कलम 370 च्या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांना अटक झाली होती? - फॅक्ट चेक

अखिलेश यादव Image copyright NurPhoto/getty images

सोशल मीडियावर अखिलेश यादव यांचा एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. कलम 370 हटवण्याचा विरोध केल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, असा दावा केला जात आहे.

सुमारे दीड मिनिटांच्या या व्हीडिओमध्ये अखिलेश यादव यांना घेरलेले काही पोलीस कर्मचारी दिसतात. व्हीडिओत अखिलेश यादव यांची पोलिसांशी धक्काबुक्की होताना दिसत आहे.

यादरम्यान अखिलेश यादव बोलतात, "तुम्ही बघा, आता हे लोक कशा पद्धतीने मला अटक करतायत, अटक करायची ही कोणती पद्धत आहे. तुम्ही मला माध्यमांसोबत का बोलू देत नाहीत? यानंतर ते माध्यमांना बोलतात, पहिल्या दिवशीपासून समाजवादी पक्ष सांगत आलाय. आजसुद्धा सांगतो, जोर जबरदस्ती आणि जुलूम करून हे अन्याय थांबवू शकत नाहीत. पक्षाचं आंदोलन चालू राहील."

यानंतर व्हीडिओत पुढे एक पोलीस अधिकारी अखिलेश यांना कारमध्ये बसवून निघून जाताना दिसतात.

या व्हीडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 2 लाखाहून जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. हजारो वेळा हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हीडिओची लिंक

ट्विटर आणि व्हॉट्सअपवरसुद्धा वरच्याच कॅप्शनसह व्हीडिओ शेअर केला जात आहे.

बीबीसीने केलेल्या पडताळणीतहा व्हीडिओ जुना असल्याचं आढळलं. जम्मू आणि काश्मीरमधून नुकत्याच हटवलेल्या कलम 370 शी याचा काहीच संबंध नाही.

व्हीडिओचं सत्य

रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हीडिओमागचं सत्य आम्हाला कळलं. हा व्हीडिओ मार्च 2011 मधला उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊच्या विमानतळाच्या बाहेर झालेल्या घटनेचा आहे.

आम्हाला काही माध्यमांच्या बातम्याही सापडल्या.

उत्तर प्रदेशात त्यावेळी मायावती यांचं सरकार होतं. अखिलेश यादव त्यावेळी समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष होते. तत्कालीन राज्य सरकारविरोधात अखिलेश यादव यांनी सुमारे तीन दिवस आंदोलन करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं.

अखिलेश यादव 9 मार्च 2011 ला आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून लखनऊला पोहोचले तेव्हा विमानतळाबाहेरच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

प्रशासनाच्या मते, निषेध आंदोलनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली.

अखिलेश यादव यांच्या अटकेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन केलं होतं, अशा बातम्या माध्यमांवर उपलब्ध आहेत.

समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये त्यावेळी प्रचंड धक्काबुक्की झाली. यादरम्यान हजारोंच्या संख्येने लोकांना अटक करण्यात आलं. मारहाणीत अनेक कार्यकर्ते जखमीही झाले होते.

समाजवादी पक्षाची कलम 370 वर काय भूमिका?

जम्मू आणि काश्मीरमधल्या कलम 370 मध्ये बदल करण्याबाबतच्या विधेयकावर संसदेत मतदान होत असताना झालेल्या चर्चेत समाजवादी पक्षाने त्याचा विरोध केला होता.

राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी विधेयकाचा विरोध केला होता. तर पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी संसदेतील चर्चेत काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या पद्धतीबाबत विधेयकाच्या विरोधात मत नोंदवलं.

लोकसभेत कलम 370 बाबतच्या विधेयकावर मतदान होत असताना समाजवादी पक्षाने त्याचा विरोध करत सभागृहाचा त्याग केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)