चिदंबरम आणि अमित शाह यांच्या अटकेतलं साम्य, 9 वर्षांनंतर पुन्हा तोच घटनाक्रम

चिदंबरम- अमित शाह Image copyright Getty Images

बरोबर 9 वर्षानंतर राजधानी नवी दिल्लीत तोच घटनाक्रम पाहायला मिळाल जो गुजरातमध्ये अमित शहांच्या अटकेवेळी घडला होता. तेव्हा चिदंबरम देशांचे गृहमंत्री होते आणि अमित शाह गुजरातचे गृह राज्यमंत्री होते.


21 ऑगस्ट रोजी रात्री पावणे दहाच्या सुमाराला माजी केंद्रीय गृह मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेचं नाट्य रंगलं.

दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घ्यायला नकार दिला. आता सीबीआय कोर्टानं त्यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

त्याआधी जवळपास 27 तास चिदंबरम कुठे आहेत, याचा पत्ता नव्हता. शेवटी बुधवारी (21 ऑगस्ट) रात्री नऊच्या सुमाराला ते दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेण्यासाठी अवतरले.

त्यांनी पत्रकार परिषदेत एक निवेदन वाचून दाखवलं. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांचा थेट उल्लेख केला नाही. मात्र, 'पॅथोलॉजिकल लायर' म्हणजेच 'सतत खोटं बोलण्याची सवय असणारे' असा उल्लेख केला. चिदंबरम यांनी उपस्थित पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही.

सीबीआयला या पत्रकार परिषदेची माहिती मिळताच सीबीआयचं पथक काँग्रेस मुख्यालयात दाखल झालं. मात्र, तोवर चिदंबरम आपल्या नवी दिल्लीतल्या जोरबाग इथल्या घरी पोहोचले होते.

यानंतर देशाच्या राजधानीने जे हाय व्होल्टेज राजकीय नाट्य बघितलं, ते यापूर्वी कधीही बघितलं नव्हतं.

चिदंबरम यांच्या घराचं गेट बंद करण्यात आलं होतं. गेटबाहेर मीडियाची तोबा गर्दी होती. सीबीआयचं पथक अटक वॉरंट घेऊन चिदंबरम यांच्या घरी दाखल झालं.

मात्र, गेट उघडण्यात आलं नाही. अखेर सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने गेटवरून आतल्या कम्पाउंडमध्ये उडी घेतली.

एव्हाना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती.

Image copyright Getty Images

या सगळ्या गदारोळात सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली आणि त्यांना कारमध्ये बसवलं. ही सगळी शोभा टाळता आली असती.

पी. चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला हे सर्व करायची काय गरज होती?

या प्रश्नाचं उत्तर 9 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत आहे. 25 जुलै 2010 रोजी असंच एक अटकनाट्य रंगलं होतं.

2010 दरम्यान सध्या केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शाह गुजरातचे गृह राज्यमंत्री होते आणि चिदंबरम केंद्रीय मंत्री होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

त्यावेळी अमित शहांवर सोहराबुद्दीत बनावट चकमकीप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही चकमक बनावट होती, असं गुजरात सरकारनं सांगितलं होतं. त्यानंतर आता सीबीआयचे अधिकारी जसा चिदंबरम यांचा शोध घेत होते अगदी तसंच त्यावेळी सीबीआयचे अधिकारी अमित शहांना शोधण्यासाठी जंगजंग पछाडत होते.

जवळपास चार दिवस एका राज्याचे गृह राज्यमंत्री कुठे आहेत, कुणालाच माहीत नव्हतं. अमित शाह गायब होते.

आरोपपत्र दाखल झाल्यावर 24 जुलै 2010 रोजी अमित शाह यांनी पदाचा राजीनामा दिला.

Image copyright Getty Images

25 जुलैला सर्व पत्रकारांना मेसेज गेला की खानपूरमधल्या भाजप कार्यालयात एक महत्त्वाची पत्रकार परिषद आहे.

आमच्या सूत्रांनी आम्हाला सांगितलं होतं, की अमित शाह या पत्रकार परिषदेला हजर राहणार आहेत.

चिदंबरम यांनी जशी पत्रकार परिषद घेतली अगदी तशीच पत्रकार परिषद त्यावेळी अमित शाह यांनी घेतली होती.

मी त्यावेळी एका वृत्त वाहिनीचा ब्युरो चीफ होतो. मी देखील लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी माझ्या ओबी व्हॅनसोबत पत्रकार परिषदेला पोहोचलो.

आमच्या सूत्रांची माहिती खरी होती. पत्रकार परिषदेला अमित शाह हजर होते. त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. अगदी तसंच जसं चिदंबरम यांनी सर्व आरोप फेटाळले. यूपीए सरकार द्वेषभावनेने हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

चिदंबरम पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर न देताच निघून गेले. मात्र, त्यावेळी अमित शाह यांनी सर्व पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

मी त्यांना विचारलं "अमितभाई गेले चार दिवस तुम्ही कुठे होतात?"

यावर त्यांनी अगदी नम्रविनोद करत उत्तर दिलं, "तुमच्याच घरी होतो धीमन भाई."

अगदी गंभीर वातावरणात सुरू असलेल्या त्या पत्रकार परिषदेत अमित शाहांच्या या उत्तरानं हशा पिकला.

चिदंबरम यांनी सीबीआयला चांगलाच गुंगारा दिला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना चिदंबरम यांचं घर गाठावं लागलं इतकंच नाही तर त्यांच्या गेटवरून उडी मारावी लागली.

मात्र, अमित शाहांनी सीबीआयची एवढी दमछाक केली नाही.

Image copyright Getty Images

पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते गांधीनगरमधल्या सीबीआय कार्यालयात गेले आणि शरणागती पत्करली.

चिदंबरम यांनी एक रात्र सीबीआयच्या कार्यालयात घालवली. अमित शहा सीबीआयला शरण आल्यानंतर ते त्यांना मणिनगरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या घरी घेऊन गेले होते.

सीबीआयने त्यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे त्यांना साबरमती तुरुंगात पाठवण्यात आलं.

यानंतर गुजरातमध्ये प्रवेशबंदीच्या अटीवर अमित शाह यांना जामीन मिळाला होता. पुढे अमित शहा दिल्लीत गेले आणि खटल्याची सुनावणी मुंबईत सुरू राहिली. त्यानंतरचा घडलेला इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)