Mumbai MTNL Fire : वांद्र्यातील एमटीएनएल इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या बचावकार्याला यश

एमटीएनएल इमारत Image copyright ANI
प्रतिमा मथळा एमटीएनएल इमारत

मुंबईच्या वांद्रे परिसरातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या इमारतीला सोमवारी (22 जुलै) दुपारी भीषण आग लागली होती.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इमारतीत 100 हून अधिक जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री नऊ वाजेपर्यंत 90 हून अधिक जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवलं होतं.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या एका जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुरामुळे गुदमरल्यानं त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाल्याचं अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे तीन तास लागले, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांसाठी धोकादायक असलेल्या ठिकाणी आग विझवण्यासाठी रोबोटचा वापर केला जातो.

प्रतिमा मथळा आग विझवण्यासाठी रोबोटचा वापर केला गेला

मल्टिलेव्हल बेसमेंट, रासायनिक उद्योग, मोडकळीला आलेल्या इमारती तसंच 26/11 सारखा दहशतवादी हल्ला अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाकडून रोबोटचा वापर केला जातो. 88 लाख रुपये किमतीचा हा रोबोट 5 वर्षांच्या देखभालीच्या करारानं अग्निशमन दलाच्य़ा ताफ्यात सामील करण्यात आला आहे.

या इमारतीत एकूण नऊ मजले आहेत. त्यापैकी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली.

अग्निशमन विभागाच्या एकूण 14 गाड्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)