चित्रा वाघ, मधुकर पिचड यांचा राष्ट्रवादीला रामराम : दिग्गज नेते का सोडत आहेत शरद पवारांची साथ?

चित्रा वाघ Image copyright Twitter

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर आता चित्रा वाघ तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षापदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. वाघ यांनी शुक्रवारी (26 जुलै) ट्विटरवरून ही घोषणा केली.

"मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ दिवसभर (शुक्रवार) राष्ट्रवादीच्या कार्यालयात होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या पण संध्याकाळी कार्यालयातून गेल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून राजीनाम्याची घोषणा केली.

तर पिचड यांनी ही घोषणा अहमदनगरमधल्या अकोले इथे झालेल्या मेळाव्यात केली

राज ठाकरेंनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चा उल्लेख शरद पवारांनी बांधलेली 'निवडून येणा-या नेत्यांची मोळी' असा केला होता. पण ज्या 'मोळी'ची उपमा त्यांनी दिली होती, 'राष्ट्रवादी'ची ती मोळी आता सुटू लागली आहे, का हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सध्याच्या घडमोडींकडे पाहता उपस्थित होत आहे.

जे अनेक वर्षं, बहुतांशी स्थापनेपासून 'राष्ट्रवादी'सोबत होते, ते प्रस्थापित नेते निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडतांना दिसत आहेत. चित्रा वाघांच्या दोनच दिवस आधी सचिन अहिर यांनी घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधले होते.

Image copyright SHARAD BADHE
प्रतिमा मथळा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

'राष्ट्रवादी'तल्या दुस-या फळीतल्या नेत्यांमधलं महत्वाचं नाव म्हणून अहिर यांच्याकडे पाहिलं गेलं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग हाच बालेकिल्ला बनलेल्या 'राष्ट्रवादी'च्या पाठीमागे मुंबईत तशी ताकद कधीच उभी राहिली नाही. सचिन अहिर वा संजय दिना पाटील यांच्यासारख्या निवडून येणा-या लोकप्रतिनिधींच्या जोरावरच मुंबईत 'राष्ट्रवादी'चं स्थानं होतं.

सचिन अहिर यांना त्यामुळेच मंत्रिपदही देण्यात आलं होतं. त्यामुळे अहिर मुंबई प्रदेशाध्यक्ष असतांना शिवसेनेत जाणं हा 'राष्ट्रवादी'ला मोठा धक्का आहे.

अहिरांपाठोपाठ पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असलेल्या 'राष्ट्रवादी'मधल्या इतरही बड्या नावांची चर्चा लगेचच सुरु झाली आहे. त्यातलं महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ येत्या आठवड्याभरात शिवसेनेमध्ये जातील अशा आशयाच्या बातम्या सर्वत्र फिरताहेत.

छगन भुजबळांनी स्वत: या अशा प्रकारच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. सचिन अहिर यांच्या 'शिवसेना'प्रवेशाच्या वेळेस जेव्हा उद्धव ठाकरेंना भुजबळांच्या 'घरवापसी'बद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्याबद्दल काहीही बोलायला नकार दिला.

भुजबळांनी त्यांची राजकीय कारकीर्द बाळासाहेब ठाकरेंसोबत सुरू केली असली तरी सेना सोडल्यावर त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा महत्वाचा टप्पा शरद पवारांसोबत पार पडला आहे. 'राष्ट्रवादी'च्या स्थापनेतही त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे जर भुजबळांबद्दलच्या चर्चा ख-या ठरल्या तर केवळ 'राष्ट्रवादी'च नव्हे तर शरद पवारांसाठीही तो मोठा राजकीय धक्का असेल.

Image copyright TWITTER
प्रतिमा मथळा छगन भुजबळ

लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या आणि शरद पवारांसोबत जवळचे संबंध असलेल्या नेत्यांनी त्यांची साथ सोडण्यास सुरुवात झाली होती. माढ्याच्या उमेदवारीवरून विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे निवडणुकीआधी 'भाजपा'त सामील झाले. विजयसिंह मोहिते पाटील यांना 'राष्ट्रवादी'नं उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांचं घराणं सहकाराच्या क्षेत्रात पहिल्यापासून पवारांसोबत होतं.

