काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याचं समर्थन करणारा मोर्चा खरंच काढला गेला?- फॅक्ट चेक

काश्मीरमध्ये एका तासासाठी संचारबंदीत सूट देण्यात आली, तेव्हा काही जणांनी रस्त्यावर उतरून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, असा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
सुमारे एका मिनिटाच्या या व्हीडिओमध्ये पांढरे कपडे घातलेले काही लोक दिसतात. ते 'भारत माता की जय'च्या घोषणा देत आहेत. व्हीडिओत गर्दीच्या पुढे चालत असलेल्या दोन तरूणांनी हातात तिरंगा ध्वज घेतलेला आहे.
- भाजप नेत्यांनी पुलवामा हल्ल्याचा कट रचला होता? - फॅक्ट चेक
- हैदराबादच्या डी-मार्टमधून अतिरेक्याला अटक? सावधान, 'तो' व्हीडिओ खोटा – फॅक्ट चेक
आम्हाला आढळलं की हा व्हीडिओ मागच्या 24 तासांत काही फेसबुक ग्रुप आणि असंख्य ट्विटर खात्यांवरून पोस्ट करण्यात आला आहे. या सगळ्या पोस्टमध्ये हा व्हीडिओ काश्मीरचा असल्याचा दावा केला जात आहे.
(व्हॉट्सअपवरून हा व्हीडिओ अनेकांनी बीबीसीला पाठवला आणि याच्या सत्यतेबाबत विचारलं.)
रविवारी भारताच्या सरकारी न्यूज एजन्सीच्या माध्यमातून काही बातम्या आल्या होत्या. यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ईदच्या तयारीसाठी संचारबंदीत थोडी सूट दिल्याचा दावा केला जात आहे.
सोमवारी सकाळी गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये ईदचं नमाज पठण करणाऱ्या लोकांचे फोटो प्रकाशित केले आहेत.
पण आमच्या पडताळणीत आम्हाला हा व्हीडिओ काश्मीरचा नसल्याचं आढळलं. हा व्हीडिओ काश्मीरचा नसून कर्नाटकातल्या बंगळुरूमधला आहे. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा या व्हीडिओशी कोणताही संबंध नाही.
व्हीडिओचं सत्य
हा व्हायरल व्हीडिओ फेब्रुवारी 2019 चा आहे. तर व्हीडिओमध्ये दिसणारी लोक काश्मिरी नसून बोहरा मुस्लीम आहेत.
रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने आम्ही या व्हीडिओबाबतची सगळ्यात जुनी सोशल मीडिया पोस्ट शोधली. लिंडा न्योमाई नावाच्या एका ट्विटर वापरणाऱ्या व्यक्तीने हा व्हीडिओ पहिल्यांदा 19 फेब्रुवारी 2019 रोजी ट्विट केल्याचं आमच्या निदर्शनास आलं.
लिंडाच्या ट्विटर प्रोफाईलनुसार, ती भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे. भाजपच्या एसटी मोर्चाची ती सदस्यसुद्धा आहे.
त्यांनी #indianarmyourpride #standwithforces या हॅशटॅगसोबत हा व्हीडिओ ट्विट केला होता. त्यांनी लिहिलं, सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या आठवणीत बोहरा मुस्लिमांनी बंगळुरूच्या बनेरगट्टा रोड परिसरात एक शोभायात्रा काढली.
14 फेब्रुवारी 2019 ला भारत प्रशासित काश्मीरच्या पुलवामामध्ये कट्टरतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर आत्मघाती हल्ला केला होता. यात 40 पेक्षा जास्त भारतीय जवान मारले गेले होते.
काही माध्यमांवरील बातम्यांनुसार पुलवामा हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईतही पदयात्रा काढण्यात आली होती.
पदयात्रेत सहभागी मुस्लीम कोण?
भारताच्या पश्चिम भागात विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या दाऊदी बोहरा मुस्लिमांना एक यशस्वी व्यापारी समाज मानलं जातं. दाऊदी बोहरा समाजाचा वारसा फातिमी इमामांशी जोडलेला आहे. त्यांना पैगंबर हजरत मोहम्मद (570-632) यांचा वंशज मानलं जातं.
दाऊदी बोहरांचे 21 वे आणि अंतिम इमाम तैय्यब अबुल कासिम होते.
त्यांच्यानंतर 1132 पासून अध्यात्मिक गुरुंची परंपरा सुरू झाली. त्यांना दाई-अल-मुतलक सैय्यदना संबोधलं जातं.
मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी या समाजाचे विद्यमान सर्वोच्च धर्मगुरू सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना भेटण्यासाठी इंदूरला गेले होते.
मुंबईस्थित दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यालयातील एका वरिष्ठ सदस्याने बीबीसीशी बोलताना बंगळुरूतल्या या पदयात्रेबाबत दुजोरा दिला होता.
हेही वाचलंत का?
- काश्मीर कलम 370 : 'आम्हाला भारतासोबतच राहायचं आहे'
- 'कलम 370 हटवून भाजपने योग्य वेळी जनभावना साधली'
- कलम 370 : सरकारच्या निर्णयाबद्दल काय आहेत काश्मिरी पंडितांच्या भावना?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)