‘तू पाप केलंस, तुला भावाशी लग्न करावं लागेल, हे लग्नच तुझी अब्रू वाचवेल’

नायला, स्कॉटलंड
प्रतिमा मथळा नायला

लहान वयात म्हणजे 17व्या वर्षी त्यांना सक्तीने स्कॉटलंडहून पाकिस्तानला नेण्यात आलं. तिथे नेऊन त्यांचं चुलत भावाशी लग्न लावण्यात आलं. काय झालं नक्की?

अगदी लहान वयातच माझं लग्न चुलत भावाशी ठरवण्यात आलं होतं. या निर्णयाबाबत मी नेहमी अस्वस्थ असे.

स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या 30वर्षीय नायला यांनी बीबीसी स्कॉटलंडशी 'द नाइन' कार्यक्रमात बोलताना याबद्दल सांगितलं.

नायला सांगतात, "भावाशी लग्न होणार आहे हे मला लहानपणापासूनच माहिती होतं. याची आठवण येताच मला कसंतरी होत असे. पाश्चिमात्य संस्कृती अंगवळणी पडून मी त्यासारखं वागेन अशी भीती माझ्या आईवडिलांना वाटत असे. पाश्चिमात्य संस्कृतीपासून मला दूर राखण्याचं काम आपण करत आहोत असं त्यांना वाटे."

मीरपूर मुस्लीम कुटुंबात नायला यांचं बालपण व्यतीत झालं. घरचं वातावरण कर्मठ होतं. मी स्वत:चे विचार मुक्तपणे मांडू इच्छित होते. एक वेगळ्याच प्रकारचं आयुष्य मला जगायचं होतं.

जेव्हा पाकिस्तानला जावं लागलं

17व्या वर्षी पाकिस्तानला जावं लागल्याची आठवण नायला आजही विसरलेल्या नाहीत.

त्याबद्दल त्या विस्ताराने सांगतात, "तू पाप केलं आहेस असं म्हणतच त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुला आता भावाशीच लग्न करावं लागेल. तू कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहेस. हे लग्न करून तुझी अब्रू वाचवू शकतेस"

प्रतिमा मथळा नायला

सुरुवातीला हे करायला नायला यांनी नकार दिला. मात्र घरच्यांनी सातत्याने दबाव आणला. या दडपणाला शरण जात नायला यांनी घरच्यांचं ऐकलं.

"घरचे शांत व्हावेत असं मला वाटत होतं. त्यांना हवं तसं वागल्यावर माझी ससेहोलपट झाली. मेंदू आणि मन सुन्न होत असे. मला असहाय्य वाटत असे," असं नायला सांगतात.

घर सोडलं

पाकिस्तानमध्ये पाच आठवडे राहिल्यानंतर नायला एकट्याच स्कॉटलंडला परतल्या. त्यांचे पती काही दिवसांनंतर येणार होते.

मात्र काही महिन्यात नायला आपलं घर सोडून मैत्रिणीच्या घरी राहायला गेल्या.

प्रतिमा मथळा नायला

त्यांनी सांगितलं, "मी सामान घेतलं आणि पळ काढला. एक वर्षापेक्षा जास्त काळ घरापासून दूर होते. घरचे, नातेवाईक आणि समाजातल्या लोकांनी प्रचंड टीका केली."

मी रस्त्यानं जातांना माझ्यावर विचित्र टिकाटिपण्णी व्हायला लागली.

नातेवाईकांना आणि भावाबहिणीला भेटता येणार नाही, असं नायला यांना सांगण्यात आलं.

अशी अवस्था झालेली की सगळं जग तुमच्यावर रुष्ट झालं आहे, असं नायला सांगतात.

स्वतंत्र मुस्लीम महिला

एका वर्षानंतर त्या घरी (माहेरी) परतल्या. त्यावेळी त्या मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडल्या होत्या.

पण आश्चर्यकारकरित्या त्यांच्या घरच्यांनी त्यांना आपलसं केलं. परंतु समाजाने त्यांना नाकारलं.

हे अवघड होतं परंतु आम्ही ते साध्य केलं. धर्मापेक्षा आम्ही प्रेमाला प्राधान्य दिलं.

त्यानंतर नायला यांचा घटस्फोट झाला. पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अबरदीन विद्यापीठात प्रवेश घेतला.

तेव्हापासून मी एक स्वतंत्र मुस्लीम महिला आहे, असं नायला सांगतात.

कोणत्याही माणसाचं जबरदस्तीने लग्न लावणं कायदेशीर गुन्हा आहे. शारीरिक स्वरुपाचं असो की मानसिक तसंच आर्थिक दडपण आणून लग्न करायला भाग पाडणं कायदेशीरदृष्ट्या गुन्हाच आहे.

ब्रिटन सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी सक्तीने लग्न लावून देणारी 1,764 प्रकरणं समोर आली आहेत.

स्कॉटलंडमध्ये 2017 मध्ये जबरदस्तीने लग्न लावून देण्याच्या 18 घटना समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी हे प्रमाण वाढून 30वर गेलं होतं.

एखाद्या व्यक्तीचं सक्तीने लग्न लावून देणं हा कायद्याने गुन्हा आहे याची नागरिकांना जाणीव नसल्याचं ब्रिटन सरकारच्या या गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या विभागाने सांगितलं.

जबरदस्तीने लग्न लावण्याच्या प्रश्नावर कोणताही ठोस उपाय आपण काढू शकलेलो नाही. शिक्षण आणि जागरुकता या दोन गोष्टींची यात निर्णायक भूमिका आहे. मुलीचं जबरदस्तीने कोणाशी तरी लग्न लावून आपण तिला किती दु:ख देत आहोत याची घरच्यांना जाणीव व्हायला हवी.

मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती कमकुवत करत आहोत याची त्यांना कल्पनाच नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)