सुप्रिया सुळेंचं सरकारला चॅलेंज, माझ्याविरुद्ध ईडीची नोटीस काढून दाखवाच : #5मोठ्याबातम्या

सुप्रिया सुळे Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. सुप्रिया सुळेंचं सरकारला चॅलेंज

देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सुप्रिया सुळे यांनी सरकारला आवाहन दिलं आहे. माझ्याविरोधात ईडीची नोटीस काढून दाखवा, असं खुलं आवाहन सुप्रिया सुळेंनी सोलापुरात दिलं. ही बातमी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.

मी काही केलंच नाही तर कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करायला मजा येते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

2. अमितभाई आणि मुख्यमंत्र्यांची बोलून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणार - उद्धव ठाकरे

भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप हे भाजपाध्यक्ष अमित शह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठरविणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा होत होती त्यामुळे त्यावर उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. न्यूज 18 लोकमतनी ही बातमी दिली आहे.

Image copyright Twitter

दरम्यान, देशातील आर्थिक मंदीकडे आणि बेरोजगारीकडे सरकारचं लक्ष नसल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्तेत असलो तरी सरकारच्या कमकुवत आर्थिक धोरणांवर टीका करणारच असेही ते म्हणाले. ही बातमी एबीपी माझा वृत्तवाहिनीने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

3. '...तोपर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही'

बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही. तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यानंतर फेटा बांधणार नाही, असा निर्धार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रा अंबाजोगाईला आल्यानंतर ते बोलत होते. ही बातमी एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

Image copyright facebook

अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा काढण्यात येत आहे. शिवस्वराज्य यात्रा परळीहून अंबाजोगाईला आली होती. यावेळी अक्षय मुंदडा यांनी अमोल कोल्हे यांना फेटा बांधायला घेतला. मात्र अमोल कोल्हे यांनी फेटा बांधण्यास नकार दिला आहे.

4. रासप कमळावर लढणार नाही

रासपला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी अधिक जागांवर लढण्याबरोबर पक्षाच्या चिन्हावर लढणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढणार नाहीत तर रासपच्या चिन्हावर लढतील, असं रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पशुपालन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

तसंच अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला. जानकर यांना शुभेच्छा देणारी संजय दत्तची ध्वनिचित्रफित या वेळी प्रसारित करण्यात आली.

5. बेअर ग्रिल्सला हिंदी कशी समजली, मोदींनी केला उलगडा

डिस्कव्हरी चॅनेलवर नुकत्याच झालेल्या 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स एकत्र दिसले. या कार्यक्रमात मोदी चक्क ब्रिटनमध्ये जन्मलेल्या बेअरशी हिंदीत बोलले आणि मोदींच्या म्हणण्याला तो प्रतिसादही देत होता.

त्यामुळे बेअरला हिंदी कधीपासून यायला लागली? तो हिंदी शिकला का? असे प्रश्नही निर्माण झाले. मात्र मोदींनी या सर्व प्रश्नांना 'मन की बात' या कार्यक्रमातून उत्तर देताना बेअर आणि त्यांच्यामधील संभाषणाबाबतचं गुपीतही उघड केलं.

Image copyright discovery

महाराष्ट्र टाईम्समधील वृत्तानुसार, बेअरच्या कानात एक वायरलेस उपकरण लावण्यात आले होतं. त्यामध्ये मोदी हिंदीत बोलत असलेले शब्द इंग्रजीत भाषांतरित केले जात होते. त्यामुळे बेअरला ते काय बोलत होते, हे कळल्याचा खुलासा मोदींनी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)