भारताच्या ऑटो इंडस्ट्रीला का लागली घसरगुंडी?

भारतीय कार बाज़ार Image copyright PTI

सलग 9 व्या महिन्यामध्ये भारतातल्या वाहन उद्योगाने घसरण नोंदवली आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यामधली विक्रीची आकडेवारी ही गेल्या 18 वर्षांतली सर्वात खराब कामगिरी आहे. या कालावधीत विक्रीमध्ये 31% घसरण नोंदवण्यात आली.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)नुसार जुलैमध्ये 2,00,790 वाहनांची विक्री झाली. हा गेल्या 9 महिन्यांतला नीचांक आहे. यानुसार स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही)मध्ये 15% तर प्रवासी वाहनांच्या विक्रीत 36% घट नोंदवण्यात आली आहे.

या इंडस्ट्रीला ताबडतोब एक मदत पॅकेज मिळणं गरजेचं असल्याचं सियामचे महासंचालक विष्णु माथूर म्हणतात. जीएसटीचे दर तात्पुरते कमी केल्यासही इंडस्ट्रीला थोडा दिलासा मिळेल असं ते म्हणतात.

माथुर म्हणतात, "ऑटो इंडस्ट्रीची परिस्थिती जास्त खराब होऊ नये म्हणून या क्षेत्राच्या प्रतिनिधींनी नुकतीच सरकारसोबत चर्चा केली. आम्ही मदत पॅकेज देण्याची मागणी केली. गाड्यांवरचे जीएसटीचे दर कमी करण्यात यावेत, स्क्रॅपेज पॉलिसी आणण्यात यावी आणि वित्तीय क्षेत्र - विशेषतः गैरबँकिंग वित्तीय कंपन्या मजबूत करण्याची मागणी करण्यात आली आहे."

Image copyright PTI

तर दुसरीकडे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा)नुसार या मंदीमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये दोन लाख लोकांनी रोजगार गमावला आहे.

आशिया खंडातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये वाहन खरेदीमध्ये मोठी घट झाली आहे. गैर-बँकिंग वित्तीय संस्थांनी कमी कर्ज दिल्याचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय.

याच कारणामुळे देशातल्या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्या - मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सनी आपल्या उत्पादनात कपात केलीय. परिणाम हजारो नोकऱ्या कमी झाल्या. या सगळ्यामुळे वाहन उद्योगामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

भारतीय बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीचा हिस्सा 51% आहे. या कंपनीने जानेवारीमध्ये 1.42 लाख गाड्यांची विक्री केली. पण गेल्या सहा महिन्यांमध्ये 31 %ची घट झालेली आहे आणि जुलैमध्ये फक्त 98,210 गाड्यांची विक्री झाली.

Image copyright PTI

देशांतर्गत बाजारपेठेतली दुसरी मोठी वाहन उत्पादक कंपनी असणाऱ्या ह्युंडाईच्या विक्रीमध्येही मोठी घट झाली आहे. जानेवारीमध्ये ह्युंडाईच्या सुमारे 45,000 वाहनांची विक्री झाली होती. पण यामध्ये 15% घट होत जुलैमध्ये फक्त 39,000 वाहनांची विक्री झाली.

शेअर बाजारातही या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत मारुतीच्या शेअर्सच्या किंमतीत 22% घसरण झाली आहे तर याच कालावधीत टाटा मोटर्सचे शेअर्स 29%नी घसरले आहेत.

या तुलनेत मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेंसेक्समध्ये या कालावधीत 2.4% वाढ झाली.

मंदीमुळे अनेक डीलरशिप्स बंद झाल्या आहेत. म्हणूनच या उद्योगासाठीच्या जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्यासाठीची मागणी जोर धरत आहे.

उदयोग क्षेत्राने मागणी केली आहे की सरकारने ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जीएसटीचे दर 28%वरून कमी करून 18% करावेत.

Image copyright @MSArenaOfficial

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीपासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये सलग चार वेळा कपात केली आहे. पण इंडस्ट्रीमधल्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की बाजारातील पैशाची कमी भरून काढण्यासाठी अजून उपाययोजना करण्याची गरज आहे.

उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटून त्यांना सद्यपरिस्थितीची कल्पना दिली.

ऑटो इंडस्ट्रीमधील मंदी दूर करण्यासाठी सरकार सध्या चर्चा करत असलं तरी आतापर्यंत याविषयीची कोणतीही उपाययोजना घोषित करण्यात आलेली नाही.

सियामचे महासंचालक विष्णु माथूर म्हणतात की या महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होत असूनही फारशी सूट मिळत नाहीये.

माथुर म्हणतात, "एप्रिलापासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षामध्ये सियामने प्रवासी वाहनांच्या वार्षिक विक्रीमध्ये 3 ते 5%ची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण आता असलेली मंदी पाहता हे अंदाज बदलावे लागू शकतात."

Image copyright @MSArenaOfficial

जुलै महिन्यामध्ये मारुतीच्या वाहन विक्रीमध्ये 34% घट झाली आहे. गेल्या सात वर्षांच्या कालावधीमध्ये एका महिन्यात नोंदवण्यात आलेली ही सर्वात मोठी घट आहे. गेल्या वर्षी या कार उत्पादक कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये फक्त 4.7% वाढ झाली होती.

रॉयटर्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कंपनीने आपल्या हंगामी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करायला सुरुवात केली असून जूनच्या अखेरीपासून हंगामी कर्मचाऱ्यांची संख्या ६% कमी झाली आहे.

सोबतच मारुतीने आपल्या उत्पादनातही कपात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये 10%पेक्षा जास्त उत्पादन कपात करण्यात आली होती.

प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीमध्ये 34% घट नोंदवलेल्या टाटा मोटर्सने गेल्या आठवड्यात म्हटलं होतं की बाजारातल्या सध्याच्या कठीण परिस्थितीमुळे महाराष्ट्रामधली काही युनिट्स बंद करण्यात आले आहेत.

Image copyright @tatamotors

तर या तिमाहीमध्ये 14 दिवसांची उत्पादन कपात करणार असल्याचं जुलै महिन्यामध्ये १५% घट नोंदवणारी प्रतिस्पर्धी कंपनी महिंद्र आणि महिंद्रने म्हटलंय.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)च्या ताज्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीमध्ये घट झाली आहे.

26% घट होत या कालावधीमध्ये फक्त 56,866 ट्रक्स आणि बसेसची विक्री झाली. तर दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये 17% घट झाली. याकाळात सुमारे 15 लाख दुचाकींची विक्री झाली.

Image copyright Getty Images

या मंदीचा परिणाम गाड्यांसाठीचे सुटे भाग बनवणाऱ्या सहयोगी कंपन्यांवरही झाला आहे. टाटा मोटर्स आणि अशोक लेलँडसाठी सस्पेन्शन (शॉकर्स) बनवणारी कंपनी जमना ऑटो इंडस्ट्रीने म्हटलं आहे की मागणी नसल्याने ऑगस्टमध्ये ते त्यांची सर्व 9 युनिट्स बंद करण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये बजेटद्वारे ऑटो पार्ट्सवरची ड्युटी वाढवण्यात आली आणि पेट्रोल-डिझेलवर अधिक कर लावण्यात आल्याने या इंडस्ट्रीला दुहेरी फटका बसला.

सियामचे महासंचालक विष्णु माथूर यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितलं की या इंडस्ट्रीमुळे 3.7 कोटीपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो. आणि जर मंदी संपुष्टात आली नाही तर अनेकांच्या नोकऱ्या जातील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)