राज ठाकरे यांची कोहिनूर प्रकरणी पावणे नऊ तास चौकशी

राज ठाकरे Image copyright ANI

तब्बल पावणे नऊ तासांच्या चौकशी नंतर राज ठाकरे यांची सुटका करण्यात आली आहे. कोहिनूर मिलप्रकरणी ईडीनं राज यांना चौकशीसाठी बोलवलं होतं.

ईडीच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ते त्यांच्या निवसस्थानी रवाना झाले.

ईडीनं राज यांना नेमके काय प्रश्न विचारले याची मात्र माहिती मिळू शकलेली नाही.

राज ठाकरे यांनी मीडियाशी बोलणं टाळलं आहे. ज्या पद्धतीनं ते मीडियाकडे पाहात नमस्कार करत चौकशीसाठी आत गेले होते, त्याच पद्धतीनं बाहेर पडताना त्यांनी मीडियाकडे पाहून नमस्कार केला आणि निघून गेले.

राज यांच्यासोबत त्यांचे कुटुंबियसुद्धा आले होते. मात्र त्यांना आतमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.

सुप्रिया सुळेंचा पाठिंबा

दरम्यान, राज यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेसुद्धा पुढे आले आहेत. जे कोणी सरकारच्या विरोधात बोलत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

पैसा आणि बळाचा वापर करणारं सरकार हे देशाचं दुर्दैव असल्याचं मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे इतकेच सांगणे आहे की विचाराची लढाई विचारांनी लढा. सत्याशी प्रामाणिक राहणाऱ्यांची मुस्कटदाबी करू नका. असं नीच राजकारण करू नका," असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

12.20 : मनसे कार्यकर्ते शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करत आहेत.. "सत्ताधाऱ्यांची आम्ही चुकीचं पाऊल उचलावं अशी अपेक्षा आहे, पण आम्ही शांत राहणार"- संतोष धुरी, मनसेचे मुंबईतील नगरसेवक

11.40 : ईडीच्या कार्यालयात फक्त राज ठाकरे यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर राज यांची पत्नी शर्मिला आणि त्यांचा मुलगा अमित ईडी कार्यालयाजवळील ग्रँड हॉटेलमध्ये थांबले आहेत.

11.33 :राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत.

11.22: राज ठाकरे कुटुंबीयांसमवेत ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झाल्यावर सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पुजेला? असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारला आहे. बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण हे सगळे मिळून ईडीला माहिती देणार का? हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

11.16 : राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणत्याही क्षणी पोहोचतील. या परिसरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

10.32 : राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच त्यांच्या काही मित्रांसह ईडी कार्यालयाच्या दिशेने निघाले आहेत.

10.15 : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी मुंबईतील फोर्ट आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासह 5 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात कलम 144 लागू केले आहे.

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाजवळ काल रात्रीपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संदीप देशपांडे यांच्याबरोबर मनसेच्या इतर नेत्यांनाही ताब्यात घेण्यास सुरूवात झाली आहे.

बलार्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

21 ऑगस्ट : ईडीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने आत्मदहन केल्यानंतर आपण व्यथित झालो आहोत असं राज यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलं आहे.

मला ईडीची नोटीस आली, या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा असे राज ठाकरे यांनी काल ट्वीटरवर जाहीर केले आहे.

ईडीसारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरं देईन. म्हणून मी पुन्हा सांगतो, तुम्ही सर्वांनी शांतता राखा असे सांगून ईडीच्या कार्यालयाजवळ कोणीही येऊ नका असे त्यांनी ट्वीटरवर लिहिले आहे.

त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज यांची पाठराखण केल्याचे दिसून आले. त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी करमाळ्याच्या माजी आमदार रश्मी बागल आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राज यांना आलेल्या नोटिशीबाबत विचारलं असता 'त्यातून काही निघेल असं वाटत नाही' असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

20 ऑगस्टः आपल्याला आलेल्या नोटीसनंतर राज यांनी ट्वीटरवर 22 ऑगस्टरोजी शांतता राखायचे आवाहन केले होते.

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या-माझ्यावर अनेक केसेस झाल्या आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटिसांचा आदर केला आहे.

त्यामुळे आपण या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नोटिसीचा देखिल आदर करू", असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)