Zomato, Swiggy, UberEats: डिलिव्हरी बॉयचा धर्म विचारता? 'अन्नाला कसला आलाय धर्म?'

प्रातिनिधिक छायाचित्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

"आमची गरज आहे म्हणून आम्ही काम करतो. आम्हा डिलिव्हरी बॉईजची तशी कुणी किंमत करत नाही. तो सगळ्यांची किंमत करतो, पण त्याची किंमत कुणीही करत नाही. ही एक अतिशय विदारक परिस्थिती आहे," डिलिव्हरी बॉय संदीप (नाव बदललं आहे) सांगत होता.

संदीप तीन वर्षांपासून लोकांना त्यांनी अॅपवरून ऑर्डर केलेलं अन्न पोहोचवण्याचं काम करतोय. आधी तो स्विगीमध्ये काम करायचा. आता तो झोमॅटोसाठी काम करतो.

"काही ग्राहक चांगले असतात, पण नव्वद टक्के ग्राहक हे खराब असतात," तो सांगतो.

स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर ईट्स अशा अनेक कंपन्यामुळे घरपोच अन्न मागवण्याची सोय झाली आहे. मात्र एक अॅप आणि त्यामागे दडलेली व्यक्ती यांचं आयुष्य काय आहे, याचा फारसा विचार होताना दिसत नाही.

कदाचित पोटातली भूक हा सगळा विचार करण्याची संधीच आपल्याला देत नाही. काही घटना घडतात, त्यांची चर्चा होते आणि मग अॅपमागे काय दडलंय, याची कल्पना येण्यास सुरुवात होते.

तर झालं असं की, जबलपूरमधील एका व्यक्तीने झोमॅटो अॅपवरून काहीतरी खायला मागवलं. मात्र डिलिव्हरी बॉयचं मुस्लीम नाव पाहून त्या व्यक्तीने आपल्याला तो डिलिव्हरी बॉय बदलून हवा, अशी विनंती केली. मात्र झोमॅटोने मात्र "अन्नाला कसला आलाय धर्म? अन्न हाच एक धर्म आहे," असं सांगत त्या माणसाची मागणी अमान्य केली.

मात्र अशा प्रकारची निवड करणं हा संविधानाने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे, असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं. या वादावादीत त्या माणसावर टीका तर झालीच, शिवाय उबर ईट्स या प्रतिस्पर्धी कंपनीनेसुद्धा झोमॅटोच्या भूमिकेला एक ट्वीट करून पाठिंबा दिला.

या निमित्ताने का होईना, पुन्हा एकदा अशा फुड डिलिव्हरी कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय अॅपच्या पडद्यामागून पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या आणि बातम्यांच्या प्रकाशझोतात आले.

आम्हीही काही डिलिव्हरी बॉईजशी याविषयी बातचीत केली तेव्हा त्यांनी "सर, तुमची ऑर्डर घेऊन आलोय. चांगलं रेटिंग द्याल, प्लीझ", या पलीकडे काहीतरी बोलण्याचं धाडस केलं.

चांगले वाईट अनुभव

सुलतान नावाचा मुलगा नुकताच या क्षेत्रात आला आहे. तो स्विगीसाठी काम करतो. आम्ही जेव्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो साहजिकच खूप घाईत होता. त्याला या वादाची काहीही माहिती नव्हती.

मात्र ग्राहकांचे चांगले अनुभव आल्यानं सध्या तरी सुलतान त्याच्या नोकरीत आनंदी आहे. "उन्हाळ्यात लोक पाणी वगैरे देतात," असं त्याने सांगितलं.

राजेश नावाचा एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय तर फारच आनंदी होता. तो म्हणाला, "मी अनेक वर्षांपासून हे काम करतोय. आतापर्यंत तरी मला काही वाईट अनुभव आलेला नाही. काही ग्राहक माझ्याशी फारच चांगले वागलेत.

"दिल्लीच्या काही भागात पार्किंगची मोठी समस्या आहे. तिथे आम्ही त्यांना विनंती करतो की खाली येऊन तुमचे पदार्थ घेऊन जा तर ते घेऊन जातात. अनेक लोक उन्हातान्हात पाणीही वगैरे विचारतात," हे त्यानेही सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

झोमॅटोच्या वादावर त्याच कंपनीसाठी काम करणारा अभिषेक चिडलेला दिसत होता. धर्माचा आणि उद्योगधंद्याचा काय संबंध, असा प्रतिप्रश्न त्याने मला विचारला.

याला वर्गभेदही जबाबदार आहे, असा महत्त्वाचा मुद्दा त्याने पुढे केला. "एखाद्या श्रीमंत आणि मोठ्या पदावरील व्यक्तीला नाकारा ना. असं करू शकता का? हे सगळे सुशिक्षितांचे चोचले आहेत. मीही निरक्षर आहे. मी हे असलं काहीही मानत नाही. व्यवहार आणि व्यापारात सगळं माफ असावं. गरज आहे म्हणून मी हे काम करतोय."

