सांगली: 'एका महापुराने कवी केलं तर दुसऱ्या महापुराने कविताच हिरावून घेतल्या'

सांगली, कोल्हापूर, पूर
प्रतिमा मथळा रमझान मुल्ला

सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यात अनेक गावं पाण्याखाली गेली होती. नागठाणे गावात देखील 20 फुटांवर पुराचं पाणी होतं. अनेकांची घरं वाहून गेली तर अनेकांची मोडकी घरं उरली. सांगली जिल्ह्यातील कवी रमझान मुल्ला यांच्या कुटुंबाला पुराचा फटका बसला आहे.

त्यांनी लिहिलेल्या अनेक कवितांना जलसमाधी मिळाली.

चाळीसारखी छोटीशी बैठी घरं. शाळेतल्या मुलांनी प्रार्थनेसाठी रांग लावायला सुरुवात केल्यानंतर होते तशा गर्दीची. दोन अडीच फूट ओटा, घरात शिरताच उजव्या हाताला छोटसं बाथरूम त्याला लागून पुराने भिजलेल्या स्वयंपाक घराची तीन फूट जागा. पुढे छोट्याशा खोल्या. कुठेही खिडकी नव्हती. पुराच्या पाण्याने सगळं घर ओलं होतं, कौलं देखील अनेक ठिकाणी फुटली होती. घर लाल मातीचं त्याला सिमेंटचा गिलावा दिलेला. पुरात भिजल्यामुळे कवितांच्या वह्यांचा लगदा झाला होता. जागा मिळेल त्या ठिकाणी या वह्या पडल्या होत्या.

रमझान मुल्ला बघत होते. कवितेवरून हात फिरवत होते. "पूर इतक्या गतीने घरापर्यंत आला की वेळच मिळाला नाही. 2005 एवढा पूर नाही येणार या अंदाजाने सर्व गावकरी गावातच होते. ओसरीपर्यंत पाणी आलं तेव्हा कवितांच्या वह्या कशाबशा पोत्यात भरल्या होत्या आणि घराच्या माळ्यावर टाकल्या होत्या पण पाणी तिथपर्यंत गेलं आणि याचा चिखल झालाय," रमझान मुल्ला गलबलून बोलत होते. पुराने कवितांचे शब्द वाहून गेले होते अस्पष्ट निळसर रंग उरला होता."

प्रतिमा मथळा रमझान मुल्ला यांच्या घराची स्थिती

"कसातरी उभा राहत होतो. गावात पाणी योजनेवर काम करतो महिन्याला सहा हजार मिळतात. आई मजुरीला जाते द्राक्षांच्या मळ्यात, त्यावर घर चालत. वडिलांना चार वर्षांपासून किडनी निकामी झाल्याने आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करावं लागत. महिन्याला औषधांचा सगळा खर्च 4 हजारांपर्यंत, कशी तरी गुजराण सुरू आहे.

कवितेवर कवितांच्या कार्यक्रमांवर पण अनेक कविता वाहून गेल्यात या पुरात. रमझान मुल्ला यांची आवडती पुस्तकं, कवितांच्या वह्या, सन्मानचिन्ह, पुरस्कार सारं काही पुरात गेलं. जे राहील त्याचा चिखल झाला होता.

रमझान मुल्ला यांच्या कविता यंदा मुंबई विद्यापीठाच्या कलाशाखेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 'मोक्ष', 'मनावर दगड ठेवून', 'पाणी' या त्यांच्या तीन कविता 2019 पासून अभ्यासक्रमात घेण्यात आल्या आहेत.

शेकडो कविता लिहिल्या त्यातल्या निवडक कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी काही कविता पेन ड्राईव्ह मध्ये घेतल्या होत्या. तेवढ्या उरल्या पण अनेक विषय, अनेक अर्धवट कविता ज्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर पूर्ण होतील अशा कविता देखील होत्या असं ते सांगतात.

प्रतिमा मथळा पुरामुळे रमझान यांच्या घराची अशी स्थिती झाली आहे.

"पूर ओसरला तसा गावात आलो, घराचा दरवाजा उघडला तसे अनेक बेडूक, कीटक, कृमी आणि चिखल घरात होते. सारा संसार चिखलात होता. घरातल्या धान्याला कोंब फुटले होते, कपडे चिखलात होते, सार काही अस्ताव्यस्त होतं. एक एक करून काही राहिलं का ते बघून निवडत होतो, एखाद्या राख झालेल्या मृताची राख, हाड सावडावी तसा संसार सावडत होतो आम्ही." पुराच्या पाण्याने केलेली भीषण अवस्था मुल्ला डोळ्यांसमोर मांडत होते.

"जगलो कसेतरी, सहा दिवस जागून काढले, कुठलीही व्यवस्था नाही आंघोळ नाही, घरातून बाहेर पडताना माझ्या बायकोने माझा एक ड्रेस बरोबर घेतला होता. एखादा कार्यक्रम मिळाला तर तेवढीच आमदनी होईल असं तिला वाटलं. तोच ड्रेस मी सध्या घातलाय," मुल्ला सांगत होते.

2005 च्या पुराने रमझान मुल्ला यांच्या घराला जबरदस्त तडाखा बसला होता. सर्व वाहून गेलं होतं. कसातरी उभा केलेला संसार उघड्यावर आला होता. त्यातून सावरत असताना हृदयातली वेदना ते पानावर शब्दातून उतरवू लागले. या लिहिलेल्या कविता सादर करू लागले. कवितांना दाद मिळू लागली. महापुराच्या आठवणींनी आत सलायचं तेच पहाटे लिहायचो. या कवितांमुळे कवी म्हणून ओळख दिली असं ते सांगतात. "एका महापुराने कवी केलं तर दुसऱ्या महापुराने कविताच हिरावून घेतल्या."

पुराचा तडाखा तीन वेळा अनुभवलेल्या रमझान मुल्ला मात्र जमिनीत पाय घट्ट रोवून पुन्हा उभारी घेण्याचा निश्चय बोलून दाखवतात. "कवींच्या घरात काही नसतं, कवी समाजातील दु:ख पचवून उभा राहत असतो, मी तसाच उभा राहणार."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)