पहलू खान झुंडबळी प्रकरणात सर्व गोरक्षकांची निर्दोष सुटका

पहलू खान, गोरक्षक Image copyright Video grab
प्रतिमा मथळा पहलू खान

पहलू खान झुंडबळीप्रकरणी राजस्थान न्यायालयाने सर्व कथित गोरक्षकांची निर्दोष सुटका केली.

आरोपी विपिन यादव, रवींद्र कुमार, कालूराम, दयानंद, योगेश कुमार आणि भीम राठी यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली.

हरियाणा नूह इथे राहणाऱ्या पहलू खान यांची 2017 मध्ये राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात झुंडीने त्यांचा बळी घेतला. या घटनेनंतर दोन दिवसांनी 3 एप्रिल 2017 रोजी 55 वर्षीय पहलू खान यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

पहलू खान गाईंना घेऊन जयपूरहून आपल्या गावी जात असताना हा प्रकार घडला होता.

कथित गोरक्षकांनी हा हल्ला केल्याचा आरोप होता. पहलू खान यांच्याबरोबरीने त्यांचा मुलगा आणि अन्य काही लोक जखमी झाले.

प्रकरण काय?

झुंडीने केलेल्या मारहाणीमुळे पहलू खान यांचा जीव गेला. पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा पहलू खान

याबरोबरच पोलिसांनी पहलू खान यांच्या गाडीतील अजमत आणि रफीक यांच्याविरुद्ध गोतस्करीचा गुन्हा नोंदवला.

अजमत आणि रफीक यांच्याव्यतिरिक्त ड्रायव्हर अर्जुन यादव आणि त्यांचे वडील जगदीश यांनाही गोतस्करीप्रकरणी आरोपी बनवलं.

गाईंची वाहतूक करणाऱ्या गाडीचे अर्जुन चालक होते तर जगदीश त्या गाडीचे मालक.

गाईची खरेदी करून नेआण करण्यासाठीची कागदपत्रं पहलू खान यांच्याकडे मिळाली नाहीत. म्हणून हे प्रकरण गो तस्करीशी निगडीत आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.

याप्रकरणातील प्रमुख आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळाले नसल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना क्लिन चीट दिली. पहलू खान यांच्याबरोबर जाणाऱ्या लोकांना गोतस्करी प्रकरणात अडकवण्यात आलं असा पहलू खान यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)