पी. राजगोपाल: इ़डली-डोसा विकून साम्राज्य उभं करणाऱ्या व्यावसायिकाचा उदयास्त

सर्वण भवन Image copyright Getty Images

अत्यंत गरीब घरात जन्म, हॉटेलमध्ये टेबलं पुसायचं काम करून पोट भरणं, मग स्वतःचं हॉटेल काढून त्याच्या शाखा केवळ वीस वर्षांमध्ये जगभर सुरू करायच्या, दोन लग्नं करूनही आपल्याच कर्मचाऱ्याच्या मुलीला लग्नाची मागणी घालणं, तिला थेट उचलून आणणं, तिच्या नवऱ्याला ठार मारणं हे सगळे प्रसंग ऐकले की एखाद्या सिनेमाची कहाणी ऐकतोय असं तुम्हाला वाटेल.

पण हे सगळं एकाच माणसाच्या आयुष्यात झालं आहे. ती व्यक्ती म्हणजे पी. राजगोपाल. इडली-डोशांसारखे दाक्षिणात्य पदार्थ न्यूयॉर्कपासून ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचवणारे हे राजगोपाल 'डोसाकिंग' नावानं ओळखले जायचे. नुकतंच त्यांचं निधन झालं.

'सर्वण भवन' या प्रसिद्ध हॉटेल चेनचे ते मालक होते. सर्वण भवन आणि पी. राजगोपाल असं एक परफेक्ट समीकरण तयार झालं होतं.

तुम्ही भारतीय असा किंवा अनिवासी भारतीय अथवा परदेशी नागरिक जगातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये राहात असताना सांबार-रसमचे भुरके मारायची इच्छा झाली किंवा खास 'मद्रास फिल्टर कॉफी' प्यावी वाटली तर त्याची व्यवस्था या माणसाने करून ठेवली होती.

त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ जितका थक्क करायला लावणारा, प्रेरणादायी वाटतो तितका त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध एका गुन्ह्यामुळे झाकोळून काळाकुट्ट होऊन गेला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोशाचे प्रातिनिधिक चित्र

त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीच्या पतीच्या हत्येच्या गुन्ह्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, ही शिक्षा दहा दिवसही न भोगता हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.

'चेन्नई ते जर्मनी' सगळीकडे हॉटेल्स

पी. राजगोपाल यांची सर्वण भवनचे संस्थापक एवढी ओळख पुरेशी नाही. हॉटेलमध्ये टेबलं पुसण्यापासून सुरुवात करणाऱ्या पी. राजगोपाल यांनी पुढे सर्वण साम्राज्य उभं केलं. सर्वणच्या भारतात 25हून जास्त शाखा आहेत. यातल्या 20 शाखा तर एकट्या चेन्नईत आहेत.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा सर्वण भवनच्या जगभरात 80 शाखा आहेत.

एवढंच नाही तर परदेशातही न्यूयॉर्क, दुबई, लंडन, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी 80 हून अधिक शाखा आहेत.

'सर्वण'ने इडली, डोसा, वडा आणि कॉफी ही भारतीयांची ओळख बनवली. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना सर्वणने शाकाहारी भोजनाला मान मिळवून देत क्रांती घडवल्याचं राजगोपाल यांचे विरोधकही मान्य करतात. मात्र, ज्योतिषशास्त्रावर असलेल्या अंधविश्वासामुळे झालेला त्यांचा उदयास्त झाला. अहंकार आणि पैशाची हाव या सर्वांमुळे त्यांच्या सोनेरी यशावर गुन्ह्यानं काजळी धरली.

'सर्वण साम्राज्या'चा उदय

स्वातंत्र्यप्राप्तीच्या दहा दिवस आधी तामिळनाडूतल्या तुतीकोरीन जिल्ह्यातल्या पुन्नाईआडी या छोट्याशा एका झोपडीवजा घरात त्यांचा जन्म झाला. सातवीनंतर त्यांनी शाळा आणि घर सोडलं असं राजगोपाल यांनी स्वतःच पुस्तकात लिहून ठेवलं आहे.

