चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या गोळीनेच मृत्युमुखी पडले होते का?

चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा Image copyright SUNIL RAI/BBC

अलाहाबाद संग्रहालयात चंद्रशेखर आझाद यांचं ते ऐतिहासिक पिस्तूल ठेवलेलं आहे. हे तेच पिस्तूल जे 27 फेब्रुवारी 1931 ला त्यांच्या हातात होतं.

याच पिस्तुलातून झाडलेल्या गोळीनं आझाद यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. पण पोलिसांची कागदपत्रं वेगळंच काही सांगतात. चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या गोळीनेच तर नाही ना मारले गेले?

अलाहाबाद म्हणजेच आजच्या प्रयागराजमधील कर्नलगंज पोलीस ठाण्यात ब्रिटिश पोलिसांची एक गुन्हे नोंदवही आहे, त्यात पाहिलं तर असा संशय निर्माण होतो.

तत्कालीन पोलीस कागदपत्र सांगतात की सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आझाद एल्फ्रेड पार्कमध्ये उपस्थित होते. काही खबऱ्यांनी पोलिसांना ते तिथे असल्याची माहिती दिली होती.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे चंद्रशेखर आझाद ब्रिटिश पोलिसांच्या निशाण्यावर होते. काकोरी प्रकरण आणि त्यानंतर 1929 मधल्या बाँबस्फोट प्रकरणानंतर पोलीस आझाद यांना शोधत होते. त्यावेळचे जास्त दस्तऐवज उपलब्ध नाहीत.

अखेरीस त्यादिवशीच्या सकाळी घटनाक्रम कशा प्रकारे वेगाने बदलला, याबाबत स्वातंत्र्यलढ्याबाबत लिहिणारे स्पष्ट करत नाहीत.

पोलीस रेकॉर्डमध्ये नोंद

भारतात गुन्हे नोंद करण्याची पद्धत थोडीफार ब्रिटिश पद्धतीवर आधारित आहे. विशेषतः आजही एखादा पोलीस चकमकीत मारला जातो, त्यावेळी पोलीस जुन्या पद्धतीनुसारच त्याची नोंद करतात.

गुन्हे रजिस्टरमध्ये गुन्ह्यांची संख्या, आरोपीचं नाव आणि कलम 307 तसंच अंतिम अहवालाचं विवरण देण्यात येतं. म्हणजेच संशयित आरोपीने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळी झाडली आणि बचाव करताना केलेल्या कारवाईत संशयित आरोपीचा मृत्यू झाला.

Image copyright SUNIL RAI/BBC

ज्यावेळी आझाद यांच्याकडे एकच गोळी उरली होती, त्यावेळी त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली, असं म्हटलं जातं. पण सरकारी रेकॉर्ड हे स्वीकारत नाही.

आझादच्या विरोधात

अलाहाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या फौजदारी अभिलेखागारमध्ये 1970 पूर्वीचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. अलाहाबाद परिक्षेत्राचे माजी पोलीस महासंचालक आर. के. चतुर्वेदी सांगतात, कर्नलगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवलेला आहे. यामध्ये चकमकीचा उल्लेख आहे.

ते सांगतात, "याला पोलीस रेकॉर्डच्या दृष्टीने पाहिल्यास पोलिसांच्या बाजूनेच याची नोंद केली जाईल. प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की त्यांनी शेवटची गोळी स्वतःवर चालवली होती, त्यांना पोलिसांना ताब्यात जिवंत जायचं नव्हतं."

ब्रिटिश पोलिसांनी जे काही रजिस्टरमध्ये नोंद केलं, ते फक्त शाबासकी मिळवण्यासाठी होतं, असं अलाहाबाद विद्यापीठातले प्रोफेसर योगेश्वर तिवारी यांना वाटतं.

आझाद यांच्याविरुद्ध कर्नलगंज पोलीस ठाण्यात ब्रिटिश पोलिसांनी कलम 307 लावताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केला होता.

उर्दूमध्ये असलेल्या या नोंदीतूनच याबाबत माहिती मिळते. प्रतिवादी म्हणून चंद्रशेखर आझाद आणि एका अज्ञात व्यक्तीचा उल्लेख आहे. पोलीस आजही चकमकीची नोंद ब्रिटिश पोलिसांच्या याच जुन्या पद्धतीने करताना दिसतात.

Image copyright इमेज कॉपीरइटSUNIL RAI/BBC

अलाहाबाद संग्रहायलकडूनही एक माहिती मिळते. चंद्रशेखर आझाद 27 फेब्रुवारी 1931 ला अल्फ्रेड पार्कमधल्या जांभळाच्या झाडाखाली एका साथीदाराशी काहीतरी बोलत होते. त्यावेळी एका खबऱ्याच्या माहितीनुसार, पोलीस उपअधीक्षक एस. पी. ठाकूर आणि पोलीस अधीक्षक सर जॉन नॉट बावर यांनी संपूर्ण पार्कला वेडा घातला.

