मुंबईत 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, औरंगाबादमध्ये तक्रार दाखल : #5मोठ्याबातम्या

महिलेचं चित्र

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 19 वर्षिय मुलीवर मुंबईत सामुहिक बलात्कार

19 वर्षं वयाच्या एका मुलीवर मुंबईत तिच्या वाढदिवसादिवशीच सामूहिक बलात्कार होण्याची घटना घडली आहे. या मुलीला औरंगाबादच्या बेगमपुराधल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तिची प्रकृती स्थिर असली तरी नीट नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. ती सध्या बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. इंडिया टुडेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "7 जुलै रोजी ही मुलगी मुंबईला गेली होती. तिच्या चार मित्रांनी तिचा वाढदिवस तिच्या घरात साजरा करण्याचं ठरवलं. केक कापल्यानंतर चौघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घरी परतल्यावर तिनं याबाबत पालकांना काहीही सांगितलं नाही. 24 जुलै रोजी गुप्तांगामध्ये वेदना जाणवू लागल्यानंतर तिला औरंगाबादमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आल्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली. 30 जुलै रोजी तिनं ही घटना आपल्या वडिलांना सांगितली. तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला."

चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "याप्रकरणी तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही."

2. कुलभूषण जाधव यांना आज भारतीय दुतावासातील अधिकारी भेटणार

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज भेटण्यासाठी भारतीय वकिलातीला परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी ही माहिती गुरुवारी दिली. भारतीय वकिलातीमधील अधिकारी आज जाधव यांची भेट घेणार आहेत.

Image copyright PAKISTAN FOREIGN OFFICE
प्रतिमा मथळा कुलभूषण जाधव

पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं कुलभूषण यांच्यावर हेरगिरीचा आरोप करून फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यावर या हेगमधल्या न्यायालयानं या लष्करी न्यायालयाच्या निवाड्याचा पुन्हा आढावा घ्यावा, भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण यांची भेट घेण्यास परवानगी देण्यात यावी असा निकाल दिला. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. 'भाजपाची बी टीम या आरोपावर स्पष्टीकरण दिलं तरच चर्चा'

"वंचित बहुजन आघाडी हा भाजपचा ब संघ आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केला होता. त्याबाबत आज त्यांची काय भूमिका काय आहे, हे स्पष्ट केलं तरच आघाडीसाठी चर्चा करू" असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Image copyright FACEBOOK@OFFICIALPRAKASHAMBEDKAR
प्रतिमा मथळा प्रकाश आंबेडकर

'वंचित बहुजन आघाडीची 288 जागा लढवायची तयारी आहे. उमेदवारांची पहिली यादी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर होईल', असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसबरोबर बोलणी करण्यात काही अर्थ राहाणार नाही असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. हे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केलं आहे.

4. 'पक्षात घेण्यासाठी शिवसेनेने 25 फोन केले'

शिवसेनेने मला पक्षात घेण्यासाठी आतापर्यंत 25 फोन केल्याचा खळबळजनक दावा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट केला. एबीपी माझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright FACEBOOK/@VijayWadettiwarOfficial
प्रतिमा मथळा विजय वडेट्टीवार

"मला शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत. मला काही दिवसांपासून 'वर्षा'वरून आणि बांद्र्यावरून फोन येत आहेत. बांद्र्यावरून येणारे फोन जास्त आहेत. मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25 फोन आले आहेत आणि भेटायला बोलवत आहेत. एक विरोधी पक्षनेता भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे," असं विधान वडेट्टीवार यांनी केलं. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्षांतर केल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

5. 'तीन नेत्यांचा प्रवेश म्हणजे मेगाभरती नव्हे'

"तीन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे ती काही मेगाभरती होत नाही," अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर टीका केली. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले तरी साताऱ्याची जागा आम्हीच जिंकू असंही त्यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शरद पवार

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, चित्रा वाघ, सागर नाईक यांनी भाजपत प्रवेश केला.

त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपत मेगाभरती सुरू आहे, अशी टीका होऊ लागली होती. त्याला पवार यांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं.

"ही सर्व मंडळी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि भाजपच्या दबावाला बळी पडून त्या पक्षात गेली आहेत", असं मत त्यांनी व्यक्त केलं. सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमधल्या वादावर तोडगा काढावा लागणार असल्याचंही पवार म्हणाले. ही बातमी लोकसत्तानं प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)