दूरच्या एका लहानशा शहरातल्या एका हॉटेलमध्ये ते टेबलं पुसण्याचं काम करू लागले. धबधबा म्हणजे त्यांचं न्हाणीघर आणि हॉटेलच्या स्वयंपाकघरातली लादी म्हणजे पलंग, असं त्यांचं आयुष्य सुरू झालं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

थोडं मोठं झाल्यावर त्यांनी चेन्नईत (तेव्हाचं मद्रास) जाण्याचा निर्णय घेतला. 1968 साली शहराच्या बाहेरच एक छोटं किराणामालाचं दुकान उघडलं.

1979 मध्ये त्यांच्या दुकानात एक गिऱ्हाइक आलं. गप्पांच्या ओघात तो माणूस म्हणाला, "बाहेर जेवायचं असेल तर थेट दूरच्या टी नगरमध्ये जावं लागतं कारण के. के. नगरमध्ये एकही हॉटेल नाही." राजगोपाल यांनी त्याची नोंद मनामध्येच करून ठेवली.

त्याकाळात बाहेर जाऊन खाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे हॉटेल्सची संख्या खूपच कमी होती. अगदी राजधानीच्या मद्रास शहरातदेखील तुरळकच हॉटेल्स होती. राजगोपाल यांचं किराणामालाचं दुकानही तोट्यात होतं. त्यांच्यावर कर्ज झालं होतं.

अखेर एका ज्योतिष्याने त्यांना सांगितलं की त्यांनी 'अग्नी'शी संबंधित एखादा व्यवसाय सुरू करावा. हा सल्ला आणि त्या ग्राहकाचं बोलणं ऐकून राजगोपाल यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

Image copyright Getty Images

1981 साली त्यांनी के. के. नगरमध्ये पहिलं हॉटेल उघडलं. आपल्या पुस्तकात ते म्हणतात, एका सल्लागाराने त्यांना स्वस्त भाजीपाला वापरण्याचा आणि कर्मचाऱ्यांना शक्य तेवढा कमी पगार देण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते कर्मचाऱ्यांचे लाड करायचे नाहीत. त्यांना हा सल्ला आजिबात आवडला नाही आणि त्या सल्ला देणाऱ्यालाच कामावरून काढून टाकलं.

राजगोपाल यांनी हॉटेलमध्ये नारळाचं तेल आणि ताज्या भाज्याच वापरल्या. शिवाय कर्मचाऱ्यांना चांगला पगारही दिला. मात्र, यामुळे त्यांना सुरुवातीलाच दहा हजार रुपयांचं नुकसान झालं. कारण त्यावेळी त्यांच्या हॉटेलात पदार्थांच्या किंमती एक रुपयाच असे.

पण असं असलं तरी लवकरच त्यांच्या पदार्थांची चव लोकांना चांगलीच आवडली. त्यांच्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी लोक लांबून येऊ लागले आणि त्यांच्या व्यवसायाने वेग पकडला.

कर्मचाऱ्यांसाठी 'सबकुछ'

भारतीय व्यावसायिकांमध्ये अभावानेच असणारा एक गुण राजगोपाल यांच्याकडे होता, तो म्हणजे कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा.

कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या. त्यांना नाना प्रकारचे भत्ते मिळायचे. नफा वाढला तसा त्यांनी कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा द्यायला सुरूवात केली.

मोफत आरोग्य तपासणी, घरासाठी भत्ता, कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी निधी. या सर्वामुळे ते कर्मचाऱ्यांचे 'अन्नाची' झाले. अन्नाची म्हणजे तामिळ भाषेत 'मोठा भाऊ'.

Image copyright Getty Images

न्यू यॉर्क टाईम्सने 2014 साली राजगोपाल यांच्याविषयी एक लेख छापला होता. न्यू यॉर्क टाईम्सच्या पत्रकाराने राजगोपाल यांच्या एका कर्मचाऱ्याने विचारलं, "तुमचे भत्ते काढून घेतले तर..." त्यावर त्या कर्मचाऱ्याचं उत्तर होतं, "आजवर भत्ते वाढतच आले आहेत." दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितलं, "कंपनीने त्यांना मोबाईल फोन आणि मोटरबाईकही दिली आहे. मोटरबाईकसाठी लागणाऱ्या पेट्रोलसाठीही भत्ता मिळतो." या मोटरबाईक दुरुस्तीसाठी कंपनीच मेकॅनिकचीही सुविधा देते. कंपनीने केवळ एक भत्ता रद्द केला होता आणि तो होता केस कापण्यासाठीचा भत्ता.

