राहुल बोस: केळीवर टॅक्स लावल्याप्रकरणी हॉटेलला 25 हजारांचा दंड

बॉलीवूड अभिनेता राहुल बोसने 22 जुलैला सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. हा व्हीडिओ त्याने चंदीगडच्या जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमधून शूट केला होता.
व्हीडिओमध्ये तो आपल्या खोलीत ठेवलेल्या वेगवेगळ्या वस्तू दाखवतो. सगळ्यांत शेवटी प्लेटमध्ये ठेवलेल्या दोन केळींवर येऊन त्याचा कॅमेरा थांबतो. केळींसोबत तो एक पावती कॅमेऱ्यावर दाखवतो. यामध्ये दोन केळींची किंमत 442 रुपये 50 पैसे इतकी असल्याचं तो सांगतो.
- अक्षय कुमारमुळे ट्रेंड होणारं 'बॉटल कॅप चॅलेंज' नेमकं काय आहे ?
- नरेंद्र मोदी लहान मुलांसोबतचे फोटो शेअर करून काय सांगू पाहताहेत?
व्हीडिओमध्ये राहुल सांगतो की तो जिमला गेला होता. त्याने दोन केळी मागितली. त्याला केळी देण्यात आली. त्यानंतर केळींची किंमत पाहिली तर ती त्याच्यासाठी खूपच महाग असल्याचं राहुल बोस सांगतो.
हा व्हीडिओ त्याने 22 जुलैला पोस्ट केला होता. काही वेळातच त्याचा हा व्हीडिओ व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल घेत चंदीगडच्या प्राप्तिकर विभागाने हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएटवर 25 हजार रुपयांचा दंड लावला आहे.
हॉटेलने सीजीएसटीच्या कलम 11 चं उल्लंघन केल्याचं विभागाने सांगितलं. त्याच्या दंडापोटी 25 हजार इतकी रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
केळी हे टॅक्सच्या अंतर्गत येत नाहीत. तरीही हॉटेलने त्यांच्यावर टॅक्स लावला होता.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
ऋषि बागरी लिहितात, "हा दंड केळीच्या किंमतीमुळे घेण्यात आलेला नाही. तर हा दंड टॅक्सच्या अंतर्गत येणाऱ्या वस्तूवर टॅक्स लावल्यामुळे घेण्यात आला आहे."
राघवेंद्र एस लिहितात, "संपूर्ण भारतातील लोकांनी जीएसटीच्या उल्लंघनाची तक्रार दाखल करायला हवी."
एक मुसाफिर नावाच्या ट्विटर हँडलवरूनही एक ट्विट करण्यात आलं आहे. अभिनेता राहुल बोसचा हा मोठा विजय आहे, पण समोर न येणाऱ्या प्रकरणांचं काय, असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
- मोदींना ‘मॉब लिंचिग’बद्दल खुलं पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींना कंगना, प्रसून जोशींचं प्रत्युत्तर
- 'सोशल मीडियावरच्या मीम्समुळे माझ्या आयुष्याचीच थट्टा झाली'
- फेसअॅप: एका झटक्यात म्हातारं दिसण्याची हौस पडू शकते महागात?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)