मुंबई पाऊस: 'उल्हास नदीचा नव्हे, बदलापुरात बांधकामांचा पूर आलाय'

पूरात बुडालेल्या इमारती Image copyright INDIAN NAVY
प्रतिमा मथळा 2011 च्या जनगणनेनुसार, अंबरनाथ-बदलापूर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या उपनगरांची लोकसंख्या 35 लाखांच्या घरात पोहोचली आहे आणि आता हा आकडा निश्चित वाढला आहे.

"बदलापुरात नदीचा नव्हे बांधकामांचा पूर आलाय. मुंबईच्या या उपनगरांचं भवितव्य भीषण आणि अंध:कारमय आहे." - ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मोरे यांनी 26 जुलैला बदलापूर ते कल्याण-भिवंडी भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचं वर्णन करताना हे उद्गार काढले होते.

मुंबईसह ठाणे आणि जवळच्या उपनगरात यंदाच्या मान्सूनमध्ये पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेली स्थिती धोक्याची घंटा वाजवणारी ठरली आहे.

बदलापूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात 2 दिवसांत 90 कोटींच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. मात्र या सगळ्यामागे फक्त कोसळणारा पाऊस हेच कारण नसून या उपनगरांमध्ये उभ्या झालेल्या इमारतीही कारणीभूत असल्याचा सूर आता लोकांमधून उमटू लागला आहे.

लाख रुपयात घर

2000चं दशक संपलं आणि मुंबई पल्याडच्या या गावांमध्ये नागरीकरणाचा शिरकाव होऊ लागला. एरव्ही रेल्वे ही न थांबणाऱ्या गावांच्या सीमांवर इमारती उभ्या राहू लागल्या. त्या काळी इमारतींमध्ये घरंही एक लाख रुपयातही मिळायची. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना आंदण म्हणून देण्यास सुरुवात केली. हे चित्र भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागात सारखंच असल्याचं पत्रकार प्रशांत मोरे यांनी सांगितलं.

ठाण्यापलीकडच्या या सगळ्याच उपनगरांमध्ये 2000च्या सुरुवातीला पाण्याची फारशी टंचाई नव्हती. कारण ही उत्तरवाहिनी उल्हास नदी तेव्हा या सगळ्यांची तहान भागवण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे या उपनगरांमध्ये होणाऱ्या बांधकामांनी नदीचा किनारा जवळ करण्याचा प्रयत्न केला.

मात्र 2000 ते 2019 या 19 वर्षांत या उपनगरांचं चित्र फार बदललंय. 2011च्या जनगणनेनुसार, अंबरनाथ-बदलापूर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या उपनगरांची लोकसंख्या 35 लाखांच्या घरात पोहोचली होती आणि आता हा आकडा निश्चित वाढला आहे.

"या उपनगरांच्या पाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी उल्हास नदी, बारवी धरण, चिखलोली धरण यांसारखे मर्यादित स्रोत आहेत. मात्र या 19 वर्षांत झालेला नगरनियोजनाचा अभाव इथल्या बांधकामांना नदी किनारी घेऊन गेला. त्यामुळे नदीचं क्षेत्र कमी होऊ लागलं.

"तसं बदलापूर आणि अंबरनाथ ही निसर्गसंपन्न गावं होती. इथे अनेक जुने ओढे आणि नाले होते. हे सगळे नाले या उल्हास नदीला जाऊन मिळायचे. पण वाढीव बांधकामांमुळे या नाल्यांचे प्रवाह वळवले गेले किंवा बुजवण्यात आले, ज्यामुळे नदीच्या पुराचं पाणी शहरात घुसून पूरस्थिती निर्माण होते," असं प्रशांत मोरे सांगतात.

'बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांचे प्रवाह वळवले'

सध्या कल्याण ते बदलापूर, अंबरनाथ भागात 10 ते 15 हजार नव्या घरांचं बांधकाम सुरू आहे. हे मोठमोठे प्रकल्प सहन करण्याची तिथल्या छोट्या उपनगरांची स्थिती नसतानाही त्यांना मंजुरी मिळाली आहे. या सगळयाचा ताण शहरातल्या ड्रेनेज सिस्टम, नाले, ओढे यांच्यावर होत आहे.