आझाद यांचं प्रत्युत्तर

बावर यांनी झाडाचा आडोसा घेत चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी आझाद यांच्या मांडीतून आरपार गेली. दुसरी गोळी विश्वेश्वर सिंह यांनी चालवली. ती त्यांच्या उजव्या दंडावर लागली.

जखमी होऊनसुद्धा आझाद सातत्याने डाव्या हाताने पिस्तूल चालवत होते. आझाद यांनी प्रत्युत्तरादाखल झाडलेली एक गोळी विश्वेश्वर सिंह यांच्या जबड्याला लागली.

Image copyright TWITTER @PIB_INDIA
प्रतिमा मथळा आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 ला मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात झाला होता.

इलाहाबाद संग्रहालयाचे संचालक राजेश पुरोहित हेसुद्धा या गोष्टींना दुजोरा देतात. पण याबाबत अधिक तपशील उपलब्ध नसल्याचं ते मान्य करतात.

संग्रहालयात ठेवलेलं पुस्तक 'अमर शहीद चंद्रशेखर आझाद'चे लेखक विश्वनाथ वैशंपायन आझाद यांचे साथीदार होते.

ते लिहितात, "माझ्या अटकेच्या 15 दिवसांनंतर आझाद अल्फ्रेड पार्कमध्ये शहीद झाले होते. मी त्यावेळी बाहेर नव्हतो. त्यामुळे वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या आधारावरच लिहीत आहे."

जखमी आझाद

"सुखदेव राज यांच्या हवाल्याने वैशंपायन लिहितात, ज्यादिवशी ही घटना घडली, त्यावेळी आझाद भारतातून म्यानमार जाण्याबाबत चर्चा करत होते. त्यावेळी वीरभद्र जाताना दिसला. सुखदेव आणि आझाद हे दोघेही वीरभद्र यांच्याबाबत चर्चा करतच होते, इतक्यात एक कार येऊन त्यांच्यासमोर थांबली. त्यातून एक इंग्रज अधिकारी उतरला आणि त्याने येऊन नाव विचारलं."

"त्याने नाव विचारताच दोघांनी गोळी झाडली. इंग्रज अधिकाऱ्यानेही त्यांच्यावर गोळी झाडली. दरम्यान, जखमी झाल्यानंतर आझाद यांनी सुखदेव यांना निघून जाण्यास सांगितलं. सुखदेव तिथून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले."

Image copyright SUNIL RAI/BBC

याच पुस्तकात वैशंपायन यांनी नॉट बावर यांनी माध्यमांना दिलेला जबाब नोंद केला आहे. नॉट बावर यांनी आपल्या जबाबात म्हटलंय, "पोलीस उपअधीक्षक ठाकूर विश्वेश्वर सिंह यांचा मला संदेश मिळाला, त्यांनी अल्फ्रेड पार्कमध्ये एका व्यक्तिला पाहिल्याचं कळवलं. त्याचं ओळख क्रांतिकारक आझाद यांच्याशी मिळतीजुळती होती."

"मी माझ्यासोबत जमान आणि गोविंद काँस्टेबल यांना घेऊन गेलो. जवळपास दहा फूट अंतरावरून मी त्यांना ओळख विचारली. उत्तरादाखल त्यांनी पिस्तुलानं माझ्यावर गोळीबार केला."

नॉट बावर यांनी सांगितलं होतं, "माझं पिस्तूल तयारच होतं. एक जाडा माणूस पिस्तूल काढत असल्याचं पाहताच मी त्याने गोळी झाडण्याआधीच गोळी झाडली. माझ्यासोबत असलेल्या तीन जणांनीही काही गोळ्या त्या जाड्या व्यक्तीवर आणि दुसऱ्या एका व्यक्तीवर झाडल्या."

"मी मॅगझीन काढून पिस्तुलात भरत होतो, तेवढ्यात जाड्या व्यक्तीने माझ्यावर गोळी चालवली. त्यामुळे डाव्या हातात असलेली माझी मॅगझीन पडली. जाड्या माणसाने झाडलेली गोळी विश्वेश्वर सिंह यांच्या जबड्यावर लागली."

Image copyright WWW.PMINDIA.GOV.IN

ते पुढे लिहितात, "मी पिस्तूल भरू शकलो नाही. जेव्हा-जेव्हा मी दिसत होतो, जाडा व्यक्ती माझ्यावर गोळ्या झाडत होता."

"त्याच्यावर कुणी गोळी झाडली की तो जखमी होऊन पूर्वीच मृत्युमुखी पडला याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. दरम्यान लोक जमा झाले आणि एक व्यक्ती भरलेली बंदूक घेऊन आला."

"मला माहीत नव्हतं की तो जाडा माणून खरंच मेलाय किंवा नाटक करतोय. त्यामुळे त्याच्या पायावर गोळी मारण्यास सांगितलं. त्यानंतर आम्ही जाड्या माणसाच्या जवळ गेलो. तर तो मरून पडलेला होता. त्याचा साथीदार पळून गेला होता."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या