काँग्रेस अध्यक्षः नेहरू-गांधी कुटुंब पक्षासाठी ओझंही आणि संपत्तीही- दृष्टीकोन

राहुल गांधी आणि सोनिया गांधी Image copyright Getty Images

सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली. काल (10 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत चाललेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अखेर अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्याच नावावर एकमत झालं.

काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षांची निवड होत नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रपणदीप सुरजेवाला यांनी दिली.

याच बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामाही मंजूर करण्यात आला.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनुभवी आणि गांधी कुटुंबाबाहेरील नेत्याची निवड केली जाईल, असा अंदाज कार्यकारिणी समितीच्या बैठकीआधी वर्तवण्यात येत होता. मात्र, बैठक संपल्यानंतर कुठलंच नवीन नाव समोर आलं नाही.

नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेसला पर्यायच नाही?

काँग्रेसची सद्यस्थिती बिकट आहे. नेहरू-गांधी कुटुंब काँग्रेससाठी ओझंसुद्धा आहे आणि सगळ्यात मोठी संपत्तीसुद्धा आहे.

आजच्या घडीला काँग्रेसच्या बैठकीत गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कुणाचं नाव घेण्याची कुणाची हिंमत सुद्धा झाली नसेल. दुसऱ्या कुणा नेत्याच्या नावाची बैठकीत चर्चा तरी झाली का, याबाबतही कोणीही माहिती दिलेली नाही.

काँग्रेसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या नावाची पक्षाध्यक्षपदासाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावावर तरी बैठकीत चर्चा झाली नसेल?

Image copyright Getty Images

काँग्रेसच्या बैठकीत कुठल्याही समितीने वासनिक यांच्या नावाचा प्रस्तावच ठेवला नसेल किंवा प्रस्ताव आल्यानंतरही त्यांच्या नावाला समर्थन मिळालं नसेल.

मात्र प्रश्न असा आहे की, सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेस निवडणुका लढेल की नवा अध्यक्ष निवडला जाईल? किंवा सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष राहतील आणि त्यानंतर त्याच पूर्णवेळ अध्यक्ष होतील.

कार्यकारी अध्यक्ष निवडू न शकणारा पक्ष पूर्णवेळ अध्यक्ष निवडू शकेल का?

आजचं वास्तव असंय की, काँग्रेसची स्थिती बिकट आहे आणि पक्षात निराशादायक वातावरण आहे. आगामी दोन ते तीन विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची तयारी करायचीय. केवळ पक्षाअंतर्गत निवडणुकांमध्ये व्यग्र होऊन चालणार नाही.

Image copyright INC @TWITTER

सोनिया गांधींची अध्यक्षपदी निवड होणं, हा काही टाळ्या वाजवाव्यात असा निर्णय नाही. मात्र, वाद व्हावा असाही हा निर्णय नाही. पूर्णवेळ अध्यक्षाची निवड असती, तर त्यावर व्यापकच चर्चा होईल.

तसेही राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधीच सर्व निर्णय घेत होत्या.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षाचा कार्यकाळ जास्त लांबण्याऐवजी कमी असावा, एवढीच आशा आहे.

आगामी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आधीपर्यंतच काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष असायला हवा. त्यानंतर पक्षाने अंतर्गत बदल करायला हवेत आणि पक्षाअंतर्गत निवडणुका घ्यायला हव्यात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)