आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार- देवेंद्र फडणवीस : #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस Image copyright Getty Images

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार - देवेंद्र फडणवीस

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही, आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील, तसेच त्यांना सरकारमध्ये पाहायलाही आवडेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

ही बातमी लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील.

प्रत्येकी 130 ते 140 जागांवर आम्ही लढणार असून उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

2. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून

'नव्या स्वराज्याचा नवा लढा' या टॅगलाईनसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर येथून यात्रेला सुरूवात होईल. शिवस्वराज्य यात्रेत 22 जिल्हे, 80 तालुके आणि 3 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.

Image copyright Hindustan Times/getty images

यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

3. ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण देणार: मुख्यमंत्री

'जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला पूर्णत: संरक्षण देण्यात येईल. अध्यादेश जारी केल्यानंतर जागा कमी होणार नाहीत तर, त्यात वाढच होऊ शकते. भाजपची सत्ता आहे तोपर्यंत ओबीसींच्या हिताचे पूर्णत: रक्षण करण्यात येईल', अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये दिली.

महाजनादेश यात्रा शनिवारी मौद्याकडे रवाना होण्यापूर्वी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'यासंदर्भात जारी केलेला अध्यादेश का काढला हे विरोधकांना कळले नाही. त्यातून उलटसुलट भाष्य करण्यात आले.

राज्यात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती व जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. काही जिल्ह्यांमध्ये जागा कमी होण्याची शक्यता होती.

Image copyright Hindustan Times/getty images

34 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण होत असल्याने 90-95 जागा कमी झाल्या असत्या. परंतु, 34 पैकी 14 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांहून कमी आरक्षण आहे. 20 जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्यावर जात होते.

सरकारने कायदा आणून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कायम राखण्याचे प्रयत्न केले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे.' याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

4. आरपीआयची विधानसभेसाठी 10 जागांची मागणी

विधानसभेसाठी भाजपला 22 जागांसाठी पत्र दिले आहे. त्यातील 10 जागा मिळाल्या पाहिजेत. पुण्यातून कँटोनमेंट आणि पिंपरी या दोन जागांची मागणी केली आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त ईसकाळने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

मोदींना मतदान मिळतंय म्हणून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे यांना दुसरा कोणताही उद्योग नाही. त्यामुळे ते ईव्हीएमबाबत बोलत आहेत. त्यांनी आता पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं आठवले म्हणाले.

5. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा राजकारण सोडण्याचा विचार

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी राजकारण सोडण्याची भाषा केली आहे.

"जर पक्षातील लोक माझ्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात ओढत असतील तर मला राजकारण सोडण्याबाबत विचार करावा लागेल", असे ते एएनआयशी बोलताना म्हणाले.

Image copyright Getty Images

याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाईम्स मराठीने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. कर्नाटकमधील राजकीय नाट्यानंतर 23 जुलैला विश्वास दर्शक ठरावातील पराभवानंतर काँग्रेस-जेडीएसचे आघाडीचे सरकार कोलमडले.

विधानसभेत विश्वासमत ठरावासाठी झालेल्या मतदानात पराभूत झाल्यानंतर कुमारस्वामींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जर कुटुंबीयांभोवतीचे राजकारण सुरुच राहिले तर राजकारण सोडण्याचा विचार करावा लागेल, असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)