कामाची आणि खाण्याची वेळ

आम्ही यासंबंधी स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांच्या लोकांशी बोललो. एखादी व्यक्ती किती काम करते यावरूनच तिचं मानधन अवलंबून असतं.

राजेश सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत काम करतात. या कामात आठवडी सुट्टी नसते. मात्र राजेश यांना त्यांचं काम फार आवडतं, त्यामुळे त्यांना या वेळा त्रासदायक वाटत नाही. एक विशिष्ट टार्गेट त्यांना पूर्ण करावंच लागतं. त्याच्यापुढे अतिरिक्त काम करण्याची इच्छा असेल तर जास्त पैसे मिळतात. हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं, असं ते सांगतात.

Image copyright BBC/Rohan Namjoshi
प्रतिमा मथळा झोमॅटो आणि स्विगीची लोक डबा खातांनाचं दुर्मिळ छायाचित्र

पण लोकांची भूक शमवणारे हे डिलिव्हरी बॉईज कधी जेवतात? काही महिन्यांपूर्वी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कुणीतरी ऑर्डर केलेलं अन्न खातानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा हा प्रश्न मोठा झाला होता.

तुम्ही कधी जेवता, या आमच्या प्रश्नावर तर सगळे बॉईज हसले. दुपारी 12 ते 3 या वेळेत त्यांना प्रचंड काम असतं, त्यामुळे या वेळेत तर ते जेवतच नाही. त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते जेवतात.

जेवणाच्या अनिश्तित वेळांमुळे अभिषेकचं वजन पाच किलोने कमी झाल्याचं त्यानं सांगितलं.

पण स्विगी कंपनी त्यांच्या डिलिव्हरी बॉईजला 45 मिनिटं जेवणाची सुटी देतं. झोमॅटो कंपनीसाठी काम करताना मात्र ही व्यवस्था नाही. पण लोकांना त्यांचं आवडतं अन्न पोहोचवणारे हे डिलिव्हरी बॉईज पोटापाण्यासाठी स्वतःची भूक बाजूला ठेवत आहेत.

पण त्यांना कोण विचारतंय? उलट या ताज्या प्रकरणामुळे दुसराच प्रश्न पुढे आला आहे. त्या निमित्ताने का होईना, अशा अॅप्समागे दडलेली मानवी बाजू समोर आली आहे.

'त्या' डिलिव्हरी बॉयला काय वाटतं?

दरम्यान, जबलपूरच्या या प्रकरणातला डिलिव्हरी बॉयने सांगितलं की त्याला मात्र हे प्रकरण वाढवायचं नाहीये. बीबीसी हिंदीसाठी शुरैह नियाझी यांनी त्याच्याशी बातचीत केली, तेव्हा तो म्हणाला की असा प्रकार त्याच्यासोबत पहिल्यांदाच घडलाय. "ऑर्डर का रद्द झाली, याचं कारण मला त्यावेळी कळालं नाही. पण नंतर कळालं की मी मुसलमान आहे म्हणून ऑर्डर रद्द झाली," त्याने सांगितलं.

जबलपूर पोलिसांकडे या प्रकरणी कुठलीही तक्रार आलेली नाही. मात्र पोलिसांनी झोमॅटोवर देणाऱ्या 'त्या' व्यक्तीला धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. @NaMo_SARKAAR या अकाऊंटवरून ट्वीट करून या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयचं नाव आणि धर्म पाहून तो बदलण्याची मागणी केली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव या दोघांचीही नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत.

बीबीसीशी बोलताना ती व्यक्ती म्हणाली की त्याने ती ऑर्डर रद्द केली कारण डिलिव्हरी बिगरहिंदू व्यक्तीकडून केली जात होती. "हे ट्विट मी झोमॅटोच्या कस्टमर सर्व्हिसला उद्देशून केले होते, मात्र त्याला वेगळा रंग दिला गेला," असं त्याने बीबीसी हिंदीच्या शुरैह नियाझी यांना सांगितलं.

पुढे सांगताना ते म्हणाले की "श्रावण महिन्यात आम्ही उपवास करतो आणि रात्री शाकाहारी हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर करतो. पण जेव्हा मी पाहिलं की जेवणाची डिलिव्हरी कुणी बिगरहिंदू करणार आहे, तेव्हा मी ते बदलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते झाले नाही तेव्हा मी डिलिव्हरी रद्द केली. मी केवळ बिझनेस प्रॅक्टिसबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. हा माझ्या धार्मिक श्रद्धेचा विषय आहे."

झोमॅटोवर ऑर्डर देणारी ही व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून, तिला ट्विटरवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल फॉलो करतात, असं @NaMo_SARKAAR या अकाऊंटवर नमूद होतं. आता मात्र हे ट्विटर अकाऊंट दिसणं बंद झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)