महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभाग #5मोठ्याबातम्या

पाऊस Image copyright Getty Images

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच, राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. ईटीव्ही भारतने ही बातमी दिलीय.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येत्या 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

अपेक्षित पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठवाड्यात पावसाची हजेरी लागू शकते. हिंगोली आणि नांदेडमध्ये आज (13 ऑगस्ट) पाऊस पडेल, असंही वेधशाळेनं म्हटलंय.

कोकणात आधीपासूनच सुरू असलेल्या पावसाला आणखी जोर येईल. कोकण आणि गोवा भागात पुढल्या पाच दिवसात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर पालघर, ठाणे आणि मुंबई या भागातीला काही ठिकाणी उद्या (14 ऑगस्ट) पाऊस दमदार हजेरी लावेल, असा अंदाज आहे.

2) कोल्हापुराती बंदीचे आदेश मागे

कोल्हापुरात गेल्या 10 ते 15 दिवसात महापुरामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालं. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त आणि नागरिकांकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्यात बंदीचे आदेश देण्यात आले होते. पण आता ते मागे घेण्यात आले आहेत. पुढारी वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून कलम 37(1)-अ ते फ आणि कलम 37(3) अन्वये बंदीचे आदेश जारी करण्यात आले होते.

12 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2019 या कालावधीत कोल्हापुरात हे बंदीचे आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी ही माहिती दिली.

3) रेल्वेसेवा पूर्वपदावर येईपर्यंत 'शिवनेरी'च्या जादा फेऱ्या

मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरळीत होईपर्यंत शिवनेरी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त शिवनेरीच्या 32 जादा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी यासंदर्भात माहिती दिली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत ते लोणावळा दरम्यान रुळावर दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या पुढील काही दिवसांसाठी रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत.

Image copyright Getty Images

शिवनेरीसह एसटी महामंडळाच्या साध्या बसही या मार्गावर धावतील. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी काही दिवसांसाठी बसचा मार्ग अवलंबावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास प्रवाशांना 15 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.

4) दिल्ली विमानतळावर बॉम्बची अफवा

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा अज्ञाताचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांनी वेगवान तपास करत, फोन करणाऱ्याला पकडलं.

मात्र, आपण फोन केला नसल्याचा दावा त्याने केला. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीय. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिलीय.

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-2 वर रात्री 8.50 वाजता अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि विमानतळावर बॉम्ब ठेवला असून, वाचवू शकलात तर वाचवा, अशी धमकी दिली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

सीआयएसएफ, बीटीसी, दिल्ली पोलीस, विमानतळ प्राधिकरण, अग्निशमन दल इत्यादी यंत्रणांनी तपास वेगवान केला. संशयित वस्तूंच्या तापसणीसह विमानतळही रिकामा करण्यात आला होता.

ज्या क्रमांकावरून फोन आला, त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. मात्र, आपण फोन केला नसल्याचा संशयित व्यक्तीने दावा केला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी अधिक तपास सुरू केला आहे.

5) जम्मू-काश्मीरमध्ये रिलायन्स गुंतवणूक करणार

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं 370 कलम रद्द केल्यानंतर उद्योग क्षेत्राने गुंतवणुकीसाठी पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये रिलायन्स मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करेल, असं उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीसाठी रिलायन्स ग्रुप 'स्पेशल टास्क फोर्स'ही स्थापन करणार आहे.

Image copyright ANi

मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 42 वी सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी आगामी गुंतवणुकीसंदर्भात माहिती दिली. इंडिया टुडेने ही बातमी दिलीय.

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही रिलायन्स ग्रुपकडून उचलण्यात येईल, अशी माहिती मुकेश अंबानींनी यावेळी दिली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान मृत्यूमुखी पडले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)