एक कर्मचारी म्हणाला, "माझा एक मित्र मला गमतीने म्हणाला होता तुमची कंपनी तुमची इतकी काळजी घेते की तुमचा पगार केवळ बँकेत ठेवण्यासाठीच होत असेल."

राजगोपाल यांनी त्यांच्या पुन्नाईआडी गावाचाही कायापालट केला. लाखो रुपये खर्च करून भव्य मंदिर उभारलं. त्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ असते.

इतकंच नाही तर जेमतेम 90 घरं असलेल्या या छोट्याशा गावात त्यांनी 'सर्वण हॉटेल'ही सुरू केलं. चार एकरांवर सर्वण भवन उभारलं आहे. गावात झालेल्या प्रगतीमुळे पुन्नाईआडी आता पुन्नाई नगर म्हणून ओळखलं जातं.

प्रसिद्धीची हाव आणि घसरण

एकीकडे यश मिळत असताना त्यांच्या स्वभावातही एक प्रकारचा अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा बिंबत गेली. त्यात ज्योतिषशास्त्राच्या नादाने त्यांचा घात झाला. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं तर तुमची अधिक भरभराट होईल, असा सल्ला त्यांना एका ज्योतिषाने दिला. इथे त्यांचं लक्ष सर्वणमध्ये असिस्टंट मॅनेजर असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या लहान मुलीकडे, म्हणजे जीवाज्योती हिच्याकडे वळलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

परंतु, राजगोपाल यांचं 1972 साली पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पत्नीपासून त्यांना शिवाकुमार आणि सर्वनन अशी दोन मुलं होती. त्यानंतर 1994 साली त्यांनी दुसरं लग्न केलं. तेही सर्वणमधल्याच एका कर्मचाऱ्याच्या मुलीशीच.

1999 मध्ये त्यांनी जीवज्योतीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिनं नकार दिला. ती तिच्या भावाला शिकवणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली होती. त्याच नाव संतकुमार... पुढे दोघांनी लग्न केलं. मात्र, तरीही राजगोपाल यांच्या मनातून तिच्याशी लग्न करण्याचा विचार गेला नव्हता.

ते तिला दागिने द्यायचे, कपडे द्यायचे. इतकंच नाही तर स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करण्यासाठी अधून मधून पैसेही द्यायचे. जीवज्योतीने राजगोपाल यांच्याकडून सर्व भेटवस्तू स्वीकारल्या असल्या तरी लग्नाला तिने कायमच नकार दिला होता.

28 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री राजगोपाल जीवज्योतीच्या घरी गेले आणि दोन दिवसात लग्न मोडण्याची धमकी दिली. पुढे 2001 साली ऑक्टोबर महिन्यात संतकुमारचा खून झाला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

एकीकडे हे सर्व सुरू असताना तिकडे सर्वण भवनच्या शाखांचा विस्तार होत होता. 2000 साली सर्वणने परदेशात म्हणजे दुबईत पहिली शाखा उघडली. 2003 साली कॅनडा, मलेशिया आणि ओमानमध्ये सर्वणच्या शाखा उघडल्या आणि त्याच वर्षी राजगोपाल पहिल्यांदा तुरुंगात गेले. 2004 साली चेन्नईच्या सत्र न्यायालयाने त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2004 साल संपेपर्यंत 'सर्वण'ने जगभरात 29 शाखा उघडल्या होत्या.

इकडे राजगोपाल यांना तुरुंगात जाऊन आठ महिने झाले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणावरून त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.

सत्र न्यायालयाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र, उच्च न्यायालयाने शिक्षा वाढवत जन्मठेप सुनावली. यानंतर पुन्हा तुरुंगात रवानगी झाली. मात्र, तीन महिन्यांनंतर पुन्हा जामीन मिळाला आणि ते सर्वोच्च न्यायालयात गेले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयानेही मार्च 2019 मध्ये उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत जन्मठेप सुनावली.

कशी झाली होती हत्या ?

