अरुण जेटली अनंतात विलीन, दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अरुण जेटली Image copyright @BJP4INDIA

भाजपचे संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे अरुण जेटली यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिल्लीच्या भाजप मुख्यालयात जेटलींचं पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. भाजप तसंच अन्य पक्षातील नेते तसंच कार्यकर्त्यांनी जेटलींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर यमुना नदीवरील निगमबोध घाटावर आणण्यात आले.

शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी 12.07 दिल्लीतील एम्स रुग्णालयात अरूण जेटलींचं निधन झालं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं.

शनिवारी रात्री जेटली यांचं पार्थिव शरीर दिल्लीमधील कैलाश कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. शनिवारी संध्याकाळी भाजप आणि अन्य पक्षातील नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. बहरीनमध्ये जेटलींची आठवण काढताना ते भावूक झाले होते.

Image copyright @AMITSHAH

"काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आमची साथ सोडून गेल्या आणि आज माझा मित्र अरुण निघून गेला आहे. माझ्यासाठी हा अत्यंत कठीण कालखंड आहे. कर्तव्यभावनेने मी बांधला गेलो आहे. दुसरीकडे मैत्रीचं एक पर्व संपल्याने मन गदगदून गेलं आहे," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"विद्यार्थी काळापासून आम्ही एकत्र वाटचाल केली. राजकीय जीवनातही आमचा मार्ग एकसाथच होते. सतत संपर्कात असायचो. देशासाठी अनेक स्वप्नं एकत्र पाहिली, ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी अविरत प्रयत्न करायचो. मी कल्पनाच करू शकत नाही, माझा मित्र जग सोडून गेला आहे आणि मी दूर बहरीनमध्ये आहे," असं मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी शनिवारी (22 ऑगस्ट) जेटलींच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं.

जेटली व्यवसायानं वकील होते आणि मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते अर्थमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात GSTसारखं महत्त्वाचं विधेयक संमत झालं होतं.

जेटलींना मधुमेहाचा त्रास होता. गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. 2014 मध्ये जेटलींवर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2019 साली मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड बहुमतानं विजय मिळाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)