिल", असं ट्वीट केलं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, "एका राजकीय युगाचा अस्त झाला. त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. गेली 40 वर्षे आम्ही एकमेकांना ओळखत होतो." अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही त्यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली आहे.

दिल्लीला जागतिक दर्जाची राजधानी बनवण्यात सिंहाचा वाटा - पृथ्वीराज चव्हाण

शीला दीक्षित यांच्या निधनावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. "उत्तम प्रशासक आणि लोकप्रिय नेता आपण गमावला असल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली. सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या त्या दिल्लीच्या एकमेव नेत्या तर होत्याच पण त्याचबरोबर दिल्लीला जागतिक दर्जाची आधुनिक राजधानी बनवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता", अशा शब्दांमध्ये चव्हाण यांनी शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण बीबीसी मराठीशी बोलताना सांगितली.

"त्या एक उत्तम प्रशासक होत्या आणि लोकप्रिय नेता होत्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी त्या काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होत्या. एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्याची ही इतिहासातली पहिली घटना होती. त्यांनी दिल्लीमध्ये पक्ष संघटना मजबूत केली. सर्व गटांना आणि घटकांना एकत्र घेऊन, त्यांचे मतभेद दूर करून त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं, त्यांना सांभाळलं", असं चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)