बुधवारी भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांचा प्रवेश - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

चंद्रकांत पाटील Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) भाजपची 'महाभरती', बुधवारी आमदार-नगरसेवकांचा पक्षप्रवेश : चंद्रकांत पाटील

भाजपमध्ये बुधवारी महाभरतीची लाट येणार असून, काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पुढील 10-15 वर्षं भवितव्य दिसत नसल्याने नेते भाजपमध्ये येत असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.

भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी भाजपमधील 'महाभरती'चा दावा केला.

मुंबईतील वानखेडे मैदानावरील गरवारे पॅव्हेलियनमध्ये आमदार आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे.

नेमकं कोण कोण भाजपमध्ये दाखल होईल, हे स्पष्ट करण्यात आलं नाही. मात्र, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर, मधुकर पिचड, वैभव पिचड, नवी मुंबईतील नाईक कुटुंब इत्यादी नेते मंडळी भाजपच्या गोटात दाखल होतील, अशी चर्चा असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

2) राज ठाकरे, अजित पवार आणि राजू शेट्टींमध्ये खलबतं

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यावेळी अजित पवार, शेकपचे नेते जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेही उपस्थित होते. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

ईव्हीएमविरोधात एकत्रित येण्याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाली. ईव्हीएमला विरोध करण्यासाठी राज्यात आंदोलन उभं करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज ठाकरे यांना भेटल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. विरोधकांची दोन ऑगस्टला भेट संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात पुढील दिशा जाहीर केली जाणार आहे.

3) प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष?

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे. गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला या पदावर नेमलं जाणार असल्याची बातमी लोकमतं दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा पक्षाच्या सरचिटणसी प्रियंका गांधी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. मात्र, प्रियंका यांनीच नकार दिला होता.

Image copyright Getty Images

अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खर्गे आणि मुकुल वासनिक ही नावं काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चेनंतरच अध्यक्ष ठरवला जाणार आहे.

4) 16 हजार विद्यार्थी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, तब्बल 16 हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर राहिल्याचे समोर आलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पहिल्या प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळूनही तब्बल 16 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आलं आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

Image copyright Getty Images

अकरावीच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रवेश प्रक्रियेत एकूण 95 हजार 526 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पहिल्या फेरीत 48,872, तर दुसऱ्या फेरीत 16,336 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

पहिल्या प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश निश्चित न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत. ही संख्या 35,784 एवढी आहे.

5) भारताची रशियाकडून 'आर-27' क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा करार

भारतीय वायू सेनेने रशियाकडून 'आर-27' क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली. तब्बल 1500 कोटी रूपयांचा हा करार आहे. ईटीव्ही भारतने ही बातमी दिली आहे.

सुखोई-30 एमकेआय या विमानांवर 'आर-27' क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार असून, या क्षेपणास्त्रांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताने रशियाकडून 'स्पाईस-2000' क्षेपणास्त्राची तातडीने खरेदी केली होती. आता नव्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीमुळे मध्यम आणि लांब पल्ल्यापर्यंत मारा करण्याची भारताची क्षमता वाढणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)