नरेंद्र मोदी: कलम 370 रद्द केल्यानंतर ओरडणारे दहशतवादाचे समर्थक #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. नरेंद्र मोदी - कलम 370ची ओरड माओवादाच्या ममत्वातून

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जे ओरड करत आहेत, ते माओवादी आणि दहशतवादी यांचेच समर्थक आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, ''दहशतवादाने कित्येक दशके भरडल्या गेलेल्या काश्मीरमधील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे. हितसंबंधांत बाधा आलेले गट, सत्ता ही आपल्याच घराण्याची मक्तेदारी आहे असं मानणारी कुटुंबे आणि दहशतवाद्यांबाबत पुळका असलेले लोक यांचा या निर्णयाला विरोध अपेक्षितच होता.''

''ते हेच लोक आहेत जे सर्वसामान्य माणसाचं ज्यातून भलं होईल, अशा प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. लोकांची तहान भागवण्यासाठी एखादा प्रकल्प उभा राहत असेल, त्याला ते विरोध करतात. रेल्वे मार्ग बांधायचा असेल, तर ते विरोधात उभे ठाकतात. सर्वसामान्य माणसाची ससेहोलपट करणाऱ्या माओवादी आणि दहशतवादी यांच्यासाठीच त्यांच्या हृदयाचे ठोके पडत असतात,'' असं ते पुढे म्हणाले.

बुधवारी (14 ऑगस्ट) एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

2. नथुराम गोडसेला मानणारे लोक माझी हत्या करू शकतात - असदुद्दीन ओवेसी

नथुराम गोडसेला मानणारे लोक माझी हत्या करू शकतात, असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

प्रतिमा मथळा असदुद्दीन ओवेसी

कलम 370वरून तुम्ही पाकिस्तानला मदत करत आहात, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "एक दिवस कोणी तरी मला गोळी मारेल असे वाटते. गोडसेच्या विचारसरणीला मानणारे लोक माझ्याबरोबर असे करु शकतात. आपल्या देशात आजही गोडसेला मानणारे लोक आहेत."

दरम्यान, ओवेसी यांनी पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम थेट मुख्यमंत्री मदतनिधीत जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

3. काश्मीरला कधी येऊ? - राहुल गांधींचा सवाल

कोणत्याही अटींशिवाय काश्मीरला कधी येऊ? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. NDTVनं ही बातमी दिलीय.

राहुल यांनी ट्वीट करत म्हटलंय, "मालिकजी, तुम्ही माझ्या ट्वीटला दिलेला रिप्लाय मी पाहिला आहे. जम्मू-काश्मीरला भेट देण्याचं तुमचं निमंत्रण कोणत्या अटी-शर्तींशिवाय मी स्वीकारत आहे. मी कधी येऊ शकतो?"

यापूर्वी मलिक यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "राहुल मी तुमच्यासाठी विमान पाठवतो. तुम्ही येऊन परिस्थिती पाहा आणि मगच बोला."

यावर राहुल गांधींनी म्हटलं होतं की, "आम्हाला विमान नकोय. आम्हाला मुक्तपणे लोकांना भेटू द्या, त्यांच्याशी चर्चा करू द्या."

4. पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक सरकारची मदत जास्त : शरद पवार

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक सरकारकडून पूरग्रस्तांना जास्त मदत मिळत असल्याचं स्थानिक सांगत आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Image copyright Getty Images

ते म्हणाले, "कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांत मी अनेक ठिकाणी फिरलो. तिथं सरकारकडून वेळेत मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी लोकांनी माझ्याजवळ केल्या. परंतु त्याबद्दल काही मत व्यक्त करून मला त्या वादात पडायचं नाही. पूरग्रस्त जनतेचे अश्रू पुसणं आणि त्यांना जीवनात नव्यानं उभं करण्यासाठी प्रयत्न यालाच आमचं प्राधान्य आहे."

"महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक सरकारकडून पूरग्रस्तांना सुलभ व जास्त मदत मिळत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. महापुरामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी योग्य नाही," असं त्यांनी म्हटलंय.

5. मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा पुन्हा सुरू होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. NEWS18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

राज्यातील पुरपरिस्थितीमुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा ही यात्रा सुरू होणार आहे. 22 ऑगस्टला धुळे इथून सकाळी महाजनादेश यात्रेला प्रारंभ होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले विदर्भात 'फडवणीस पोलखोल' यात्रा काढणार आहेत. विदर्भात जिथं मुख्यमंत्री गेले तिथं जाऊन फडवणीस सरकारनं जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली, हे सांगणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)