महाराष्ट्र विधानसभा: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 50हून अधिक आमदारांना भाजपमध्ये यायचंय - गिरिश महाजन #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार संपर्कात : गिरीश महाजन

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 हून अधिक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, आठवडाभरातच निर्णय अपेक्षित आहे, असं भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली.

रविवारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत आरोप केले की भाजप सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून, इतर पक्षातील नेत्यांच्या मागे चौकशा लावून त्यांना भाजपममध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडत आहेत. त्यानंतर गिरीश महाजन यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिलं.

"आम्हाला कुणावरही दबाव आणण्याची गरज नाही. उलट नेतेच भाजपमध्ये येण्यास मागे लागले आहेत. त्यापैकी निवडक नेत्यांनाच प्रवेश देऊ," असंही महाजन म्हणाले.

2) काश्मिरात अतिरिक्त सैन्य दाखल, कारण...

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने 10 हजार सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात केल्यानंतर वाढलेल्या तणावावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं 'कलम 35A' आणि 'कलम 370' काढून टाकलं जाणार आहे, अशा अफवा काश्मीर खोऱ्यात पसरली आहे.

मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या आसपास पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIकडून घातपात घडवण्याची शक्यता पाहता सुरक्षाव्यवस्थेतील ही वाढ करण्यात आली असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. टाईम्स ऑफ इंडियाने बातमी दिली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर मोदी सरकारने काश्मिरात 10 हजार सैनिक पाठवले आहेत.

Image copyright Getty Images

तर बडगाममधील रेल्वे सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आवाहन केलंय की, "काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा शिधा जमा करून ठेवा," अशी बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.

बडगाममधील RPFचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुदेश नुग्याल यांनी सोशल मीडियावरून हे पत्र सर्वांसमोर आणलं. त्यानंतर या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

3) नेत्यान्याहूंच्या प्रचारात 'मोदी'

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या निवडणूक प्रचारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात येत आहे. भारतीय नेत्यांच्या भेटीगाठी आपल्या यशाचं भाग असल्याचं म्हणत हा प्रचार केला जात आहे. डीएनएने ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 साली इस्रायलला भेट दिली होती. या भेटीचा व्हीडिओ नेत्यान्याहू यांनी प्रचार अभियानात वापरला आहे. पश्चिम आशियातील देशात भारतीय पंतप्रधानांच्या फोटोंचा पहिल्यांदाच अशाप्रकारे वापर करण्यात आला आहे.

मोदींसह रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीचेही फोटो, व्हीडिओ नेत्यान्याहू यांनी प्रचारात वापरले आहेत.

4) राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर

राज्यातील कृत्रिम पावसाचा 30 जुलै रोजीचा नियोजित प्रयोग पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

आता येत्या 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. DGCAच्या तपासणीला वेळ लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Image copyright POPSUIEVYCH/GETTY IMAGES

औरंगाबादमधील रडारच्या 200 किमी परिक्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे.

5) अमेठीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची हत्या

उत्तर प्रदेशातील अमेठीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. अज्ञात टोळक्याने 64 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकारी अमनुल्लाह यांची हत्या केली. इकॉनॉमिक्स टाइम्सने ही बातमी दिली.

लाकडी दांडक्याने अमानुल्लाह यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अमानुल्लाह यांच्यावर टोळक्याने घरात घुसून हल्ला केला, त्यावेळी त्यांची पत्नी घरात होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक दयाराम यांनी दिली.

निवृत्त होण्यापूर्वी अमानुल्लाह हे लष्करात कॅप्टन पदावर होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)