राज ठाकरे : ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जमावं की नाही यावरुन मनसेमध्येच गोंधळ?

राज ठाकरे, मनसे, ईडी, राजकारण, महाराष्ट्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज ठाकरे

इतक्या वर्षांत तुम्हाला-मला केसेस आणि नोटिशांची सवय झाली आहे. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, की येत्या 22 ऑगस्टला तुम्ही शांतता राखा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

राज ठाकरे यांनी यासंबंधी आपली भूमिका मांडणारं पत्रकच प्रसिद्ध केलं आहे.

मात्र राज ठाकरे यांनी याबाबत कोणतंही भाष्य करण्याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली होती.

राज ठाकरेंवर प्रेम करणारे जे लोक आहेत, ज्यांना राज ठाकरेंची भूमिका सत्याची, खरं ते मांडण्याची होती, असं वाटतं, त्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील लोकांना ईडी कार्यालयाबाहेर जमावं, असं आवाहनच बाळा नांदगावकरांनी या पत्रकार परिषदेत केलं.

मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर जमा असं आवाहन करणाऱ्या बाळा नांदगावकरांना काही तासांतच आपल्या विधानांपासून घूमजाव करावं लागलं. पत्रकार परिषदेनंतर बाळा नांदगावकर आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक झाली.

या बैठकीमध्ये ईडीच्या कार्यालयाबाहेर कोणीही जमू नये अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडल्याचं बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

राज यांनी कोणीही ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, असं सांगितल्याचं बाळा नांदगावकरांनी म्हटलं. सामान्य लोकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या निर्णयाचंही आपण आदर करु असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.

पक्ष प्रमुख आणि पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या या परस्परविरोधी आवाहनामुळे मनसेमध्ये अंतर्गत गोंधळ आहे का? असा प्रश्न उपस्थित आहे.

राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न

गोंधळापेक्षाही मनसे या गोष्टीचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजकीय विश्लेषक संतोष प्रधान यांनी म्हटलं.

Image copyright Getty Images

बीबीसी मराठीशी बोलताना प्रधान यांनी सांगितलं, "मनसेसाठी पक्षाचं अस्तित्व कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. आता त्यांना ती संधी मिळाली आहे. त्याचा फायदा मिळवण्याचा राज ठाकरे आणि मनसेचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईव्हीएमचाही मुद्दा घेऊन पाहिला. पण तो लोकांना क्लिक करू शकला नाही. त्यामुळे ईडीची नोटीस येणं ही राजकीय दृष्टीने त्यांच्यासाठी फायदेशीर गोष्टच आहे. त्याच्या फायदा घेऊन ते वातावरण तापवत आहे."

हे सगळं मनसे ठरवूनच करत आहे. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात जातील. त्याठिकाणी शक्तिप्रदर्शन करतील, असं मतही प्रधान यांनी व्यक्त केलं.

या माध्यमातून नकारात्मक गोष्टीला सकारात्मक स्वरूपात बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं संतोष प्रधान यांनी म्हटलं.

घटना घडण्यापूर्वीच बचावाचा प्रयत्न

अशा प्रकारचं राजकारण करणं हा शिवसेना आणि मनसेचा इतिहास राहिला आहे, असं ज्येष्ठ पत्रकार योगेश पवार यांनी सांगितलं.  

ते सांगतात, "सुरूवातीला काहीतरी विस्फोटक असं विधान करायचं आणि नंतर कायद्याचा बडगा दिसला की नमतं घ्यायचं. त्यानंतर पुन्हा काही घडलं तर कार्यकर्त्यांनी स्वतःहून हे केलं असं म्हणायचं, याभोवतीच मनसेचं राजकारण फिरत असतं."

Image copyright Getty Images

"त्यांना लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करायची आहे. तुम्ही असं केलात तर शहरात अराजक माजेल असाही त्यांना संदेशही त्यांना सरकारला द्यायचा आहे. तसंच कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून आम्ही असं करू नका हे आधीच म्हणालो होतो, असंही ते बोलू शकतात," असं पवार यांनी म्हटलं.

"याआधीही घाटकोपरमध्ये उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. पण नंतर स्पष्टीकरण देताना राज ठाकरे हे 'मी दोन दिवसांपूर्वीच मारहाण करू नका असं वक्तव्य केलं होतं,' असं म्हणाले होते. त्यामुळे पण माध्यमांसमोर आणि मागून काय सांगण्यात आलं हा खरा प्रश्न आहे. हा म्हणजे घटना घडण्याआधीच स्वतःचा बचाव करण्याचा प्रकार आहे," असं योगेश पवार यांनी म्हटलं.

बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे

'आमच्या पक्षाला जाणूनबुजून गालबोट लावण्यासाठीही काहीजण मोर्चात येऊ शकतात. आपण सगळ्यांनी शांतपणे ईडी कार्यालयात जायचंय', असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषेदत सांगितलं.

त्यांनी म्हटलं, की राज ठाकरेंवर प्रेम करणारे जे लोक आहेत, राज ठाकरेंची भूमिका सत्यवादी होती, खरं ते मांडण्याची होती, असं ज्यांना वाटतं, त्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील लोकांना ईडी कार्यालयात यायचं असल्यास यावं.

Image copyright Screen Grab
प्रतिमा मथळा बाळा नांदगावकर

'कुठलाही गोंधळ न घालता ईडीच्या कार्यालयाकडे आपण सगळ्यांनी जायचंय. त्यात केवळ आमच्या पक्षाचेच कार्यकर्ते येतील अशातला भाग नाही. राज ठाकरेंवर प्रेम करणारे इतरही पक्षातले कार्यकर्ते, विविध जाती-धर्माचे लोक येऊ शकतात', असं त्यांनी सांगितलं.

कायदा-सुव्यवस्थेला त्रास होता कामा नये. पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना केलं.

कार्यकर्ते येतीलच, पण सामान्य लोकही येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे किती मॉब येईल हे सांगू शकत नाही. लोक येतील याची आम्हाला खात्री आहे. गोंधळ होऊ नये यासाठी काळजी घेणं आम्हाला आवश्यक आहे', असंही नांदगावकर यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)