झारखंड: जमावाच्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू

मॉब लिंचिंग
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

झारखंडमध्ये जमावाने चार जणांची मारहाण करून तसंच गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुमला जिल्ह्यात सिसकारी गावात ही घटना घडली.

हे हत्याकांड अंधश्रद्धेमुळे झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे चारही जण गावात जादूटोणा करत होते असा संशय आहे. त्या भीतीतूनच त्यांची हत्या झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी सांगितली.

हल्लेखोरांनी सर्वप्रथम यांना झोपेतून उठवलं आणि गावच्या चावडीजवळ नेऊन त्यांची हत्या करण्यात आली. रविवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडल्याचा अंदाज आहे. सिसकारी हे गाव सिसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं.

गुमलाचे पोलीस अधीक्षक अंजनी कुमार झा हे स्वतः घटनास्थळी आहेत.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "प्राथमिकदृष्ट्या हे अंधश्रद्धेचं प्रकरण वाटतं. आम्ही गावकऱ्यांशी याबाबत बोललो पण ते काहीच सांगत नाहीत. मृत्युमुखी पडलेल्या जोडप्याच्या मुलीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली आहे."

"काही गावकऱ्यांनी सार्वजनिक आणि गोपनीय अशा दोन्ही प्रकारची माहिती पोलिसांना दिली आहे. आम्ही तपास करत आहोत. पोलीस फिर्याद दाखल करून घेतील आणि त्यानंतर पुढील माहिती कळवली जाईल."

Image copyright Mukesh soni
प्रतिमा मथळा गुमलाचे पोलीस अधीक्षक अंजनीकुमार झा

झा यांनी सांगितलं, या घटनेमागे जवळच राहणाऱ्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता आहे. मरणाऱ्यांमध्ये एका जोडप्यासह एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांना सर्व मृतदेह एकाच ठिकाणी सापडले. आम्ही ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

काय आहे प्रकरण ?

या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पती-पत्नींची नावे चापा उराव (69) पीरा उराईन(60), फगनी उराईन(65) आणि सुन्ना उराव(60) अशी आहेत.

चापा आणि पीरा मुलगी सिलवंती यांनी सांगितलं, हल्लेखोरांनी पहाटे दरवाजा ठोठावला. त्यांनी आई-वडिलांना बाहेर बोलावून दरवाजा बाहेरून बंद केला.

सिलवंती सांगतात, यानंतर सकाळी आम्हाला त्यांचे मृतदेह सापडले.

घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीची सुनेने सांगितलं, "20 ते 25 जणांच्या समूहाने हे कृत्य केलं आहे. रात्र असल्यामुळे आम्ही त्यांना ओळखू शकलो नाही. त्यांनी आमच्या घराला बाहेरून कुलूप लावलं होतं. त्यांमुळे आम्ही बाहेर पडू शकलो नाही."

Image copyright Mukesh soni
प्रतिमा मथळा बुधनी

गुमलापासून सुमारे 25 किलोमीटरवर असलेल्या सिसकारी गावात बहुतांश लोकसंख्या आदिवासींची आहे. मारले गेलेले चारही व्यक्ती आदिवासी होते.

बहुतांश लोक गरीब आहेत आणि मजुरी करून गुजराण करतात. या परिसरात महिलांना चेटकीण समजून अत्याचार करण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.

गावात दोन-तीन दिवसांपूर्वी एक लोकन्यायालय लावण्यात आलं होतं. यामध्ये चौघांवर चेटूक आणि जादूटोणा करण्याचे आरोप लावण्यात आले. यानंतरच परिस्थिती तणावपूर्ण बनली होती, अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली. मात्र अधिकृतरीत्या काहीही स्पष्ट झालं नाही.

घटनेची माहिती सकाळी मिळाली पण लोकन्यायालयाबाबत काहीच माहित नसल्याचं गावचे माजी सरपंच रवी उरांव यांनी सांगितलं.

ते म्हणाले की असं असतं तर त्यांना याबाबत माहिती असली असती. गावातील दुसरे नागरिकसुद्धा याबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गावच्या सरपंचाची चौकशीही केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)