शीला दीक्षित वयाच्या 15 व्या वर्षी नेहरूंना भेटण्यासाठी पायी गेल्या तेव्हा...

शीला दीक्षित Image copyright citizen delhi My times

चॉकलेट हिरो देवानंद भारतीय तरूणींच्या मनावर राज्य करत होता, त्यावेळची ही गोष्ट आहे. पहिलं कार्बोनेटेड ड्रिंक 'गोल्ड स्पॉट' भारतीय बाजारात दाखल झालं होतं. अजून टीव्हीचं युग सुरू झालं नव्हतं.

रेडिओवरसुद्धा निवडक कार्यक्रम प्रसारित होत असत. एके दिवशी 15 वर्षांची मुलगी शीला कपूर हिने ,पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भेटण्यासाठी त्यांच्या तीनमूर्ती निवासस्थानी जायचा निर्णय घेतला. ती डुप्ले लेनच्या आपल्या घरातून निघाली. पायीच ती तीनमूर्ती भवनला पोहोचली.

गेटवर उभ्या असलेल्या एकमेव दरवानाने तिला विचारलं, "कुणाला भेटायचं आहे?"

शीलाने उत्तर दिलं, "पंडितजींना."

तिला आत जाण्याची परवानगी मिळाली.

त्यावेळी जवाहरलाल नेहरू आपल्या पांढऱ्या अँबेसेडर कारमध्ये बसून बाहेर निघण्याची तयारी करत होते.

Image copyright citizen delhi: My times, My life
प्रतिमा मथळा शीला दीक्षित (गडद रंगाच्या साडीमध्ये)आपल्या बहिणींसोबत

शीला यांनी हात हलवून त्यांना अभिवादन केलं. नेहरूंनीही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं.

तुम्ही आजच्या काळात पंतप्रधानांचं राहू देत, एका आमदाराच्या घरीसुद्धा अशा प्रकारे जाण्याचा प्रयत्न कराल का?

शीला कपूर यांनी विचारसुद्धा केला नसेल की ज्या व्यक्तीने उत्स्फूर्ततेने त्यांच्या अभिवादनाला प्रत्युत्तर दिलं, पुढे जाऊन त्यांच्याच नातवाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश असेल.

भांडण मिटवताना मिळाला जोडीदार

दिल्ली विश्वविद्यापीठात प्राचीन इतिहासाचं शिक्षण घेणाऱ्या शीला आणि विनोद दीक्षित यांची भेट झाली. ते काँग्रेसचे बडे नेते उमाशंकर दीक्षित यांचे पुत्र होते.

शीला दीक्षित सांगतात, आम्ही इतिहासाच्या एमएच्या वर्गात सोबत शिकत होतो. मला ते इतके चांगले वाटले नव्हते. ते स्वतःला काय समजत होते काय माहीत, त्यांच्या स्वभावात एक अहंकार होता.

त्यांनी सांगितलं, "एकदा आमच्या मित्रांमध्ये गैरसमज झाले होते. ते मिटवताना आम्ही एकमेकांच्या जवळ आलो."

शीला दीक्षित यांनी सांगितलं होतं, "आम्ही दोघं डीटीसीच्या 10 नंबर बसमध्ये बसलो होतो. चांदनी चौकात अचानक विनोद मला म्हणाले की मी आईला भेटायला चाललो आहे. मला लग्नासाठी योग्य अशी मुलगी मिळाली. "

मी विचारलं, "तू त्या मुलीला याबाबत विचारलंस का?"

Image copyright CITIZEN DELHI: MY TIMES, MY LIFE

तेव्हा विनोद म्हणाले होते, "नाही, पण ती मुलगी यावेळी माझ्या बाजूला बसलेली आहे."

शीला दीक्षित यांनी सांगितलं, "मी हे ऐकून अवाक झाले. त्यावेळी काहीच बोलले नाही. पण घरी गेल्यानंतर आनंदाने खूप नाचले. मी त्यावेळी माझ्या आई-वडिलांना काहीच सांगितलं नाही. कारण त्यांनी विचारलं असतं की मुलगा काय करतो."

मी काय बोलले असते, "विनोद अजून शिक्षण घेत आहेत?"

सासऱ्यांनी बाथरूममध्ये कोंडून ठेवलं

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कोलकात्याहून राजीव गांधी यांच्यासोबत प्रणव मुखर्जी आणि शीला दीक्षित विमानाने येत होते.

शीला यांनी याबाबत लिहून ठेवलं आहे. त्यांनी लिहिलं होतं, "इंदिराजींच्या हत्येची बातमी सर्वप्रथम माझे सासरे उमाशंकर दीक्षित यांना मिळाली होती. त्यावेळी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. विंसेंट जॉर्ज यांच्या फोननंतर त्यांना माहिती मिळाली. मी याविषयी कुणालाच काही सांगू नये म्हणून त्यांनी मला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं."

जेव्हा शीला दीक्षित दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसल्या तेव्हा राजीव गांधींनासुद्धा या घटनेची माहिती नव्हती. अडीच वाजता ते कॉकपीटमध्ये गेले. नंतर बाहेर येऊन त्यांनी इंदिराजींचं निधन झाल्याचं सांगितलं.

