EVM गेलं तर भाजपही जाणार - राज ठाकरे #5मोठ्याबातम्या

राज ठाकरे Image copyright SHARAD BADHE/BBC

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. EVM गेले तर भाजपही जाणार - राज ठाकरे

ईव्हीएम गेलं तर भाजपही जाईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमविरोधात राज्यासह देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकवटले आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल असंही ते म्हणाले.

अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी विकसित आहेत. ते अजूनही मतपत्रिकेचा वापर करतात. जर ईव्हीएम निर्दोष असतील तरी ते देश मतपत्रिकेचा वापर का करतात? असा सवाल राज यांनी केला.

याच मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. या मुद्यावर जनजागृतीसाठी राज्यभरात रॅली काढण्यात येणार आहे.

2. सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ - चंद्रकांत पाटील

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चंद्रकांतदादा पाटील

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचे स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ राज्यातील 92 टक्के कर्जदार शेतकऱ्यांना झाला. मात्र खावटी कर्ज घेणारे, संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणारे किंवा भूविकास बँकेकडून कर्ज घेणारे शेतकरी आणि सध्याच्या कर्जमाफी निकषात न बसणारे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा न झाल्याने त्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकीदार अशी नोंद होते.

यातून मार्ग काढण्यासाठीच संयुक्त पाणीपुरवठा योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांचे 600 ते 700 कोटींचे कर्ज लवकरच माफ करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

3. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आखडता हात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने औरंगाबाद शहरात होणारं स्मृतिवन स्मारक 10 कोटींमध्येच बांधावे असे आदेश राज्य शासनाकडूनच थडकले आहेत.

स्मारकाचं मूळ अंदाजपत्रक 64.40 कोटींचं आहे. आता महापालिका निधी कोठून उभारणार असा प्रश्न निर्माण होत आहे. असं या वृत्तात म्हटलंय.

Image copyright STRDEL
प्रतिमा मथळा बाळासाहेब ठाकरे

औरंगाबाद शहरातील सिडको भागात सात हेक्टरवर बाळसाहेब ठाकरे स्मृतिवन स्मारक उभारण्यात येणार आहे. बाळासाहेबांशी संबंधित वस्तू, भाषणांच्या ध्वनीमुद्रिका, छायाचित्रं या स्मृतिवनात असणार आहेत. त्यांचा पुतळाही या स्मारकात असेल.

"संबंधित अधिकाऱ्यांची काहीतरी गफलत झालेली असू शकते. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. मुख्यमंत्र्यांनाही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द दिलेला आहे," असं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं.

4. उन्नाव : पीडितेला दिल्लीत हलवलं

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उन्नाव प्रकरणातील पीडितेला दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री पीडितेला लखनऊहून दिल्लीला आणण्यात आलं. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी याकरता एअरपोर्ट ते एम्स ट्रॉमा सेंटर पर्यंत कॉरिडॉर तयार केला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उन्नाव प्रकरण

बलात्कार पीडितेच्या गाडीला झालेल्या अपघातात पीडितेच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. पीडित मुलगी आणि वकील गंभीर जखमी झाले होते.

उपचारादरम्यान पीडितला न्युमोनिया झाल्याचं तिच्या आईने सांगितलं होतं. त्यानंतर दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने पीडितेला दिल्लीला आणावं यासंदर्भात आदेश दिला.

5. पुण्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुट्टी जाहीर केली आहे. 'ईटीव्ही भारत'ने बातमी दिली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, मुळशी, वेल्हा, जुन्नर तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)