काश्मीर प्रश्नी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी डोनाल्ड ट्रंप यांची चर्चा

ट्रंप Image copyright Getty Images

जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा झाली.

या दोन्ही पंतप्रधानांशी चर्चा करून ट्रम्प यांनी काश्मिरबद्दलचा तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

मंगळवारी पहाटे ट्रंप यांनी ट्विट केलं, "माझे चांगले मित्र असणारे भारताचे पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी व्यापार, धोरणात्मक भागीदारी आणि भारत पाकिस्तानसाठी सर्वांत महत्त्वाच्या अशा काश्मीर प्रकरणी तणाव कमी करण्याबद्दल चर्चा केली. परिस्थिती कठीण आहे पण चर्चा चांगली झाली."

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेविषयी व्हाईट हाऊसचे प्रवक्ते होगन गाईडली यांनी सांगितलं, "अमेरिकेच्या अध्यक्षांनी काश्मीरविषयीचा तणाव कमी करण्यास सांगितलं आहे."

ट्रंप यांच्याशी नरेंद्र मोदी काय बोलले?

डोनाल्ड ट्रंप यांच्याशी बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मोदी म्हणाले, "काही नेते भारताविरोधात चिथावणीखोर विधानं करत आहेत, जे भारतीय उपखंडातल्या शांततेसाठी योग्य नाही"

डोनाल्ड ट्रंप यांनी इम्रान खान यांच्यात चर्चा झाल्याचं व्हाईट हाऊसनं जाहीर केल्यानंतर मोदी आणि ट्रंप यांच्यात ही चर्चा झाली आहे. ट्रंप यांनी इम्रान यांना आपसात चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

शुक्रवारी व्हाईट हाऊसनं निवेदन केल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं की, इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे काश्मीरच्या मुद्द्वर चिंता व्यक्त केली आहे.

Image copyright Reuters

पंतप्रधान कार्यालयानं ट्वीट करून सोमवारी मोदी आणि ट्रंप यांच्या फोनवरून 30 मिनिटं चर्चा झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी द्विपक्षीय संबंध आणि भारतीय उपखंडातल्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

या चर्चेबाबत पंतप्रधान कार्यालयानं काही ट्वीट्स केले, त्यापैकी एका ट्वीटनुसार मोदींनी या चर्चेवेळी ट्रंप यांना जूनमध्ये ओसाकात झालेल्या जी-20 देशांच्या परिषदेची आठवण करून दिली. तसंच दोन्ही देशांचे अर्थमंत्री लवकरच चर्चा करतील असं सांगितलं.

Image copyright Getty Images

दहशतवादाच्या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कुठल्याही अपवादाशिवाय सीमाभागात दहशतवाद थांबणं गरजेचं आहे असंही मोदींनी म्हटलंय.

गरिबी, रोगराई आणि शिक्षणासारख्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. तसंच नियमित संपर्कात राहाण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)