कोर्टाच्या निकालात म्हटल्याप्रमाणे या धमकीनंतर दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजगोपाल यांच्या पाच लोकांनी त्यांना अडवलं आणि अॅम्बेसेडर गाडीत कोंबून त्यांना के. के. नगर इथल्या वेअरहाऊसमध्ये घेऊन गेले. तिथे राजगोपालही गेले आणि त्यांनी संतकुमारला एक ठोसा मारला.

जीवज्योती राजगोपाल यांच्या पायावर पडली आणि संतकुमारला सोडण्यची विनवणी करू लागली. मात्र, राजगोपालने आपल्या माणसांना त्याला दुसऱ्या खोलीत नेऊन बेदम मारहाण करण्याचा आदेश दिला.

या जोडप्याला एकप्रकारे नजरकैदेतच ठेवण्यात आलं होतं. पण त्यांनी त्या घरातून पळ काढला थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. सहा दिवसांनंतर राजगोपाल यांच्या माणसांनी पुन्हा एकदा दोघांना शोधून काढलं. जीवाज्योतीला राजगोपाल यांच्यासोबत एका मर्सिडिज गाडीतून पाठवण्यात आलं. त्यानंतर संतकुमारला दुसरीकडे नेण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा (प्रातिनिधिक छायाचित्र)

दोन दिवसांनंतर तिला संतकुमारचा फोन आला आणि त्याने सांगितलं की राजगोपाल यांनी त्यांच्या डॅनिअल नावाच्या माणसाला त्याचा खून करण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते. मात्र, डॅनिअलने तसं न करता संतकुमारला मुंबईला पळून जायला सांगितलं. हे सर्व सांगितल्यावर जीवज्योतीने त्याला घरी यायला सांगितलं.

त्या रात्री ते दोघं, जीवज्योतीचे वडील आणि भाऊ सर्वण मुख्यालयात राजगोपाल यांना भेटायला गेले. तिथे राजगोपाल यांनी त्यांना शेजारच्या खोलीत बसायला सांगितलं आणि डॅनिअलला बोलावून संतकुमारचं काय झालं? असं विचारलं.

डॅनिअलने आपण संतकुमारला रेल्वेरुळावर बांधलं आणि एक गाडी त्याच्यावरून गेली. त्यानंतर आपण त्याचे कपडे जाळले, असं खोटं सांगितलं. हे ऐकताच राजगोपाल यांनी सर्वांना आत बोलावलं. संतकुमारला बघून आपलं पितळ उघडं पडतंय हे डॅनिअलला दिसलं. त्याचा राग अनावर झाला आणि हे संतकुमारचं भूत असल्याचा कांगावा करत त्याला जोरजोरात मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्या सर्वांना एका व्हॅनमध्ये बसवून 'भूताटकी उतरवण्यासाठी' कुठेतरी नेण्यात आलं.

दोन दिवसांनंतर 31 ऑक्टोबर रोजी कोडाईकनालमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन अहवालात श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचं निदान करण्यात आलं. पुढे तो मृतदेह संतकुमारचा असल्याचं सिद्ध झालं.

सर्वोच्च न्यायालयाने राजगोपाल यांना शरण येण्यासाठी 100 दिवसांची म्हणजे 7 जुलै 2019 पर्यंतची मुदत दिली. तिथेही त्यांनी प्रकृतीचं कारण देत जामीन मागितला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला.

Image copyright PTI

अखेर 9 जुलै रोजी पी. राजगोपाल यांनी अॅम्ब्युलन्समधून येत शरणागती पत्करली. त्यांना आधी सरकारी आणि मग खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे 18 जुलैला त्यांना हार्ट अटॅक आला आणि अशा प्रकारे जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर एकही रात्र तुरुंगात न घालवता राजगोपाल यांचं निधन झालं.

ज्या वेगाने त्यांचा उत्कर्ष झाला त्याहून अधिक वेगाने त्यांचा अंत झाला. हे प्रकरण दक्षिण भारतात विशेषतः चेन्नईत खूप गाजलं. मात्र, त्याचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला का? नाही. सर्वणाचा ग्राहक कमी झाला नाही. उलट तो वाढतच गेला. त्यांच्या मृत्यूची बातमी आली त्या दिवशीही देशासह जगभरातल्या त्यांच्या हॉटेलमध्ये काम रोजच्याप्रमाणेच सुरू होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

Related Topics