चिदंबरम यांना सीबीआयनं घेतलं ताब्यात, आज सीबीआय कोर्टात हजर करण्याची शक्यता

चिदंबरम यांना घेऊन जाताना सीबीआयचे अधिकारी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चिदंबरम यांना घेऊन जाताना सीबीआयचे अधिकारी

आयएनएक्स कंपनीतील विदेशी गुंतवणुकीसंदर्भातील कथित गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे.

त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानावरुन त्यांना सीबीआय मुख्यालयात नेण्यात आलं आहे. आकाशवाणीनं चिदंबरम यांना अटक झाल्याचं वृत्त दिलं आहे. त्यांना आज सीबीआय कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. दहा मिनिटांतच ते आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

पाठोपाठ सीबीआय आणि ईडीची पथकंही त्यांच्या घराकडे निघाली. बाहेर थांबून काही वेळ गेट वाजवल्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं भिंतीवरून उड्या मारून आत जाण्याचा प्रयत्न सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला. 

यामागे भाजप नाही तर दुसरं कोणं?

चिदंबरम यांना ताब्यात घेण्यावरुन जो काही ड्रामा झाला, त्याबद्दल त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "यामागे सरळसरळ भाजपचाच हात आहे. दुसरं कोण हे करणार? डोनाल्ड ट्रम्प तर नाही ना!" अशी खोचक टिप्पणी कार्ति चिदंबरम यांनी केली.

"चिदंबरम यांना यापूर्वीही ईडीनं अनेकदा नोटीस बजावली होती आणि प्रत्येक वेळी ते ईडीसमोर हजरही झाले होते. आम्ही या सर्वाविरोधात कोर्टात जाऊ," असंही कार्ति चिदंबरम यांनी म्हटलं.

पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी काय म्हटलं?

गेल्या 24 तासात खूप काही घडलं आहे. गोंधळही आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी मी आलो आहे. मी कोणतंही गैरकृत्य केलेलं नाही. माझ्यावरील आरोपात काहीही तथ्य नाही, असं चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषद म्हटलं.

आयएनएक्स मीडिया कंपनीप्रकरणी मी आरोपी नाही. माझ्या कुटुंबावरच्या कोणत्याही व्यक्तीवर आरोपपत्र नाही. एफआयआर सीबीआयने दाखल केला आहे, असंही चिदंबरम यांनी म्हटलं.

मंगळवारी संध्याकाळी सीबीआय तसंच ईडीची पथकं चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. मात्र चिदंबरम निवासस्थानी नव्हते. त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती.

Image copyright ANI

मंगळवार संध्याकाळपासून चिदंबरम कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजता चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.

मी कायद्यापासून पळ काढत नव्हतो, तर माझ्या वकिलांसोबत या खटल्याच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करत होतो, असं स्पष्टीकरण चिदंबरम यांनी दिलं.

चिदंबरम यांनी म्हटलं, की मी फरारी झालो आहे असं सांगण्यात आलं. ते पाहून मी अवाक् झालो. मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करेन. याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपासणी संघटनाही न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतील अशी आशा आहे. सार्वत्रिक विवेक आणि न्यायालयाचा निर्णय, न्यायाधीशांचे ज्ञान यावर माझा दृढ विश्वास आहे.

मीडिया कंपनी आयएनएक्समधील गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. चिदंबरम यांच्या अंतरिम जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

चिदंबरम यांच्या जामिनाची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर होणार हे गुरुवारी निश्चित होईल.

मंगळवारी (20 ऑगस्ट) दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे चिदंबरम यांच्या वतीने बाजू मांडत आहेत.

न्यायाधीशांसमोर पुन्हा बाजू मांडण्यावाचून आमच्यासमोर पर्याय नाही अशी प्रतिक्रिया सिब्बल यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली. दरम्यान, चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र ते पळून जाणारे व्यक्ती नाहीत असं सिब्बल यांनी म्हटलं.

Image copyright AFP

ते कुठेही जाणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र आम्ही देऊ असंही सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं.

माझे अशील कुठेही जाणार नाहीत असं आम्ही न्यायालयाला आधीच सांगितलं आहे असं सिब्बल म्हणाले. त्यावर न्यायाधीश रामण्णा यांनी चिदंबरम पळून जात आहेत असं सांगितलं. त्यावर माझे अशील कुठेही जाणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर करू असं सिब्बल म्हणाले.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मात्र ट्वीट करून चिदंबरम यांच्या पाठिशी उभं असल्याचं म्हटलं आहे. चिंदबरम सरकारबाबत नेहमी खरं बोलतात, त्यामुळे त्यांना हा त्रास दिला जात असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.

