सचिन अहिर: राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार #पाचमोठ्याबातम्या

सचिन अहिर Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) सचिन अहिर: राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर गुरुवारी (25 जुलै) शिवसेनेत प्रवेश करणार करणार आहेत. बुधवारी (24 जुलै) सचिन अहिर यांनी त्यांच्या मुंबईतल्या आपल्या वरळी मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करत असल्याची बातमी सकाळने दिली आहे.

शिवसेनेचे प्रमुख नेते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याशीही चर्चा करून हा प्रवेश केला असल्याचं सकाळच्या बातमीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे, असं लोकसत्ताच्या बातमी म्हटलं आहे.

अहिर हे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून ते माजी राज्यमंत्री आहेत.

2) कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या

कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. रुपाली रामकृष्ण पवार ही सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील देगावची राहणारी होती. रुपालीने कीटकनाशक घेऊन आयुष्य संपवलं. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

रुपालीला पंजाबच्या जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये B.Techसाठी प्रवेश मिळाला होता.

या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या CET entrance परीक्षेत रुपालीनं 89% गुण मिळवले होते. 10 हजार रुपये भरून रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. तिच्या अभ्यासक्रमाची एकूण फी एक लाख रुपये होती. ती भरण्यासाठी 20 जुलैची मुदत होती. पण मुदतीत फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी कीटकनाशक घेऊन जीव संपवला

रुपालीची फी भरण्यासाठी वडिलांनी शेती विकायला काढली होती. मात्र शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने शेतीची विक्री झाली नाही, असंही या बातमीत म्हटलं आहे.

3) आम्रपाली समूहाच्या ग्राहकांचा पैसा साक्षी धोनीच्या कंपनीकडे वळवला

आम्रपाली समूहाने घरं खरेदी करणाऱ्यांचा पैसा महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिच्या कंपनीत वळवला, असे निरीक्षण फॉरेन्सिक ऑडिटर्सनी सर्वोच्च न्यायालयात नोंदवल्याचं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे.

या प्रकारानंतर सुप्रीम कोर्टानं मंगळवारी (23 जुलै) आम्रपाली समूहाची नोंदणी रद्द करून त्यांचे सर्व प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळाची (NBCC) नियुक्ती केली.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान फॉरेन्सिक ऑडिटर्स पवन कुमार अग्रवाल आणि रवींद्र भाटिया या दोघांनी असे स्पष्ट केले की,

आम्रपाली ग्रुपने Rhiti Sports Management Private Limited आणि Amrapali Mahi Developers Private Limited यांच्यासोबत एक बनावट करार केला होता.

धोनीचे Rhiti Sports Management Private Limited मध्ये मोठ्या प्रमाणावर समभाग आहेत, तर त्याची पत्नी साक्षी धोनी ही 'Amrapali Mahi Developers Private Limited'मध्ये संचालकपदावर आहे. धोनी स्वतःदेखील 2016 पर्यंत आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अँबेसेडर होता, पण गृह खरेदीदारांच्या विरोधामुळे त्याने राजीनामा दिला होता, असंही या बातमी म्हटलं आहे.

4) कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी मोटर वाहन कायद्याच्या सुधारणेला संसदेत मंजुरी

लोकसभेत मोटर वाहन कायदा - 1988च्या सुधारणेला मंजुरी मिळाली आहे. गाडी चालवताना नियम मोडल्यास सुधारित मोटर वाहन कायद्यानुसार मोठा दंड द्यावा लागणार आहे. News18 लोकमतनं ही बातमी दिलीआहे.

रस्ते सुरक्षेसाठी कडक नियम केल्यामुळे ड्रायव्हिंग करताना केलेली छोटी चूकही महाग पडू शकते. यामध्ये अति वेग, हेल्मेटशिवाय बाइक चालवणं, दारू पिऊन ड्रायव्हिंग चालवणं यांचा समावेश आहे.

याआधी 2017मध्येही लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. पण राज्यसभेत हे विधेयक अडकलं होतं.

5) गौतम नवलखांचा 'हिजबुल मुजाहिदीन'शी संबंध?

नक्षकलवादी संघटनांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'हिजबुल मुजाहिदीन' सोबत थेट संबंध आहेत. याचसंदर्भात गौतम नवलखा यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप राज्य सरकारनं बुधवारी हायकोर्टात केला आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

भीमा-कोरेगावच्या घटनेवरून हे सारं प्रकरण उघडकीस आलं, तसंच या तपासातून जी माहिती समोर आली त्यातून या प्रकरणातील सर्व आरोपींना देशाविरोधात युद्धच पुकारायचं होतं असा आरोपही सरकारी वकील अरुणा पै यांनी बुधवारी (24 जुलै) हायकोर्टात केला.

हिजबुलकडून शस्त्रास्त्र, विस्फोटकं आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी नक्षलींना तसेच माओवाद्यांना सर्वतोपरी सहाय्य मिळतं. यासंबंधीचे पुरावे अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंगच्या लॅपटॉपमधून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Image copyright Getty Images

जप्त केलेला गोपनीय मजकूर पुरावे म्हणून हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या इतर आरोपींनाही शहरी आणि ग्रामीण नक्षलवादाशी संबंधित जबाबदारी ठरवून दिलेली होती, अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली, असंही या बातमीत म्हटलं आहे.

गौतम नवलखा एक सामजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मानवाधिकार आणि न्यायिक अधिकारांच्या मुद्द्यावर काम केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)