उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण : #5मोठ्याबातम्या

उदयनराजे भोसले Image copyright Sai sawant

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतची सविस्तर बातमी ई-सकाळने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

फडणवीस-उदयनराजे भेटीनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उदयनराजे यांच्यानंतर काहीच वेळाने त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसलेसुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचले.

दरम्यान, या भेटीबाबत उदयनराजे यांना विचारलं असता, विकासकामांच्या निधीबाबत चर्चा केल्याचं सांगितलं आहे. यानंतरही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

2. आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात म्हणून त्यांना पेंग्विन म्हणतात - धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भाजप-शिवसेना नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

Image copyright facebook/dhananjay munde

पेंग्विनचं पिल्लू मेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू आले, त्यामुळे त्यांना मुंबईत पेंग्विनच म्हणतात, अशा शब्दात मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

3. श्रीसंतवरची बंदी हटवली

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आलेल्या श्रीसंतला दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने श्रीसंतवरची बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी श्रीसंतवरची आजीवन बंदी हटवून ही बंदी ७ वर्षं करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी झी 24 तासने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

Image copyright Hindustan Times/getty images

डीके जैन आपल्या आदेशात म्हणाले, 'श्रीसंत जवळपास ६ वर्षं बंदीची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे तो बीसीसीआयच्या कोणत्याही क्रिकेट मॅच किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही. त्याचं वय ३० पेक्षा जास्त आहे. एक फास्ट बॉलर म्हणून त्याचा सर्वोत्तम काळ आता निघून गेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याची बंदी ७ वर्षं करण्यात आली आहे. ही बंदी पुढच्या वर्षी १३ सप्टेंबरला संपेल. तेव्हापासून श्रीसंतला क्रिकेट खेळता येऊ शकेल.

4. काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदारसंघातल्या काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची बातमी एबीपी माझाने दिली आहे.

विकासकामांना वेग देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्यांचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचसोबत सोलापूर जिल्ह्यातील करमाळाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार रश्मी बागलसुद्धा शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत चर्चा आहे.

5. सोन्याचा नवा भाव ३८, ७७० रुपये तोळा दर

सणाच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर प्रति तोळा ३८,७७० रुपये झाला आहे. ज्वेलर्सकडून झालेल्या मागणीमुळे सोन्याची भाववाढ झाल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटलं आहे.

Image copyright SAM PANTHAKY/getty images

केवळ देशामध्ये ज्वेलर्सकडून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढल्याचं ऑल इंडिया सराफा असोसिएशननं म्हटलं आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले आहेत.

विदेशातील बाजारपेठेत सोन्याची मागणी घटूनही देशातील सोन्याची मागणी वाढली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण झाल्याने सोन्याचे दर वाढण्यास सहाय्य झाल्याचंही असोसिएशनने म्हटले आहे. ही बातमी ईटीव्ही भारतने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)