राजनाथ सिंह: काश्मीर प्रश्न लवकरच चर्चेतून सुटला नाही तरी काय करायचं आम्हाला माहितीये #5मोठ्याबातम्या

राजनाथ सिंह Image copyright Twitter / Rajnath Singh

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेया बातम्यांपैकी या आहेत पाच मोठ्या बातम्या :

1) काश्मीरच्या मुद्द्यावर लवकरच तोडगा निघेल : राजनाथ सिंह

काश्मीरच्या मुद्द्यावर लवकरच तोडगा निघेल आणि जगातील कुठलीही शक्ती ते रोखू शकत नाही, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, जम्मू-काश्मीरच्या द्रास सेक्टर येथील कारगिल वॉर मेमोरियलला त्यांनी भेट दिली, तेव्हा ते बोलत होते.

जर प्रश्न चर्चेतून सुटणार नसेल तर तो कसा सुटेल, हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले. "हा प्रश्न नक्की सुटेल. मी जे बोलतो, ते विचारपूर्वक बोलतो. असंच काहीही बोलत नाही."

2) एकाच दिवसात सहा राज्यपाल बदलले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी काही राज्यात नवे राज्यपाल नियुक्त केले तर काही राज्यांच्या राज्यपालांची बदली केली. आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशच्या राज्यपाल तर जगदीप धनखर यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

नवभारत टाइम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, पश्चिम बंगालच्या केसरीनाथ त्रिपाठी, त्रिपुराचे राज्यपाल कॅप्टन सिंह सोलंकी आणि नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपतींकडून नव्य नियुक्त्या जाहीर झाल्या.

राज्यपालांनी या सहा नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या :

राज्य आधीचे राज्यपाल नवे राज्यपाल
उत्तर प्रदेश राम नाईक (कार्यकाळ संपला) आनंदीबेन पटेल
पश्चिम बंगाल केसरीनाथ त्रिपाठी (कार्यकाळ संपला) जगदीप धनखर
मध्य प्रदेश आनंदीबेन पटेल (बदली) लालजी टंडन
बिहार लालजी टंडन (बदली) फगु चौहान
त्रिपुरा कॅप्टन सिंह सोलंकी (कार्यकाळ संपला) रमेश बैंस
नागालँड पद्मनाभ आचार्य (कार्यकाळ संपला) R. N. रवी

3) 'पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महिनाभरात घ्या'

नागपूर, अकोला, वाशीम आणि नंदुरबार या चार जिल्हा परिषदांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्ष झाल्यानंतरही निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर सरकारने तातडीने या जिल्हा परिषदा बरखास्त केल्या होत्या.

नागपूर, अकोल, वाशीम, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या महिनाभरात घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

जिल्हा परिषदांच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी एका याचिकाकर्त्याने केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मागणी फेटळली.

4) ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरेंचं निधन

ज्येष्ठ समाजसेविका आणि 'वनस्थळी'च्या संस्थापक निर्मला पुरंदरे यांचं वयाच्या 86व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या पत्नी होत्या. लोकमतने ही बातमी दिली आहे.

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून गेली अनेक वर्षं त्यांनी मोठं कार्य उभारलं. महिला सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न त्यांनी केले. राज्यभरात बालवाड्यांचं जाळं विणण्याचं श्रेयही निर्मला पुरंदरे यांना जातं.

24वा पुण्यभूषण पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी निर्मला पुरंदरे यांचा गौरव झाला आहे.

5) अतिसार रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाचा पुढाकार

अतिसार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईजवळील कसारा येथे झाला. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

Image copyright TWITTER/@mieknathshinde

राज्यातील एका वर्षांपर्यंतच्या सुमारे 20 लाख बालकांना मोफत लस देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नियमित लसीकरण मोहिमेत त्याचा समावेश करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री म्हणाले.

रोटा व्हायरसमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये अधिक आढळून येतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)