Image copyright CITIZEN DELHI/ MY TIMES, MY LIFE

शीला दीक्षित सांगत होत्या, आम्ही सर्वजण विमानाच्या मागच्या बाजूला होतो. राजीव गांधींनी विचारलं अशा स्थितीत काय करण्याची तरतूद आहे. प्रणव मुखर्जींनी उत्तर दिलं, पूर्वीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ज्येष्ठ मंत्र्याला काळजीवाहू पंतप्रधान बनवलं जातं. नंतर पंतप्रधानांची कायदेशीररित्या निवड होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर काय केलं?

राजीव गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी शीला दीक्षित यांना मंत्रिमंडळात घेतलं. पहिल्यांदा संसदीय कार्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री पदाचा त्यांना कार्यभार देण्यात आला. 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांना दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवलं.

शीला यांनी निवडणुकीत विजय तर मिळवलाच पण 15 वर्षे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीही राहिल्या.

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मेट्रो, सीएनजी आणि दिल्लीची हिरवळ, शाळा आणि रुग्णालयांसाठी काम करणं हे त्यांचं प्रमुख यश आहे.

त्यांनी सांगितलं होतं, "या सगळ्या गोष्टींनी दिल्लीकरांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव टाकला. मासिक पाळीमुळे मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून मी पहिल्य़ांदा सॅनिटरी नॅपकीन वाटले होते. मी दिल्लीत अनेक विद्यापीठं आणि आयआयटी संस्था सुरु केली."

जेव्हा झाली फ्लॅटची तपासणी

शीला दीक्षित तीन वेळा मुख्यमंत्री बनल्यानंतरसुद्धा स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती.

दिल्ली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रामबाबू गुप्त यांनी त्यांच्या निझामुद्दीन पूर्व परिसरातील फ्लॅटच्या तपासणीचे आदेश दिले. त्यामध्ये बांधकाम नियमांचं उल्लंघन झाल्याबाबत चौकशी करण्यास सांगितलं होतं.

दीक्षित म्हणाल्या होत्या, "दिल्ली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्य़ा घरात येऊन चौकशी केली होती."

त्यांनी पुढे सांगितलं होतं, "त्यांना काहीही मिळालं नाही म्हणून माझ्या फ्लॅटची कागदपत्रे मागितली. तीसुद्धा त्यांना मी दिली. हे सगळं मी मुख्यमंत्री असताना घडलं. राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं हे यातून दिसतं."

त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांदरम्यान एक पंचाईत झाली होती. खेलग्रामच्या बाजूला असलेल्या अक्षरधाम मंदिरच्या पुजारींनी त्याठिकाणी फक्त शाकाहारी भोजन बनवावं, अशी मागणी केली.

शीला दीक्षित यांनी सांगितलं, "स्वामीनारायण मंदिराच्या पुजाऱ्यांना दुसऱ्या महिलांकडे पाहण्याची परवानगी नाही. तरीसुद्धा ते माझ्याकडे आले होते. त्यांना दुसऱ्या खोलीत बसवण्यात आलं. त्यांना काहीही सांगायचं असेल तर एक संदेशवाहक या खोलीतून त्या खोलीत संदेश पाठवत होता."

दीक्षित यांनी पुढे सांगितलं होतं, "त्यांनी शाकाहारी जेवण बनवण्याची विनंती मी फेटाळून लावली. यामुळे भारताची बदनामी झाली असती. पण खेलग्राममध्ये निर्माण झालेला कचरा तातडीने दुसऱ्या मार्गाने बाहेर काढला जाईल, असं आश्वासन मी दिलं."

शीला दीक्षित : स्ट्रिक्ट आई

शीला दीक्षित यांना दोन मुले आहेत. ज्येष्ठ सुपुत्र संदीप दीक्षित यांनी लोकसभेत पूर्व दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं आहे.

त्यांची मुलगी लतिका सांगते, "आम्ही लहान असताना अम्मा खूप स्ट्रीक्ट होती. आम्ही काही चुकीचं केलं तर ती नाराज व्हायची. ती आम्हाला बाथरूममध्ये बंद करायची. पण तिनं आमच्यावर कधीच हात उचलला नाही. अभ्यासाबाबत तिनं कधीच तक्रार केली नाही. पण तिला शिस्तीनं आणि आदरानं वागणं अपेक्षित असायचं.

शीला दीक्षित यांना वाचनाशिवाय चित्रपट पाहण्याचा छंद होता. लतिका सांगतात, "एकेकाळी त्या शाहरुख खानच्या मोठ्या फॅन होत्या. त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट अनेकवेळा पाहिला."

यापूर्वी त्या दिलीपकुमार आणि राजेश खन्नाच्या फॅन होत्या. संगीताचीही त्यांना आवड होती. संगीत ऐकल्याशिवाय त्या झोपी गेल्या असतील असं खूप कमीवेळा झालं असेल.

केजरीवाल यांना गांभीर्यानं घेतलं नाही

शीला दीक्षित यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या होत्या, "केजरीवाल यांनी पाणी, वीज अशा गोष्टी फ्री देणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचा परिणाम झाला. लोक त्यांच्या बोलण्यात अडकले. आम्हीही त्यांना गांभीर्यानं घेतलं नव्हतं"

शीला दीक्षित यांना वाटायचं, लोकांनी त्यांना तीनवेळा निवडून दिलं होतं. आता यांना बदलायला हवं. निर्भया प्रकरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला.

त्यांनी सांगितलं होतं, "दिल्लीतली कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्याची नसून केंद्राची आहे, हे खूपच कमी लोकांना माहीत होतं. तोपर्यंत केंद्र सरकार 2 जी, 4 जी यांसारख्या घोटाळ्यांमध्ये अडकलं होतं. त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)