दरम्यान ईडीनं चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

पी. चिदंबरम यांना सीबीआयने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात मंगळवारी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या दिल्ली येथील घराबाहेर नोटीस लावली. त्यामध्ये लिहिलं आहे की ही नोटीस मिळाल्यानंतर पुढच्या दोन तासांत चिदंबरम यांनी चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर व्हावं.

सीबीआयनं दिलेल्या नोटिशीवर चिदंबरम यांचे वकील अर्शदीप खुराणा यांनी म्हटलंय की, "माझे अशील चिदंबरम यांना दोन तासांत हजर राहण्याचे आदेश कायद्यातील कोणत्या कलमानुसार दिले आहेत हे या नोटिशीत नमूद करण्यात आलेलं नाही. त्यामुळे माझे अशील कायद्यानं दिलेल्या आपल्या अधिकाराचा वापर करत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहेत."

Image copyright Getty Images

खुराणा पुढे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं त्यांच्या विशेष याचिकेची दखल घेण्यास परवानगी दिली असून आज सकाळी 10.30 पर्यंत त्यावर सुनावणी होईल. तोपर्यंत माझ्या अशिलांवर कोणतीही जबरदस्ती न करता सकाळी 10.30 पर्यंत न्यायालयातील सुनावणीची वाट पाहावी अशी विनंती मी करतो."

आयएनएक्स मीडिया खटल्यात चिदंबरम आरोपी आहेत. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी जामिनासाठी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणीही चिदंबरम यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय करत आहेत.

उच्च न्यायालयाने चिदंबरम यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. अटक रोखण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे

नेमकं काय आहे प्रकरण?

पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 300 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. Foreign Investment Promotion Board (FIPB) ने मर्यादेपेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक स्वीकारण्यासाठी INX मीडियाला मिळालेल्या मंजुरीत अनियमिततेचा आरोप लावला होता.

त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate अर्थात ED) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती. या केसमध्ये कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

INX मीडियाद्वारे कथित बेकायदेशीर रक्कम वळवल्याच्या माहितीच्या आधारे CBI ने कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांवर एक स्वतंत्र केस दाखल केली आहे.

Image copyright TWITTER @KARTIPC

CBIने पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मीडिया फर्मवरील कर चौकशीला रद्द करण्यासाठी कथितरित्या रक्कम घेतल्याच्या प्रकरणात चार शहरांमध्ये चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे मारले होते. या आधीही CBIनं अनेकवेळा कार्ती चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे.

याशिवाय सप्टेंबर 2017मध्ये EDनं कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईतल्या संपत्तींवर टाच आणली होती.

भारतीय माध्यमांनुसार चौकशीदरम्यान EDला माहिती मिळाली की, 2G घोटाळ्यातल्या एअरसेल मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कार्यकाळात FIPBच्या मंजुऱ्याही मिळालेल्या आहेत. याचबरोबर कार्ती आणि पी. चिदंबरम यांच्या भाचीच्या कंपनीला मॅक्सिस ग्रूपकडून लाच मिळाल्याची माहितीही ED ला मिळाली होती.

माध्यमांमधल्या वृत्तांनुसार, एअरसेल-मॅक्सिस करारामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेचाही तपास CBI करत आहे.

Image copyright RAVEENDRAN/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा पी. चिदंबरम

2006 मध्ये मलेशियन कंपनी मॅक्सिसद्वारे एअरसेलमध्ये 100 टक्के भागीदारी मिळवण्यासाठी मंजुरी देण्याच्या प्रकरणात चिदंबरम यांच्यावर अनियमततेचे आरोपही लावण्यात आले आहेत.

पण पी. चिदंबरम यांनी नेहमी त्यांच्यावर आणि मुलावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप राजकीय हेतून लावण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पैसा मागितल्याचा आरोप

पी. चिदंबरम यांच्याबरोबरीने त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातही आरोप आहेत. आयएनएक्स कंपनीविरोधातील चौकशी प्रकरण थांबवण्यात यावं यासाठी कार्ती यांनी 10 लाख डॉलरचा प्रस्ताव ठेवला होता.

आयएनएक्स मीडिया कंपनीच्या माजी संचालक इंद्राणी मुखर्जी यांनी कार्ती यांनी आपल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप सीबीआय चौकशीदरम्यान केला होता.

दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात हा सौदा झाल्याचं तपास करणाऱ्या संघटनेचं अर्थात सीबीआयचं म्हणणं आहे.

दरम्यान इंद्राणी मुखर्जी या त्यांची मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणी तुरुंगात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)