काश्मीर: अजित डोवाल यांच्या दौऱ्यानंतर 10 हजार अतिरिक्त सैनिक पाठवले #5मोठ्याबातम्या

भारतीय सैनिक Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. जम्मू-काश्मिरात 10 हजार अतिरिक्त सैनिक तैनात

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादांच्या विरोधातील कारवाईला अधिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने 10 हजार सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर भारताने हा निर्णय घेतला. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

डोवाल यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. दुसरीकडे, सैनिक तैनात करण्याच्या आदेशात गृहमंत्रालयाने म्हटलंय की, जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था आणखी चांगली व्हावी म्हणून अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच अमरनाथ यात्रेदरम्यान 40 हजार अतिरिक्त सैनिक जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते.

2. 'जैश'चा म्होरक्या ठार

जैश-ए-मोहम्मद संघटनेतील कट्टरतावादी मुन्ना लाहोरी उर्फ छोटा बुर्मी आणि त्याचा साथीदार झीनत-उल-इस्लाम यांना दक्षिण काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं ठार केलं. मुन्ना लाहोरी हा जैशसाठी बाँब बनवण्याचं काम करायचा. हिंदुस्तान टाईम्सने ही बातमी दिली आहे.

मुन्ना लाहोरी आणि त्याचा साथीदार इस्माईल दक्षिण काश्मीरमध्ये आयईडी स्फोट घडवायचे. बाँबस्फोटांसह दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षणासह साहित्य पुरवण्याचंही काम करायचा.

30 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये सुरक्षादलावर झालेल्या हल्ल्यातही मुन्ना लाहोरीचा सहभाग होता.

3. ई-वाहनं आता स्वस्त होणार

पर्यावरणपूरक वाहनं वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ई-वाहनांवरील GST मध्ये घट केली आहे. शनिवारी झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत ई-वाहनांवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आल आहे.

1 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

Image copyright Getty Images

एवढंच नव्हे तर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरवरील GST 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ही 36वी GST परिषदेची बैठक पार पडली.

4. राज्यात 42 हजार 468 मुलं शाळाबाह्य

राज्यातील एकूण 42 हजार 468 मुलं शाळाबाह्य असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आली आहे. लोकमतनं ही बातमी दिली.

या शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, 30 हजार 74 मुलांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आलंय. मात्र सरकारचे हे प्रयत्न तोकडे असल्याचं अनेक संघटनांचं म्हणणं आहे.

Image copyright Getty Images

दुसरीकडे, संघर्ष वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार एका तालुक्यात हजारहून अधिक मुलं शाळाबाह्य आढळले. त्यामुळे सरकारच्या सर्वेक्षण अहवालातील आकडेवारी फसवी असल्याचं मत संघर्ष वाहिनीच्या दीनानाथ वाघमारे यांनी दिली.

5. 28 नव्या ताऱ्यांचा शोध

आकाशगंगेतील 28 नवे तारे भारतीय संशोधकांनी शोधून काढले आहेत. उत्तराखंड येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्व्हेशनल सायन्सेसमधील संशोधकांनी ही कामगिरी केली. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

नव्याने शोधलेल्या या ताऱ्यांची प्रकाशमानता सातत्याने बदलत असते. त्यामुळे हे संशोधन दुर्मिळ कामगिरी आहे, असं संस्थेचे वहाब उद्दीन म्हणाले.

Image copyright Getty Images

ग्लोब्युलर क्लस्टरची रचना या शोधामुळे उलगडेल, असा विश्वास संस्थेचे माजी संचालक अनिल पांडे यांनी सांगितलं. अनिल पांडे यांच्या नेतृत्त्वाखालीच नवे तारे शोधण्याचं संशोधन पार पडलं. हे संशोधन ऑगस्ट महिन्यात अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)