पाच वर्षं विरोधी बाकांवर पवारांना साथ दिल्यावर त्यांनीही लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांचे पुत्र रणजितसिंह 'राष्ट्रवादी'च्या स्थापनेपासून पक्षाच्या युवक विभागाचे अध्यक्ष होते आणि खासदारही होते. पण त्यांना लोकसभेची उमेदवारी न मिळण्याचं निमित्त झालं आणि मोहिते पाटील 'राष्ट्रवादी'मधून बाहेर पडले.

शिवसेनेच्या शिवबंधनात 'राष्ट्रवादी'चे नेते

मोहिते-पाटलांपाठोपाठ पक्षाला रामराम करणाऱ्या नेत्यांमधलं मोठं नाव मराठवाड्यातलं होतं. जयदत्त क्षीरसागर. बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबियांचं वर्चस्व असलं तरी क्षीरसागर हे 'राष्ट्रवादी'साठी मोठे आणि शरद पवारांशी निष्ठा असणारे नेते होते.

आघाडी सरकारच्या काळात 'राष्ट्रवादी'नं त्यांना मंत्रिमंडळात महत्वाची खातीही दिली होती. पण डावलल्याची भावना आणि गटबाजीचं कारण पुढे झालं आणि क्षीरसागरांनीही 'राष्ट्रवादी'मधून काढता पाय घेतला. त्यांनीही दोन महिन्यांपूर्वी सचिन अहिरांसारखं 'शिवबंधन' हातात बांधलं. त्याचा फायदाही त्यांना तत्काळ मिळाला, ते फडणवीस सरकारमध्ये 'रोहयो' मंत्री झाले.

शिवसेनेच्या शिवबंधनात अडकणा-या 'राष्ट्रवादी'च्या नेत्यांची यादी इथेच थांबली नाही. शहापूरचे 'राष्ट्रवादी'चे आमदार पांडुरंग बरोरा यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. बरोरा आणि त्यांचे कुटुंबिय शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. पण त्यांनीही साथ सोडली.

Image copyright SUPRIYA SULE/FACEBOOK

विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल आता सुरु झाला आहे आणि 'राष्ट्रवादी'च्या गोटातल्या या घर बदललेल्या नावांसोबतच इतर अनेक नावंही चर्चेत आहेत. भाजपा-सेनेशी त्यांची जवळीक वाढली आहे.

निवडणुकीतील पराभवामुळे पक्ष राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असताना मंत्री राहिलेले, पक्षात अनेक जबाबदा-या स्वीकारलेले प्रस्थापित नेते स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तेच्या बाजूला जात असल्याचं चित्रं आहे. पण ही स्थिती 'राष्ट्रवादी'वर का आली?

"जर आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे आकडे पाहिले तर असं दिसतं की एकूण 227 विधानसभा मतदारसंघात सेना-भाजपा युतीला आघाडी आहे. 2014 मध्येही ती जवळपास तितक्याच मतदारसंघांमध्ये होती. पाच वर्षांत ती कमी झाली नाही. हे पाहता या सगळ्या 'राष्ट्रवादी'च्या नेत्यांपुढे परत पाच वर्षं आपण विरोधी पक्षामध्ये बसायचं का? हा प्रश्न आहे," असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणतात.

लोकसभा निकालानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या 'आऊटगोईंग'चा वेग वाढला आहे.

"त्यांचा आत्मविश्वासही कमी झाला आहे. त्यांच्या भविष्याचा ते विचार करताहेत. दुसरीकडे त्यांना सोबत असलेली कॉंग्रेसही दिसते आहे जी कधी नव्हती इतकी दुबळी झाली आहे. भाजपाच्या आक्रमकतेला तिच्याकडे उत्तर नाही. त्यामुळेच स्वत:च्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय ते घेत आहेत," देशपांडे पुढे सांगतात.

पक्षातून बाहेर पडणा-या नेत्यांची संख्या का वाढते आहे याबद्दल जेव्हा 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, "ज्यांना आत्मविश्वास नाही असे नेते कायम 'आयाराम-गयाराम'ची भूमिका घेतात. त्यांच्यासोबत कार्यकर्ते जातात असं होत नाही. जे गेले त्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळते. नेते वा आमदार पक्ष सोडून गेल्यावर पक्ष संपतो असं कधीही होत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)