कर्नाटक: येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्याआधी 14 बंडखोर आमदार रमेश कुमार यांच्याकडून अपात्र

कर्नाटक Image copyright Getty Images

कर्नाटक विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या 14 आमदारांना अपात्र ठरवलं आहे. सोमवारी बी. एस. येडियुरप्पा आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत त्याआधी रमेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

पक्षांतर कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी रमेश कुमार यांनी काँग्रेसचे 11 तर जनता दलाच्या तीन आमदारांना अपात्र ठरवलं आहे.

याआधी 25 जुलैला रमेश कुमार यांनी काँग्रेसच्या तीन आमदारांना अपात्र ठरवलं होतं. एकूण अपात्र झालेल्या आमदारांची संख्या आता 17 वर गेली आहे.

काँग्रेस नेते सिद्धरमैय्या यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. जे लोक भाजपच्या जाळ्यात अडकतात त्यांच्यासाठी हा मोठा धडा असल्याचं ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टात आव्हान

या निर्णयाविरोधात हे आमदार सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रात थांबलेले एक आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी बीबीसीला सांगितलं की या निर्णयाला सोमवारी आव्हान दिलं जाईल. कर्नाटक विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 225 आहे. 17 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर पात्र आमदारांची संख्या 208 झाली आहे. बहुमतासाठी भाजपला 104 चा आकडा पार करावा लागणार आहे.

Image copyright STR
प्रतिमा मथळा बी. एस. येडियुरप्पा

भाजपकडे एकूण 105 आमदार आहेत. काँग्रेसच्या आमदारांची संख्या 65 तर जेडीएसच्या आमदारांची संख्या 34 आहे. कर्नाटकात एक आमदार बहुजन समाज पक्षाचा आहे. जरी त्या आमदाराने भाजपविरोधात मतदान केलं तरी भाजपला फरक पडणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)