यापूर्वी असलेली शहराची लोकसंख्या आणि नव्याने येऊ घातलेली लोकसंख्या, यांच्याकडून निर्माण होणारा कचरा कळत-नकळत नाल्यात शिरतोय. त्यामुळेही नाल्यांचा आकार कमी होतोय आणि मोठ्या पावसात नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होत आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेकडून घेतलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये दरदिवशी 120 टन आणि बदलापूरात 70 टन घनकचरा निर्माण होतो. यातला बहुतांश कचरा डेब्रिस आणि बांधकाम साहित्याचा असतो. यावरून इथे सुरू असलेल्या इमारत बांधकामांचा अंदाज येतो.

Image copyright UPENDRA CHOWDHARI
प्रतिमा मथळा 26 जुलै 2019च्या पूरात बदलापूरात बुडालेल्या इमारती

बदलापूर ते कल्याण या भागात अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही स्वरूपाच्या बांधकामांमागची नियोजनशून्यता यामागे आहे. हा आरोप सध्या आलेल्या पूराने सातत्याने होत आहे. या आरोपाबद्दल बदलापूरातील बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी मनोज वैद्य यांच्याशी आम्ही बातचीत केली.

याबद्दल वैद्य सांगतात की, "बदलापूर शहरातले नाले असोत किंवा कल्याण भागातले असोत, या ओढ्या-नाल्यांच्या भोवती प्रचंड बांधकामं झाली आहेत आणि होत आहेत हे आम्हाला मान्य आहे. उलट आज या उपनगरांमध्ये आलेला पूर हा नदीपेक्षा तिथल्या नाल्यांना आलेला पूर आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही. मात्र बांधकाम व्यावसायिक बांधकाम करताना शहराचा विकास आराखडा आधारभूत मानतो.

"या विकासआराखड्यात नाले-ओढे जे पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतात त्यांचा तांत्रिक उल्लेख आढळत नाही. अशावेळी तिथे बांधकाम करताना व्यावसायिक 9 मीटरचं अंतर राखून बांधकाम करतात. पण, या नादात अनेक व्यावसायिकांनी बदलापूर शहरातील नाल्यांचे काही प्रवाह वळवले आहेत किंवा बुजवले तरी आहेत हे वास्तव आहे."

'उल्हास नदीची पूररेषा आखलीच नाही'

बदलापूरातील 'लोकसत्ता'चे पत्रकार आणि उल्हास नदीच्या प्रश्नांवर सातत्याने लिखाण करणारे सागर नरेकर यांच्याशीही बीबीसीनं याच प्रश्नी बातचीत केली. तिथल्या नाल्यांचं सर्वेक्षण न झाल्याची बाजू त्यांनीही मांडली.

नरेकर सांगतात, "कर्जतपासून पुढे आणि वांगणी, बदलापूरकडे येणारी उल्हास नदी पुढे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. या नदीचं मूळ पात्र आणि सध्या या उपनगरांजवळ असलेलं पात्र यात फरक आहे. 2005 साली आलेल्या पुरावेळी या नदीने आपलं मूळ पात्र दाखवून दिलं होतं.

"शासकीय नियमांप्रमाणे प्रत्येक नदीची एक पूररेषा असते. या पूररेषेची तीन भागांत विभागणी केलेली असते. पहिली असते लाल रेषा (1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या रेषेच्या आत होतो), दुसरी निळी रेषा (60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या रेषेच्या आत होतो), तिसरी असते पांढरी रेषा (30 हजार पाण्याचा विसर्ग या रेषेच्या आत होतो) पण, दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही या रेषा आखल्याच गेली नसल्याने बांधकामं उभी राहताना या रेषांचा विचार होत नाही," ते सांगतात.

Image copyright UPENDRA CHOWDHARI
प्रतिमा मथळा बदलापूर ते कल्याण या भागात अनेक इमारती अशा पाण्याखाली गेल्या होत्या.

