पृथ्वी शॉ: खोकल्यावर उपचार म्हणून कफ सिरप घेणं जेव्हा महागात पडतं...

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉ

खोकला बरा होण्यासाठी सहसा कफ सिरप दिलं जातं. क्रिकेटपटू पृथ्वी शॉनेही खोकला आणि थंडीसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून औषध घेतलं. आणि त्याचाच त्याला फटका बसला.

या सिरपमध्ये प्रतिबंधित घटक आढळून आल्याने पृथ्वी डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला. आणि त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी BCCIने लादली आहे.

पायाला झालेल्या दुखापतीमुळे पृथ्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतला होता. या दुखापतीतून सावरणाऱ्या पृथ्वीला लवकरात लवकर टीम इंडियात पुनरागमन करायचं होतं. मात्र खोकल्याने तो त्रस्त होता.

IPLपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन करण्याचा पृथ्वीचा निर्धार होता. मात्र इंदूरला पोहोचल्यानंतर पृथ्वीला कफाचा त्रास जाणवू लागला. थंडी वाजत असल्याचं स्पष्ट झालं होतं.

मेडिकलमध्ये पृथ्वीला कफ सिरप दिलं. याने तात्काळ बरं वाटेल असं मेडिकलवाल्याने पृथ्वीला सांगितलं. पण BCCIला हे बरं वाटलं नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बीसीसीआयने पृथ्वी शॉवर बंदीची कारवाई केली आहे.

BCCIचे अँटी डोपिंग मॅनेजर साळवी यांच्या अहवालानुसार, पृथ्वीने खोकला आणि थंडीसाठी वडिलांचा सल्ला घेतला. बरं होण्यासाठी त्यांनी जवळच्या मेडिकलमधून खोकल्यासाठी सिरप घेण्याचा सल्ला दिला.

काही दिवस कफ सिरप घेतल्याचं पृथ्वीने स्पष्ट केलं. BCCIला सांगितलं की त्याला कफ सिरपचं नाव आठवत नाही, कफ सिरपची बाटली आणि त्याचं कव्हरही त्याने काम झाल्यावर फेकून दिलं. त्यानंतर 21 फेब्रुवारीला तो मॅचही खेळला. त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या लघवीचा नमुना घेण्यात आला होता.

खोकल्यासाठी कफ सिरप विना प्रिस्क्रिप्शन मिळतं. पृथ्वीने डॉक्टरांच्या सल्ल्याविना कफ सिरप घेतल्याने या औषधातील घटक त्याला समजू शकलेले नाहीत.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ICC तसंच BCCIच्या कोड ऑफ कंडक्टचं पालन करणं अनिवार्य असतं. उत्तेजकविरोधी पथकाकडून कोणते घटक प्रतिबंधित आहेत आणि कोणते नाहीत, याची माहिती खेळाडूंना देण्यात येते. कोणती औषधं घेतल्याने बंदीची कारवाई होऊ शकते, याची कल्पनाही त्यांना देण्यात येते.

दुखापती खेळाडूंच्या करिअरचा भाग असतात. दुखापतीतून सावरण्यासाठी औषधोपचार सुरू असतात.

औषधं आणि त्याचे घटक हा तांत्रिक भाग आहे. खेळाडूंना त्याबाबत सगळी माहिती असणं अवघड आहे.

म्हणूनच प्रत्येक संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश असतो. औषधं किंवा औषधातील घटकांबाबत साशंकता असल्यास खेळाडू मेडिकल ऑफिसरची मदत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. प्रतिबंधित औषधं तसंच औषधांच्या घटकासंदर्भात ICC तसंच BCCIकडून जारी करण्यात आलेल्या सूचीचा आढावा घेऊ शकतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉ

दुखापतीतून सावरण्यासाठी औषधं घेणं आवश्यक आहे. मात्र ही औषधं किंवा औषधांचे घटक प्रतिबंधित असल्यास खेळाडूवर उत्तेजकांच्या सेवनप्रकरणी कारवाई होऊ शकते.

मात्र काही खेळाडू जिंकण्यासाठी कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकाचं सेवन करतात. उत्तेजकांच्या सेवनानंतर खेळाडूंची नैसर्गिक क्षमता वाढीस लागते. अन्य खेळाडूंच्या तुलनेत त्यांना फायदा मिळतो.

मात्र हे खेळभावनेला बट्टा लावणारं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तेजक सेवनात दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात येते.

वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून माहिती घेतल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. मेडिकल दुकानात औषधं प्रिस्किप्शनशिवाय मिळत नाहीत. मात्र कफ सिरप विना प्रिस्क्रिप्शन मिळत असल्याने पृथ्वीने सोपा पर्याय स्वीकारला.

पृथ्वीवरची कारवाई कमी कालावधीची का?

पृथ्वीने घेतलेल्या कफ सिरपमध्ये टर्ब्यूटालाईन हा घटक आढळला. श्वसन यंत्रणेचं चलनवलन सुरळीतपणे व्हावं यासाठी हे औषध घेतलं जातं. वाडाच्या नियमांनुसार टर्ब्यूटालाईनचं सेवन केल्यास दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा होऊ शकते. मात्र पृथ्वीने कामगिरी उंचावण्यासाठी नव्हे तर खोकल्यासाठी औषध घेतल्याचं स्पष्ट झालं.

पृथ्वीने डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट मेडिकलमधून औषध घेतलं याचा विचार बीसीसीआयच्या उत्तेजकविरोधी व्यवस्थापकांनी केला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉचं वयही शिक्षा देताना विचारात घेण्यात आलं. पृथ्वी केवळ 19 वर्षांचा आहे. प्रतिबंधित औषधं आणि औषधांचे घटक याबाबत पृथ्वीला जुजबी माहिती आहे. पृथ्वीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अत्यंत मर्यादित आहे. या दोन घटकांचा साकल्याने विचार करण्यात येऊन पृथ्वीवर कमी कालावधीची बंदी घालण्यात आली.

काय आहे नेमकं प्रकरण

डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वी शॉ याला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. बीसीसीआयने ही कारवाई केली.

पृथ्वीवर ही बंदी फेब्रुवारी महिन्यापासूनच पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्याच्यावर ती लागू असेल.

22 फेब्रुवारी 2019 ला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान इंदोरमध्ये BCCIच्या डोपिंगविरोधी धोरणाचा भाग म्हणून पृथ्वीची युरीन टेस्ट घेण्यात आली होती. या तपासणीमध्ये त्याच्या शरीरात टर्ब्यूटालाईन आढळून आलं, असं BCCIने एका पत्रकात सांगितलं.

टर्ब्यूटालाईन हा कोणत्याही कफ सिरपमध्ये सर्वसाधारपणे आढळणारा पदार्थ आहे. हा पदार्थ जागतिक तसंच देशांतर्गत स्पर्धांमध्ये वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच WADAच्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीमध्ये आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पृथ्वी शॉ

घशाच्या इन्फेक्शनमुळेच त्याने औषध घेतलं होतं. परफॉर्मन्समध्ये वाढ करण्यासाठी ते घेण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण पृथ्वीने दिलं.

BCCIने पुरावे तपासले आणि हे त्याने हेतूपुरस्सरपणे केलं नसल्याचं निदर्शनास आलं. पण त्याने याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली, अशी माहिती BCCIने या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

16 जुलै रोजी पृथ्वी शॉ याच्यावर अँटी डोपिंग रूल व्हायोलेशन (ADRV) चे आरोप लावण्यात आले. अखेरीस BCCIच्या अँटीडोपिंग नियमांमध्ये कलम 2.1 अंतर्गत त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)