चंद्रावर जमीन असलेल्या राजीव यांना चांद्रयान मोहिमेबद्दल काय वाटतं?

राजीव भागदी
प्रतिमा मथळा राजीव भागदी

चांद्रयान - 2 मोहिमेद्वारे भारताने अंतराळ मोहिमांमधल्या एका नवा टप्प्यात पदार्पण केलं आहे. आणि म्हणूनच राजीव भागदी खुश आहेत. कारण त्यांनी चंद्रावर जमीन घेतलेली आहे.

२००३मध्ये १४० अमेरिकन डॉलर्सला चंद्रावर जमीन घेतल्याचं राजीव यांचं म्हणणं आहे. त्यासाठीचा दाखल करण्यात आलेला दावा आणि करार (registered claim and deed) त्यांच्याकडे आहे. यामध्ये असं म्हटलं आहे आहे की पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रावरील मेअर इमब्रियम (लाव्हा असणारं खोरं) जवळील जमीन राजीव भागदी यांच्या मालकीची आहे. न्यूयॉर्कमधील लुनार रजिस्ट्रीने या मालमत्तेची नोंदणी केल्याचं या करारामध्ये म्हटलं आहे.

पण चंद्रावर जमीन घेणारे राजीव एकटेच नाहीत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंह राजपूत यांनीही चंद्रावर मालमत्ता घेतलेली आहे. सुशांतने स्वतः ही जमीन विकत घेतली आहे तर शाहरुख खानला या जमिनीचा करार भेट देण्यात आल्याचं इंडियन एक्सप्रेस(२०१८) आणि हिंदुस्तान टाईम्स (२०१९)च्या लेखांमध्ये म्हटलं आहे.

भारताच्या चांद्रयान मोहिमेमुळे आपल्या आशा वाढल्याचं राजीव सांगतात. कुटुंबासह चंद्रावर सफरीसाठी जाता येईल आणि शक्य असल्यास तिथे काहीतरी महत्त्वाचं उभारताही येईल अशी त्यांना आशा आहे.

चंद्राची मालकी कोणाची?

चंद्रावरची मालमत्ता विकण्याचा दावा करणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत. पण प्रत्यक्षात चंद्राची मालकी नेमकी कोणाची? कारण कोणतीही मालमत्ता विकण्यासाठी वा विकत घेण्यासाठी ती आधी कोणाच्यातरी मालकीची असणं गरजेचं असतं. मग चंद्र कोणाचा?

1967 मध्ये करण्यात आलेली 'आऊटर स्पेस ट्रिटी' (अंतराळ करार) यासाठी महत्त्वाची आहे. या करारावर भारतासह १०० देशांनी सह्या केल्या आहेत. अंतराळामध्ये संशोधनासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमा आणि अंतराळातील चंद्र आणि त्यासारख्या इतर खगोलीय घटकांचा वापर यासाठीची धोरणं या कराराद्वारे ठरवण्यात आली आहेत.

या कराराचं कलम १ सांगतं : पृथ्वीबाहेरील अंतराळ, चंद्र आणि इतर खगोलीय घटकांचा वापर आणि तिथे संशोधन करताना सर्व देशांचा फायदा आणि हेतू लक्षात घेण्यात यावा. या देशांची आर्थिक वा वैज्ञानिक प्रगती विविध पातळ्यांवरची असली तरी पृथ्वीबाहेरील अंतराळ, चंद्र आणि इतर खगोलीय घटकांवर सर्व मानवजातीचा हक्क आहे.

चंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह संपूर्ण अंतराळ हे संशोधनासाठी खुलं असून कोणत्याही प्रकारच्या भेदाशिवाय सर्व देश याचा समानपणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वापर करू शकतात आणि सर्व देशांना अंतराळामध्ये कुठेही जाण्याची परवानगी आहे. चंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह पृथ्वीबाहेरील अंतराळामध्ये वैज्ञानिक संशोधन करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना असून यासाठी सर्व देश एकमेकांना मदत करतील आणि आंतरराष्ट्रीय मदतीचा पुरस्कार करतील."

कराराचं कलम २ सांगतं: "चंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह अंतराळात कुठेही जागेवर ताबा मिळवत किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणत्याही देशाला आपलं सार्वभौमत्व जाहीर करता येणार नाही."

इंटरॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस लॉ चे मानद संचालक स्टीफन ई. डॉयल सांगतात की जसे समुद्र कोणाच्याही मालकीचे नाहीत तसाच चंद्रही कोणाच्याही मालकीचा नाही.

बीबीसी न्यूज तेलगूशी बोलताना ते म्हणाले, "चंद्रावर एखाद्या देशाला जागा देणारी वा खासगी मालमत्ता घेऊ देणारी अशी कोणतीही तरतूद नाही. ज्याप्रमाणे समुद्रातून मासे पकडून वापरता येतात तसंच चंद्रावर उत्खनन करून त्या गोष्टी वापरता येतील. अशा उत्खनन करणाऱ्यात आलेल्या गोष्टींची मालकी ते करणाऱ्यांची असू शकते पण तिथे उरलेल्या गोष्टींवर कोणाचीही मालकी नाही."

