देवेंद्र फडणवीस म्हणतात, भाजप काही धर्मशाळा नाही कोणीही उठावं आणि यावं

भाजप प्रवेश

"भाजप काही धर्मशाळा नाही. कोणीही उठावं आणि यावं अशी परिस्थिती नाही. जे चांगले आहेत त्यांनाच आम्ही पक्षात प्रवेश देत आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

"भाजपमध्ये कोणालाही धाक किंवा प्रलोभनं दाखवून प्रवेश दिला जात नाहीये. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. पण भाजप ही काही धर्मशाळा नाहीये. जे चांगले आहेत, त्यांनाच आम्ही प्रवेश देत आहोत," असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. 

चित्रा वाघ, मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड, कालिदास कोळंबकर, संजीव नाईक, शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते. 

भाजपमध्ये कोणीही पदांसाठी प्रवेश केला नाही. तशी मागणीही त्यांनी केली नाही. आपापल्या भागातील समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी त्यांनी सहकार्याची मागणी केली होती, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केवळ घोषणाबाजी नाही, तर योजनांची अंमलबजावणी होताना दिसतीये. आणि म्हणूनच समाजाच्या सर्व स्तरातील, जाती-धर्मातील लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. सर्वजण त्यांच्यासोबत येत आहेत." 

विक्रमी बहुमतानं निवडून येऊ

आमच्या पक्षामध्ये अनेक नेते आहेत. त्यामुळे आता आम्ही स्वबळावर लढण्याची भाषा करू अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. पण आमची शिवसेनेसोबत युती आहे. काही लोक आमच्यासोबत येत आहेत तर काही आमच्या मित्रपक्षासोबत जात आहेत. आम्ही सोबतच लढू, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बहुमतानं निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. "महाराष्ट्रात युतीचं सरकार येणार आहे. आता केवळ बहुमताचे कोणते रेकॉर्ड आपण तोडतो हे पहायचं आहे," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

येत्या पंधरा दिवसांत शिवसेना आणि अन्य मित्रपक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं लोकांचा पाठिंबा युतीच्या बाजूनं वळविण्यासाठी आता प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.  

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)