उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामागील कारण काय?

उदयनराजे Image copyright GettyImages

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाजप प्रवेशावरील चर्चांना उधाण आलं होतं.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना फोन केला होता आणि दिल्ली में आने के बाद मिलिये असं म्हटल्याचा एक व्हीडिओ देखील फिरत होता. त्यावरून उदयनराजे भाजपात येतील असा तर्क लावला जात होता. आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं.

राज्यात एकीकडे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे.

शिवस्वराज्य यात्रेचं नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करतील, तर खासदार उदयनराजे भोसले स्टार प्रचारक असतील, असं राष्ट्रवादीनं जाहीर केलं होतं. पण शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होऊनदेखील उदयनराजे या यात्रेत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं होतं.

याशिवाय "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे खूप चांगले मित्र आहेत. ही मैत्री पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडची आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही सत्तेत नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच मैत्रीपोटी साताऱ्याचा खरा विकास केला. याउलट राष्ट्रवादीत नुसतं आडवा-आडवी आणि जिरवीजिरवीच झाली", असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला होता.

"आता सगळीकडेच यात्रा निघाल्या आहेत. आमची स्वत:ची जत्रा असताना आम्ही या असल्या यात्रांमध्ये का सहभागी व्हावं?" असं वक्तव्य उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.

पण, उदयनराजेंच्या गैरहजेरीमागे इतर गोष्टी कारणीभूत असल्याचं स्थानिक पत्रकार आणि राजकीय अभ्यासकांचं मत आहे.

'नावाचा वापर'

पुण्य नगरीच्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी यांच्या मते, "गेली 10 वर्षं राष्ट्रवादी काँग्रेसनं उदयनराजेंना जे महत्त्व द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही. इतकंच काय राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेतलं त्यांचं पोस्टर काढून टाकण्यात आलं. त्यामुळे आता पक्षाला गरज आहे म्हणून माझं नाव यात्रेसाठी वापरलं जात आहे, अशी उदयनराजेंची भूमिका आहे. यामुळे मग ते यात्रेला उपस्थित राहत नाहीयेत."

Image copyright Twitter/Dr. Amol Kolhe
प्रतिमा मथळा शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हेंनी ट्वीट करून याची माहिती दिली होती.

या यात्रेसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यापूर्वी उदयनराजेंना विश्वासात घेण्यात आलं होतं की नाही याबाबत संभ्रम आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात.

ते म्हणतात, "राष्ट्रवादीनं ही यात्रा जाहीर केली तेव्हा उदयनराजेंचं नाव स्टार प्रचारक म्हणून जाहीर केलं. पण यासाठी उदयनराजेंची परवानगी घेण्यात आली नव्हती, शिवाय अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील यात्रेत मी कसं काय सहभागी होणार, अशी त्यांची भूमिका होती, अशा बातम्या त्यावेळी आल्या होत्या. विशेष म्हणजे अजूनही राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं याविषयी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे उदयनराजेंना विश्वासात घेऊन हे केलं गेलं नाही, असं दिसत आहे."

भाजप प्रवेशाची तयारी?

उदयनराजे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी सध्या गेले अनेक दिवस सुरू होती. त्यामुळे उदयनराजे शिवस्वराज्य यात्रांमध्ये अनुपस्थित राहिले असं विनोद कुलकर्णी सांगतात.

Image copyright Ncp/twitter
प्रतिमा मथळा राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे.

ते सांगतात, "उदयनराजे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता दिसत होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. आता विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक घेतल्यास ती जिंकणं सोपं जाईल, असं उदयनराजेंना वाटतं. त्यादृष्टीनं त्यांची चाचपणी सुरू आहे."

"उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे आधीच भाजपमध्ये गेले आहेत. उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आनंद होईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याशिवाय मुख्यमंत्र्यांनीही असंच वक्तव्य केलं आहे," कुलकर्णी पुढे सांगतात.

Image copyright Ncp/twitter

महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सांगतात,"उदयनराजेंना भाजपमध्ये जायचं असल्यास त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे त्यांची खासदारकी जाईल. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमागे दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे यातून त्यांना त्यांचं साताऱ्यामधील राजकीय महत्त्व वाढवायचं असू शकतं. आणि दुसरं म्हणजे या चर्चेतून ते शिवेंद्रराजेंना अस्वस्थ करू पाहत असावेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)