उन्नाव प्रकरण : पीडितेची आई म्हणते, 'आम्हालाही मारून टाकलं तरी काय होईल?'

उन्नाव पीडितेची आई

"किती दिवस भ्यायचं? मारायचं असेल तर मारून टाका म्हणावं. जेव्हा त्यांनी इतक्या लोकांना मारलंय, तर आम्हालाही मारून टाकतील, त्यानं काय होणार?"

उन्नाव प्रकरणात जीवन आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितेच्या आईच्या या शब्दांमध्ये निराशा स्पष्टपणे जाणवते.

बीबीसीनं लखनऊमधील त्या हॉस्पिटलमध्ये पीडितेच्या आईची भेट घेतली, जिथं त्यांची मुलगी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आली आहे.

पीडितेच्या तब्येतीविषयी विचारल्यावर तिच्या आईनं सांगितलं की, त्या गेल्या 3 दिवसांपासून मुलीला पाहू शकल्या नाहीत.

त्यांनी सांगितलं, "परवापासून मुलीला पाहू शकले नाही. तुम्ही तिला बघू शकत नाहीत, असं ते म्हणतात."

"दोन दिवसांपूर्वी मुलीला पाहिलं होतं, तेव्हा तिच्या तब्येतीत काही सुधारणा नव्हती. तिने डोळेही उघडले नव्हते, बोलतंही नव्हती. ती बरी होईल की नाही, देवालाच माहिती," त्या पुढे सांगतात.

न्यायाची अपेक्षा नाही

इतकं सगळं झाल्यानंतर या प्रकरणाविषयी तक्रार नको करायला हवी होती, असं वाटतं का, असं पीडितेच्या आईला विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "आम्ही यांच्याशी लढलो नाही तरीसुद्धा ते आम्हाला त्रास देतच राहणार, आता ही लढाई खूपच कठीण आहे."

या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा नाहीये, असंही त्यांनी पुढे म्हटलं.

घरच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करत त्या सांगतात, "घरी कुणीच नाहीये. फक्त लहान मुलं आहेत. घराचा खर्च भागवेल, असं कुणीच नाही, लहान मुलं कुठं जाणार?"

उन्नाव प्रकरणातील पीडितेनं त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

याविषयी पीडितेच्या आईनं सांगितलं, "मुलगी म्हणाली चला हिम्मत करू आणि आता सगळ्या कुटुंबानं जीव देऊ. जेव्हा कुणी कमावणारं नसेल, तर काय करणार?"

"तू जीव दिला तर आम्ही काय करायचं, आम्हीसुद्धा तुझ्यासोबत जीव देतो, असं मी मुलीला म्हटलं."

अटकेनं फरक नाही

"या प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या अटकेनंतर पीडितेच्या कुटुंबाचा त्रास कमी झाला नाही," असं पीडितेची आई सांगते.

"आमचं सगळं कुटुंब संपलं, पण आमदाराचं मात्र काहीएक नुकसान झालं नाही."

भाजपच्या आमदारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या वडिलांचा पोलिस कोठडीत संदिग्ध मृत्यू झाला होता.

प्रतिमा मथळा पीडितेच्या आईशी चर्चा करताना बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य

पीडितेच्या आईनं बीबीसीला सांगितलं, "माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. ते वरून खाली येणार नाहीत. आमदाराला कुटुंब, नेतेपद सगळं मिळेल, आम्हाला मात्र काहीच मिळणार नाही."

"नेहमीच भीतीच्या वातावरणात राहावं लागतं. आता आम्हाला वाटतं की, मारतील तर मारतील. पण, असं नाही की आम्ही बाहेर पडणार नाही, पाणी आणणार नाही. सगळं काम करणार, किती दिवस घरात बसून राहणार?"

उन्नाव बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय झालं?

4 जून 2017: पीडितेनं भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला.

11 जून 2017: पीडिता हरवली आणि हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

22 जून 2017: पीडितेची कोर्टात हजोरी, साक्ष दिली.

04 एप्रिल 2018: पीडितेचे वडील आर्म्स अक्ट कायद्यांतर्गत अटक.

09 एप्रिल 2018: पीडितेच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू.

11 एप्रिल 2018: उत्तर प्रदेश सरकारनं ही केस सीबीआयला सोपवली.

13 एप्रिल 2018: आमदाराला अटक, सीबीआयकडून चौकशी.

11 जुलै 2018: सीबीआयची पहिली चार्जशीट दाखल, सेंगर यांच्यावर आरोप.

28 जुलै 2019: पीडितेच्या कारला ट्रकची धडक.

31 जुलै2019: सीबीआयकडे अपघाताची चौकशी सोपवली.

1 ऑगस्ट2019: उन्नाव बलात्कारासंबंधातले सर्व खटले उत्तर प्रदेशातून दिल्लीला वर्ग करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)