काश्मीर : 'उमेदीचा काळ तुरुंगातल्या अंधारात गेला, दोन दशकांनी पुराव्यांअभावी सुटका'

काश्मीर Image copyright Getty Images

ज्या काळात आयुष्यात काहीतरी नवं करण्याची उमेद असते, शरीरात ताकद असते, ऊर्जा असते, तो काळ कुठलाही गुन्हा केला नसताना एखाद्या अंधाऱ्या कोठडीत गेला तर?

बॉम्बस्फोटातील सहभागाच्या संशयावरून ताब्यात घेतलं जातं, अटक करून दोन दशकं तुरुंगात डांबून ठेवलं जातं आणि एकेदिवशी पुरावा नसल्यानं सुटका केली जाते.

49 वर्षीय मोहम्मद अली भट्ट, 40 वर्षीय लतीफ वाजा आणि 44 वर्षीय मिर्जा निसार यांच्यासोबत नेमकं हेच झालं.

निम्म्याहून अधिक आयुष्य तुरुंगात खितपत घालवल्यानंतर मोहम्मद अली भट्ट, लतीफ वाजा आणि निर्जा निसार यांची पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली. या तिघांनाही दिल्लीतल्या लाजपत नगर आणि सरोजिनी नगर येथे 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याच्या आरोपांखाली ताब्यात घेण्यात आलं होतं.

मात्र, आता 20 हून अधिक वर्षे हे तिघेही तुरुंगात राहिल्यानंतर पुराव्यांअभावी त्यांची सुटका करण्यात आली आहे.

या तिघांकडे पाहिल्यानंतर दु:ख, हतबलता आणि असहाय्यतेचं विद्रूप चित्र लख्खपणे दिसतं. ज्यावेळी या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यावेळी तिघेही ऐन तारूण्यात होते. काठमांडू इथून तिघांनाही ताब्यात घेतलं होतं. तिघेही तिथे काश्मिरी हातमागाच्या वस्तू विकण्यासाठी जात असत.

मोहम्मद अली भट्ट तुरुंगात असताना त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या खास मित्रांचंही निधन झालं.

Image copyright RIYAZ MASROOR

अली भट्ट यांचे धाकटे बंधू अर्शद भट्ट म्हणतात, "तुरुंगातून सुटल्यानंतर ते थेट कब्रिस्तानात गेले. आई-वडिलांच्या कबरीला मिठी मारली आणि धाय मोकलून रडले."

अली भट्ट ज्यावेळी हसनाबाद येथील आपल्या घरात पोहोचले, त्यावेळी मिठाई वाटली गेली, महिलांनी स्थानिक गाणी गायली. एकूणच उत्साहाचं वातावरण होतं.

अर्शद सांगतात, "आमचा व्यवसाय नीट सुरु होता. मात्र अलीच्या अटकेमुळे सर्वच उद्ध्वस्त झालं. आता व्यवसायही शिल्लक राहिला नाही. जो काही राहिला होता, तो एका तुरुंगाच्या फेऱ्या मारण्यात आणि वकिलांच्या फी देण्यात खर्ची पडला."

रडवेल्या स्वरात अर्शद पुढे म्हणतात, "आम्ही कोर्टाच्या निर्णयामुळे आनंदात आहोत. मात्र, अलीच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षं सरून गेली असताना, कोर्ट गप्प का? तुरुंगाच्या काळोख्या खोल्यांमध्ये घालवलेली 23 वर्षे पुन्हा कोण आणून देईल आणि अलीचं आता पुढे काय होईल?"

लतीफ वाजा यांना नेपाळमधून अटक करण्यात आली होती. तेव्हा ते केवळ 17 वर्षांचे होते.

लतीफ यांचं कुटुंब जुन्या काश्मीरमधील शमस्वरीमध्ये राहत होतं. लतीफ यांच्या कुटुंबाचं दु:ख डोंगराएवढं आहे. लतीफ यांची वाट पाहता पाहताच वडिलांचा मृत्यू झाला. लतीफ यांच्या अटकेमुळे घरचा व्यवसाय बंद करावा लागला.

"सरकारने भरपाई करून द्यावी"

लतीफ सांगतात, "माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्यावर दोन-दोन जबाबदाऱ्या होत्या. बहिणीचं लग्न होतं आणि बाकीचंही सगळंही मला सांभाळायचं होतं. फक्त अल्लाहलाच माहितंय की, या काळात आम्ही कसं सगळं केलं."

Image copyright RIYAZ MASROOR

तारीक म्हणतात, तुरुंगात गेलेल्या काळाची नुकसान भरपाई भरून देण्यासाठी सरकारने पुढे यायला हवं."

पुराव्यांअभावी सुटलेल्या तिघांपैकी मिर्जा निसार हे एक आहेत. तेही शमस्वरीचे रहिवासी आहेत.

निसार यांचे धाकटे बंधू इफ्तिखार मिर्जा म्हणतात, "निसारला कधी अटक केलं गेलं, हे आम्हालाच माहीत नव्हतं. जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा पोलीस आमच्या दारापर्यंत पोहोचले होते. मला आणि माझ्या दोन भावांनाही चौकशीसाठी घेऊन गेले होते. निसारच्या अटकेनंतर आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलोय, हे मी सांगूही शकत नाही."

'याला न्याय म्हणायचा का?'

इफ्तिखार म्हणतात, निसारला भेटण्यासाठीही मला आणि माझ्या कुटुंबीयांना 14 वर्षे वाट पाहावी लागली.

Image copyright RIYAZ MASROOR

निसारसोबत तुरुंगात राहिलेल तारीक डार हे 2017 साली सुटले होते. निसार आणि त्यांच्या आईची जेलमध्ये भेट झाली होती, त्याबद्दल तारीक सांगतात, "ही भेट एका छोट्याशा खिडकीतून झाली होती. पण, एवढ्या वर्षांनंतर भेटूनही माय-लेक एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. ते फक्त एकमेकांना पाहत होते. दोघेही रडत होते. तेव्हा एक अधिकारी तिथे आला आणि दोघांना गळाभेटीची परवानगी दिली. मायलेकाच्या भावना तुरुंगाच्या त्या भिंतींच्या काळजालाही भिडल्या असतील."

इफ्तिखार मिर्जा सांगतात, "आम्ही एका गोष्टीने आनंदात आहोत की, कमीत कमी आम्हाला न्याय तर मिळाला. मात्र, याला न्याय म्हणायचा का? या जगात निसार नव्यानेच आल्यासारखा आहे. कारण असे अनेक नातेवाईक आहेत, ज्यांना निसार ओळखत नाही. अनेकजण निसार तुरुंगात असताना जन्मले, तर काहीजण आता खूप मोठे झाले आहेत. जर हाच न्याय असेल, तर आम्ही या न्यायासाठी मोठी किंमत मोजली आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)