मुंबई-पुणे रेल्वे लाईन कधी सुरू होणार?

मुंबई, पुणे, रेल्वे
प्रतिमा मथळा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

मुंबई आणि पुणे म्हणजे राज्याचे दोन मानबिंदू. या दोन शहरांना जोडणारा रेल्वेमार्ग पावसामुळे विस्कळीत झाला आहे. या मार्गावरील वाहतूक स्थगित होऊन बारा दिवस उलटले. तो कधी सुरू होणार? हा प्रश्न अजूनही आहे.

कधी न थांबणारी आणि नेहमी वेळेवर धावणारी डेक्कन क्वीन, गेला आठवडाभर मात्र ती थांबूनच आहे.

खंडाळा घाटात आधी पाऊस आणि मग दरड कोसळल्यामुळं 3 ऑगस्टला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, ती अजून रूळावर आलेली नाही.

त्यामुळं मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या सर्वच गाड्या बंद आहेत.

16 ऑगस्टपर्यंत डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस धावणार नसल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. त्यामुळं मुंबई-पुणे शहरांदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

प्रतिमा मथळा पाण्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील बोगद्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.

तसंच खंडाळा घाटातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्या दुसऱ्या मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.

घाटातला रेल्वेमार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वेचे अडीचशेहून अधिक कर्मचारी चोवीस तास युद्धपातळीवर काम करत असल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ संपर्क अधिकारी अनिल कुमार जैन यांनी म्हटलं आहे.

का बंद आहे खंडाळा घाट?

खंडाळा घाटातून जाणारा रेल्वेचा मार्ग हा तिहेरी लोहमार्ग आहे. मुंबईला पुण्याशी तसंच दक्षिण भारताशी जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे.

इथे कर्जतहून लोणावळ्याकडे जाणारा डाऊन मार्ग, लोणावळ्याकडून कर्जतकडे येणारा अप मार्ग आणि या दोन्हींच्या मधून जाणारा आणखी एक तिसरा मार्ग असे पर्यायी मार्ग आहेत. पण यंदा पावसाळ्यात या तिन्ही ट्रॅक्सवर वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रतिमा मथळा रेल्वे मार्गावर दरड कोसळली ती जागा

जुलै महिन्याच्या मध्यापासून या भागाला मुसळधार पावसानं वारंवार झोडपून काढलं होतं. ऑगस्टच्या सुरुवातीला, इथं दहा दिवसांच्या कालावधीतच 1800 मिलीटमीटर पावसाची नोंद झाली होती.

3ऑगस्टला खंडाळा घाटातल्या 'मंकी हिल' स्टेशनजवळ दरड कोसळली होती आणि हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवाशांचे हाल झाले. मग सोमवारी म्हणजे 5ऑगस्टला झालेल्या पावसात या मार्गाचं आणखी नुकसान झालं. मध्य रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये या मार्गावर किती नुकसान झालं आहे, ते दिसून येतं.

पावसामुळं ट्रॅकखालची खडी वाहून गेली. ट्रॅकवर पाणी आणि चिखल साचला. काही ठिकाणी दरड कोसळल्यानं ट्रॅकचं मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी ओव्हरहेड वायर्स, सिग्नल यंत्रणेवरही परिणाम झाला. मोठा दगड कोसळल्यानं घाटातल्या एका बोगद्याला भगदाडच पडलं.

पुन्हा कधी धावणार डेक्कन क्वीन?

एकाच वेळी हे सगळं दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. हा सगळा दुर्गम भाग असून, सततच्या पावसामुळं रेल्वे कर्मचाऱ्यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण केवळ मार्गावरचे अडथळे दूर करून चालणार नाही, तर पुन्हा दरड ट्रॅकवर येऊ नये यासाठीही रेल्वेला उपाययोजना करावी लागणार आहे.

त्यामुळं पुढचे तीन-चार दिवस मुंबई-पुणे वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हं नाहीत. याआधी 2005 साली 26 जुलैच्या पुरानंतर या मार्गावरची वाहतूक बरेच दिवस बंद पडली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)