राजीव भागदींसारख्या लोकांना देण्यात येणाऱ्या करारांबद्दल विचारल्यानंतर स्टीफन ई. डॉयल म्हणतात, "कराराच्या कलम २ नुसार चंद्रावरील भूभागाच्या मालकीचे दावे हे खोटे आणि निरर्थक आहेत. चंद्रावरची जमीन विकण्याचा प्रयत्न करणारे खोटारडे आण बोगस आहेत. जसा खोल समुद्राचा काही भाग विकला जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे त्यांना अशी विक्री करण्याचा अधिकार नाही."

अशा कंपन्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत का किंवा तपास करण्यात येत आहे का हे अजून स्पष्ट झालेलं नाही. लुनार रजिस्ट्री, लुनार लँडसारख्या कंपन्यांशी संपर्क साधत आम्ही या कागदपत्रांच्या कायदेशीर वैधतेची चौकशी केली. पण हा लेख लिहीपर्यंत त्यांनी याला उत्तर दिलं नाही पण या कंपन्या कायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आलेला आहे.

"सूर्यमालेमध्ये दशकांपासून असणाऱ्या अंतराळातील मालमत्तेसाठीचे कायदेशीर ट्रेडमार्क आणि कॉपीराईट्स" असल्याचा दावा लुनार लँडच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे. तर लुनार रजिस्ट्रीने त्यांच्या FAQ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) मध्ये असं स्पष्टीकरण दिलं आहे की "चंद्राची मालकी असण्याचा खोटा दावा ते करत नसून चंद्रावरील काही ठराविक मोक्याच्या जागांवर मालकी हक्क सांगणारे दावे रजिस्टर करण्यासाठीची प्रमाणित प्रक्रिया उपलब्ध करून देत आहेत."

अंतराळ वस्त्यांची मागणी करणाऱ्या स्पेस सेटलमेंट इनिशिएटिव्ह सारख्या गटांचं असं म्हणणं आहे की " अंतराळामध्ये व्यावसायिक धर्तीवर वस्ती निर्माण करण्यासाठी लागणारी मोठी गुंतवणूक करण्यासाठी तिथल्या मालमत्तेची विक्री हा एकमेव पर्याय आहे ज्यातून मोठा नफा होऊ शकतो, आणि निधी उभा केला जाऊ शकतो."

प्रत्यक्षात चंद्रावर राहणाऱ्यांनाच मालकी हक्क शक्य

स्पेस सेटलमेंट इन्स्टिट्यूटच्या ऍलन वासेर यांनी बीबीसी न्यूज तेलगूसोबत बोलताना सांगितलं, "स्पेस सेटलमेंट इन्स्टिट्यूटला असं वाटतं की चंद्राच्या जमिनीचा मालकी हक्क त्यांनाच मिळू शकतो जे प्रत्यक्षात चंद्रावर राहतात." पण विकण्यात आलेल्या जमिनींचे करार कायदेशीर नसून राजीवसारख्या लोकांना मालकीचा दावा आता किंवा कधीही करता येणार नसल्याचं ते म्हणतात.

"चंद्र कोणाच्याही मालकीचा नाही. आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणताही देश चंद्रावर मालकी सांगू शकत नाही. 'चंद्रावरील जमिनीचे करार' विकणाऱ्या कंपन्या या गोष्टींची कायदेशीर गोष्टी म्हणून विक्री करत नसून एक अद्भुत गोष्ट म्हणून विक्री करत आहेत. कारण मुळात ही जमीन त्यांच्या मालकीची नाही. म्हणूनच हे करार कायदेशीर नाहीत."

मग चंद्रावरच्या या मालमत्तेसाठी दिलेले पैसे गेले कुठे? स्टीफन ई. डॉयल यांच्या मते हे पैसे भामट्यांना दिल्यात जमा आहेत.

तर आपल्याकडे असणाऱ्या कागदपत्रांच्या कायदेशीर असण्याबाबत आपल्याला चिंता नसल्याचं राजीव म्हणतात. आपण अशा एका प्रकल्पात पैसे घातले आहेत ज्याने मानवजातीचं भलं होईल किंवा मानवजातीला चंद्रावर नेण्यात मदत होईल, असं त्यांना वाटतं.

"लोकं मला वेड्यात काढतात. पण मला त्याने फरक पडत नाही. माझा विश्वास आहे की चंद्राचा मानवजातीला फायदा होईल आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी गुंतवणूक केली आहे. जर ही कागदपत्रं प्रत्यक्षात येऊ शकली नाहीत किंवा मला ती जमीन मिळाली नाही तरी चालेल. पण एक दिवस माणूस चंद्रावर रहायला गेला तर मला त्यातही आनंद वाटेल," राजीव सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)