CCD चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ : कॉफीला कर्तेपण मिळवून देणारा अवलिया जातो तेव्हा...

वीजी सिद्धार्थ Image copyright Getty Images

भारतात कॉफी लोकप्रिय करण्याचं श्रेय कॅफे कॉफी डे अर्थात सीसीडीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांना जातं.

चहाप्रिय भारतीयांना कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी आकृष्ट करण्याची क्लृप्ती सिद्धार्थ यांनी शोधून काढली. विचारपूर्वक पद्धतीने उभारलेल्या सुरेख डिझाईनचा कॅफे हे सिद्धार्थ यांच्या वाटचालीचं रहस्य होतं.

त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातूनच तरुण वर्गात कॉफी पिण्याचं प्रमाण वाढलं.

पूर्वी कॉफी ही प्रामुख्याने दाक्षिणात्य हॉटेलांमध्ये मिळत असे. सिद्धार्थ यांनी कॉफीला देशभर पोहोचवलं. सिद्धार्थ यांनी कॉफीला सीसीडीच्या माध्यमातून ब्रँड बनवलं. देशातल्या अग्रगण्य ब्रँड्समध्ये सीसीडीचा समावेश होतो.

स्टारबक्स सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी सिद्धार्थ यांनी देशभरातल्या मोठ्या तसंच निमशहरांमध्ये सीसीडी लाँच केलं.

कॉफीची विक्री वाढवणं, कॉफीचं उत्पादन घेणाऱ्या छोट्या तसंच मध्यम पातळीवरील उद्योजकांना प्रोत्साहन तसंच उदरनिर्वाह मिळवून देणं यामध्ये सिद्धार्थ यांचं योगदान निर्णायक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सीसीडी

कॉफी उत्पादन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने चढउतार पाहायला मिळतात. यामुळे सीसीडी पर्वाआधी हा उद्योगममूह कॉफीसाठी निर्यातीवर अवलंबून होते.

सिद्धार्थ यांनी एकहाती देशभरातील कॉफी उत्पादनाला चालना मिळवून दिली. हे नि:संशय आहे. सीसीडीआधी आम्ही निर्यातीवर अवलंबून होतो. कॉफीच्या विक्रीवर जाचक नियम होते, असं इंडियन कॉफी बोर्डाचे माजी उपाध्यक्ष डॉ. एस. एम. कावेरप्पा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

कॉफीचं देशांतर्गत उत्पादन दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढू शकलं. याचं श्रेय सिद्धार्थ यांच्या प्रयत्नांना जातं.

डॉ. कावेरप्पा स्वत: कॉफी उत्पादनात कार्यरत आहेत. 2007 ते 2009 आणि 2014 ते 2016 ते इंडियन कॉफी बोर्डाचे उपाध्यक्ष होते.

गोडागूमधील कॉफी ग्रोव्हर्स कोऑपरेटिंग मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष एम. बी. दैवेय्या यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, "काही वर्षांपूर्वी मी वैष्णोदेवीला गेलो होतो. तिथे पाच रुपयांत कॉफी प्यायलो."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॉफी

चिकमंगळूरमधल्या कॉफी उत्पादक कुटुंबातच सिद्धार्थ यांचा जन्म झाला. मंगळूरमध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थ यांनी मुंबई गाठली. बेंगळुरूला परत येण्यापूर्वी त्यांनी एका गुंतवणूक क्षेत्रातील कंपनीत काम केलं. सीवाना सेक्युरिटीज नावाची कंपनी त्यांनी स्थापन केली.

1996 मध्ये सिद्धार्थ यांनी बेंगळुरूमधील सगळ्यांत गजबजलेला रस्ता ब्रिगेड रोडवर कॅफे कॉफी डे सुरू केलं. त्याचवेळी बेंगळुरूत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्र विस्तारत होतं. आजच्याप्रमाणे इंटरनेट सगळ्यांसाठी सहजपणे उपलब्ध नव्हतं. हळूहळू इंटरनेट पर्वाचा उगम होत होता.

इंटरनेटवर काम करता करता एक कप कॅपचिनो अर्थात कॉफी पिण्याचा अनुभव अनोखा होता. एक कप कॉफी आणि तासभर इंटरनेट वापरण्यासाठी साठ रुपये मोजावे लागत असत. 2001 मध्ये सिद्धार्थ यांचे आधीच्या उद्योगातील सहकारी नरेश मल्होत्रा यांनी कॉफी उद्योगात साथ द्यायचं ठरवलं. तोपर्यंत सीसीडी ब्रिगेड रोड सोडून शहराच्या अन्य भागात पोहोचलं होतं.

नरेश आणि सिद्धार्थ जोडी एकत्रितपणे कामाला लागल्यानंतर सीसीडीच्या आऊटलेट्स देशभरात सुरू झाल्या.

अमृतसरच्या माणसांनी सकाळी चहाऐवजी कॉफी प्यावी अशी मल्होत्रा यांची इच्छा होती, असं सिद्धार्थ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॉफी उत्पादनाला सिद्धार्थ यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.

आजच्या घडीला सीसीडीने भारतीय समाजात, संस्कृतीत स्थान पटकावलं आहे. तरुण मंडळींपासून लग्नेच्छुक कुटुंबीयांसाठी सीसीडी हे भेटण्याचं ठिकाण झालं आहे. देशभरात सीसीडीचे 1700 आऊटलेट्स आहेत.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका रिअल इस्टेट एजंटने सांगितलं की, कोणत्याही बिल्डिंगमध्ये सीसीडी असेल तर अन्य उद्योग आकर्षित होतात.

कॉफी उद्योगाशी संबंधित एका पत्रकाराने सिद्धार्थ यांच्याविषयी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील वावरणारी माणसं आणि सिद्धार्थ यांच्यात फरक होता. त्यांनी आपले नातेवाईक आणि गावातल्या लोकांशी संपर्क कायम ठेवला. गावात सिद्धार्थ यांचा कॉफी उत्पादन व्यवसाय काही दशकांपासून सुरू आहे.

डॉ. कावेरप्पा सांगतात, चांगला माणूस अशी त्यांची जनमानसात प्रतिमा होती. नफ्याचा अंदाज न घेता त्यांनी सीसीडी उद्योग काहीशा घाईत सुरू केला. उदाहरणार्थ कॉफीचं उत्पादन करणाऱ्या एका मित्राने सांगितलं की सिद्धार्थ यांनी मदिकेरी आणि मंगलोर हायवेवरील ग्रामीण भागात काही आऊटलेट्स उघडले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सीसीडी

मार्च 2019मध्ये सीसीडीचा कारभार 1814 कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षी सिद्धार्थ यांनी माइंड ट्री कन्सलटिंग कंपनीतला आपला हिस्सा एल अँड टी कंपनीला विकल्यानंतर त्यांना 2,858 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

2017 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने सिद्धार्थ यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता.

सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई आहेत.

देवैय्या म्हणतात, कॉफीचं उत्पादन करणाऱ्यांसाठी इतकं योगदान देणारी व्यक्ती का निराश असेल?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)