नरेकर पुढे सांगतात, "पूररेषेची आखणी न केल्याने बांधकाम व्यावसायिक मिळेल ती जागा विकत घेऊन तिथे बांधकामं उभी करतात. उदाहरणार्थ, बदलापूर पश्चिमेला आणि कल्याणमध्ये तसंच, उल्हासनगरच्या बाहेरील वरप, कांबा, रायते या गावांमध्ये आपण रिव्हर व्ह्यू प्रोजेक्ट, निअर रिव्हर प्रोजेक्ट अशा टॅग लाईन असलेले बांधकाम प्रकल्प पाहतो. नदी किनाऱ्याजवळ घरं अशी त्यांची जाहिरात असते. दिवाळी ते होळीपर्यंतच्या काळात या घरांची मोठी जाहीरात बांधकाम व्यावसायिक करतात. त्याच काळात ही घरं विकली जातात. मात्र पावसाळ्यात जरा जरी मोठा पाऊस झाला तरी या ठिकाणी पाणी शिरतं. परवा आलेला पूर याच भागात आला ही बाब लक्षणीय आहे," ते सांगतात.

उल्हास नदीची पूररेषा नसल्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना विचारलं असता, त्यांनी पूररेषा आखणीचं काम पालिकेचं नसून राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचं असल्याचं सांगितलं. तसंच इथून पुढे त्यांच्याकडून आखणी न झाल्यास काल्पनिक पूररेषा पकडून शहरातील बांधकामं नियंत्रित केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'नदींजवळ चाळी आणि इमारती'

कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांची वाढीची मर्यादा आता पूर्णतः संपली आहे. यामुळे या शहरांलगतच्या ग्रामीण भागाला नागरीकरणाचे वेध लागले आहेत. कारण या ग्रामीण भागातल्या लोकांनी या शहरांमधल्या जमिनींना मिळालेला सोन्याचा भाव पाहिलेला आहे. त्यामुळे अल्पावधीत श्रीमंत होण्याची इच्छा या ग्रामीण भागातही दिसते.

म्हणूनच उल्हासनगरपासून जवळ असलेल्या वरप, कांबा, रायते या गावांमध्ये सध्या मोठे इमारत प्रकल्प आणि चाळी उभ्या राहिल्या आहेत. पण यंदा पाऊस मोठा झाला आणि याच भागात पाणी शिरलं. तसंच उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं.

Image copyright UPENDRA CHOWDHARI
प्रतिमा मथळा एकट्या बदलापूरात 50 कोटी नागरी मालत्तेचं आणि 40 कोटी खाजगी असं एकूण 90 कोटींचं नुकसान पूरामुळे नुकसान झालं.

उल्हासनगर शहराच्या हद्दीत नाले मृतप्राय अवस्थेत असलयाचा आरोप होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने इथे पूरस्थिती ओढावल्याचं तज्ज्ञ सांगतात.

याबाबत आम्ही उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संवाद साधला. देशमुख सांगतात, "अनधिकृत बांधकाम आणि उल्हासनगर हे समीकरण असल्याची टीका सातत्याने होते. मात्र हे निर्वासितांचं शहर असून इथलया लोकांना शासनाने 1974 साली भूखंड दिले होते. तेव्हा लोकांनी हळूहळू इथे बांधकामं उभी केली. त्यामुळे इथली परिस्थिती आज ओढावलेली नाही. हे लक्षात घ्यायला हवं. उलटपक्षी आता अंबरनाथ तालुक्यात आलेल्या पुराच्या वेळी सर्वाधिक मदत ही उल्हासनगर महापालिका पोहोचवण्यात यशस्वी झाली."

90 कोटींचं नुकसान

बदलापूर ते कल्याण भागात पुराने आणि विशेषतः उल्हास नदीच्या पुराने घातलेलं थैमान हा महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याने देशभर चर्चेचा विषय ठरला. मात्र ही परिस्थिती दरवर्षीच्या पावसाळ्यात थोड्या-बहुत फरकाने अशीच असते असं जाणकार सांगतात.

'गंगामाई पाहुणी आली आणि माहेरवाशीण म्हणून राहून गेली' या कुसूमाग्रजांच्या कवितेचं 'गंगामाई पाहुणी आली की चार महिने जात नाही' हे विडबंन या उपनगरांमध्ये गमतीने म्हटलं जात असल्याचं सागर नरेकर सांगतात.

मात्र उल्हास नदीरूपी गंगामाईनं एकट्या बदलापुरात 50 कोटी नागरी मालमत्तेचं आणि 40 कोटी खासगी, असं एकूण 90 कोटींचं नुकसान केल्याची अधिकृत माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)